ART RESEARCH - "कलेचे अद्वय तत्त्वज्ञान"

Writer: Swarada Datar Bhave.


तत्त्वज्ञान.... तत्वासंबंधीचे ज्ञान. तत्त्व म्हणजे 'अबाधित विषयत्व'. ज्याचा बाध होत नाही. जे अखेरपर्यंत टिकून राहते, जे सत्य आहे ते तत्त्व. विल ड्युरंटने तत्त्वज्ञानाची व्याख्या अशी केली-

"A study of experience as a whole or a portion of experience in relation to the whole"

तत्त्वज्ञान हा शब्द कानावर पडताक्षणी दडपण येते. आत्मा, परमात्मा असे अवघड शब्द ऐकूनच लोक तत्वज्ञानाच्या वाटेला जात नाहीत. पण ते एक गोष्ट विसरतात कि, आयुष्य आनंदी, समाधानी करणारं हे तत्वज्ञानच आहे. मानवी आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवणारं, त्याला मोक्षाप्रत नेणारं हे तत्वज्ञानच आहे. मानवी मनातील षड्रिपूंचा नाश करणारं, त्याला सन्मार्गाला खेचणारं, त्याची नस न नस शुद्ध करणारं हे तत्वज्ञानच आहे.

तत्त्वज्ञानात "षड्दर्शने" ( सहा दर्शने ) पायाभूत मानली आहेत. यांपैकी सहावे म्हणजेच वेदान्त. श्रुती ( वेदांचे चार भाग व अनेक पोटविभाग ), ब्रह्मसूत्रे व गीता यांच्या समुदