अभिनय दर्पण व भरतनाट्यम् नृत्य यांचे अतूट नाते



आचार्य नंदिकेश्वर हे संस्कृत साहित्य परंपरेतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांची तंडू नंदी, नंदिकेश, नंदिकेश, नंदिश, नंदिभरत अशी अनेक नावे प्रचलित आहेत. मात्र ही सगळी नावे एकाच व्यक्तीची आहेत किंवा या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हे सांगणे कठीण आहेत. नंदिकेश्वर यांची निश्चित माहिती कालावधी सांगणे हेही अवघड आहे. असा एक प्रवाद आहे कि शिवगण असणारा हा नंदिकेश्वर शिलाद नामक अंधक स्त्रीचा पुत्र होता जो तिला तपश्चर्येतून प्राप्त झाला होता. मात्र नंदिकेश्वर भारताच्या भागात होता. याविषयी सर्व विद्वानांचे एकमत असलेले दिसते. इ. स १००० ते १३०० या दरम्यान त्याचा कालावधी होता असे म्हणतात.
नंदिकेश्वर रचित साहित्य बघितले असता त्यातील विषयांचे वैविध्य आपल्या लक्षात येते. भरतार्णव, अभिनयदर्पण यांसारख्या ग्रंथांतून नृत्य, नाट्य याचा अभ्यास ताललक्षणादी ग्रंथात तालवाद्य व एकुण तालपद्धतीचा अभ्यास, तसेच तंत्र मंत्रविषयक ग्रंथ, खालोगशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयांवरही त्याचे लिखाण आहे असे विद्वानांचे मत आहे. मात्र यातील अनेक ग्रंथ आता उपलब्ध नाहीत.
हा नंदिकेश्वर म्हणजेच तंडू अथवा नंदी हे विधान सत्य मानल्यास शिवाच्या तांडव नृत्य प्रस्तुतीमध्ये दाखवलेले पिंडीबंध, अंगहार, रेचक यांचे लेखन त्याने केले ह्याचा पुरावा नाट्यशास्त्रात मिळतो.
तंडूमार्फतच शिवाचे तांडव नृत्य मुनींपर्यंत पोहोचले. यातून नर्तन कलेविषयीचे त्यांचे पांडित्य सिद्ध होते. नंदिकेश्वर दाक्षिणात्य असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे अभिनयदर्पण ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती संस्कृत व तेलुगु भाषेत आढळल्या आहेत.
नंदिकेश्वर लिखित अभिनयदर्पण हा ग्रंथ शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहे व खास करून भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यशैलीशी त्याचा जवळचा संबंध आहे असे दिसते. यासाठी आपण प्रथम या ग्रंथाविषयी जाणून घेणे आवश्यक ठरते.
भरत रचित नाट्यशास्त्राला आधारभूत मानून त्यात स्वतःच्या विचारांची भर घालून तयार झालेला हा ग्रंथ म्हणजे अभिनयदर्पण. पी. रामचंद्रशेखर यांच्या मते अभिनय दर्पण हा एकमेव असा ग्रंथ आहे ज्यात केवळ शास्त्रावर भर न देता व्यावहारिक पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण आहे आणि प्रत्यक्ष सादरीकरणाच्या दृष्टीकोनातून त्यांनी प्रत्येक कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.
अभिनयदर्पणची रचना करताना प्रथम नमस्क्रिया, नाट्याची सुरुवात, नाट्यप्रशंसा याचे विवेचन नंदिकेश्वरांनी केले आहे. यानंतर नृत्याच्या विभागांची माहिती आहे. नृत्त, नृत्य आणि नाट्य असे हे विभाग आहेत. या सर्वांची लक्षणे नंदिकेश्वरांनी उद्धृत केली आहे. यातील नृत्याची लक्षणे याप्रमाणे
“रसभावव्यंजनादियुक्तं नृत्यमितीर्यते
एतन्नत्यं महाराजसभायां कल्पयेत सदा”
म्हणजेच रस, भाव यांनी युक्त जे असते ते म्हणजे नृत्य. भरतनाट्यम् नृत्यशैलीत या तिन्ही प्रकारांचा योग्य मेळ घातलेला दिसतो. यापुढे नंदिकेश्वरांनी सभापती, मंत्री आणि सभा अथवा प्रेक्षक किंवा रसिक यांची लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये सभेला त्यांनी कल्पतरूची उपमा दिली आहे. पात्र म्हणजे नर्तकीची लक्षणे व गुणविशेष याचे विवेचन आहे. तसेच पात्रप्राण म्हणजे नर्तकी होण्यासाठी आवश्यक गोष्टींचेही विश्लेषण केलेले दिसते. यानंतर नंदिकेश्वर नाट्यक्रमाविषयी सांगतात. नृत्य सादर करण्याचा हा क्रम प्रत्येक नृत्य कलाकाराच्या अभ्यासाचा विषय आहे. यापुढे अभिनयाच्या चार प्रकारांची माहिती दिली आहे.
“तत्र त्वभिनयस्यैव प्राधान्यमिति कथ्यते
आडि.ग्रको वचिकस्तद्वदाहार्यः सात्विकोsपरः”
आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक अशा चार प्रकारच्या अभिनयाचा विचार नंदिकेश्वरांनी मांडला आहे. यापैकी आंगिक अभिनय या प्रकाराचा खूप विस्ताराने अभ्यास हे अभिनयदर्पण या ग्रंथाचे वैशिष्टय म्हणता येईल. अंग, प्रत्यंग, उपांग यातील प्रत्येकाची सविस्तर माहिती दिली आहे. त्याविषयीचे श्लोक व त्याचा नृत्यात कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो याविषयीचे विवेचन खूपच अभ्यासू आहे. या विवेचनाव्यतिरिक्त याचा अन्य दृष्टीने विचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी प्रत्येक अभ्यासकाला ठेवले आहे हे विशेष.
९ प्रकारचे शिरोभेद, ८ प्रकारचे दृष्टीभेद, ४ प्रकारचे ग्रीवाभेद तसेच त्यातील प्रत्येक प्रकारचे विनियोग यांची माहिती नृत्य कलाकारांसाठी उपयोगी आहे. हे सर्व भेद तसेच पुढे येणारे हस्तविनियोग या सर्वात नंदिकेश्वरांचे मत आणि नाट्यशास्त्रातील माहिती यात फरक आढळतो.
हस्तांच्या विनियोगांवर या ग्रंथात विशेष भर दिलेला दिसतो. हस्त व त्यांचे विविध विनियोग ही नृत्याची भाषा आहे असे म्हणता येईल. हस्तांच्या वैविध्यातूनच नृत्य आपली भाषा फुलवत जाते अथवा मांडत जाते. हस्तांचेही अनेक प्रकार येथे दिले आहेत.
“अथेदानीन्तु हस्तानां लक्षणं प्रोच्यते मया
असंयुताः संयुताश्च हस्तद्वेधा निरुपिता”
असंयुक्त हस्त २८ प्रकार, संयुक्त हस्त २३ प्रकार, देवता हस्त १६ प्रकार, दशावतार हस्त १० प्रकार, जातिहस्त ५ प्रकार, बांधवहस्त ११ प्रकार, नवग्रह हस्त ९ प्रकार,. या सर्व हस्तांचे विनियोग व ते हस्त धारण करण्याच्या पद्धती यात दिलेल्या आहेत याखेरीज १३ नृत्यहस्तही दिले आहेत.
हस्तांप्रमानेच शरीराचे आकृतीबन्ध म्हणजेच मंडलभेद जे १० प्रकारचे आहेत. स्थानक भेद म्हणजे विविध स्थिराकृती. याचे ६ प्रकार आहेत. रंगमंचावरील चालणे म्हणजेच चारी ८ प्रकार, गोल फिरणे म्हणजे भ्रमरी ७ प्रकार, विविध प्रकारच्या उड्या म्हणजे उत्प्लवन ५ प्रकार आणि १० प्रकारच्या गती म्हणजेच पात्राप्रमाणे चालण्याच्या पद्धती या सर्वांचे सखोल व सोदाहरण स्पष्टीकरण नंदिकेश्वरांनी दिले आहे.
वरील सर्व आंगिक अभिनयाच्या अभ्यासावर आणि वापरावर सर्व नृत्यशैलींचा पाया आधारलेला आहे. प्रत्येक शैलीत त्याच्या वैशिष्ट्यानुसार या सर्वांचा कमी अधिक वापर केलेला आपल्याला दिसतो.
मात्र भरतनाट्यम् शैलीत याचा प्रामुख्याने उपयोग केलेला दिसतो. भरतनाट्यम् नृत्यशैली आत्मसात करणाऱ्या कित्येक नृत्यांगनांनी व त्यांच्या पिढ्यांनी या ग्रंथाला आधारभूत मानून आपल्या नृत्याचा अभ्यास केला आहे.
भरतनाट्यम् नृत्यशैलीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य पार्वतीकुमार यांनी अभिनयदर्पण या ग्रंथातील अनेक श्लोक व त्यावरील नृत्यात्मक हालचाली तसेच त्याचा व्यावहारिक उपयोग याचे विवेचन करण्यासाठी आपल्या शिष्यांसह अनेक ठिकाणी प्रयोग सादर केले व या ग्रंथाला लोकाभिमुख केले, तसेच अभिनयदर्पण आणि भरतनाट्यम् नृत्यशाली यांचे नाते दृढ आहे.
आजही भरतनाट्यम् नृत्यशैलीच्या प्राथमिक अभ्यासक्रमापासून या ग्रंथाचा विद्यार्थ्यांना परिचय होतो व त्यांच्या प्रगल्भतेनुसार ते पुढे सतत याचा अभ्यास करतच राहतात.   

संदर्भसूची:
 Abhinayadarpanam : Manmohan Ghosh, Manisha Granthalaya Pvt. Ltd, Calcutta-12

 Dance Gestures-mirror of expression: P. Ramachandrashekhar, Giri Trading agency Pvt. Ltd, Matunga, Mumbai 19


- Mrs. Swati Datar




 She took her first step in Bharatnatyam Dance form under a noteworthy Guru Late Smt Sucheta Joshi. Guru Smt Prerana Desai nurtured and moulded her. Veteran Guru Smt Maithili Raghavan further made her multifaceted.
She received her Degree in Commerce from University Of Pune. She received Bachelor’s Degree in Bharatnatyam Dance from University of Pune with Distinction. She completed her Master’s Degree from Tilak Maharashtra Vidyapeeth and Nrityalankar from Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya with Distinction.
In 1991, with great pride, she set up ‘Swarada Nritya Sanstha’ a well-known Bharatnatyam Dance Academy in Pune, Maharashtra.
 The Institute has several branches in and around Pune. Around about 50 artistes have performed ‘Arangretam’ successfully under her tutelage.‘Swarada Nritya Sanstha’ has earned name and fame because of her visionary guidance.
She has choreographed and staged a variety of dance numbers and presented a number of solo performance.
Honorary Guru on the Panel of Bharatnatyam Dance form of ‘Lalit Kala Kendra’ University of Pune.  Honorary Guru on Bharatnatyam Dance form of Tilak Vidyapeeth. Chairperson of School Committee of Dance faculty of Tilak Maharashtra Vidyapeeth.  Member of Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya Mandal. Being invited to conduct workshops at various places to impart technical knowledge of Bharatnatyam.
Received ‘Kasaba Ganapati Gaurav Puraskar’ – Kasaba Ganapati is ‘Gramdaivat’ of Pune.




Comments

  1. जबरदस्त, माऊली। अनेकानेक शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts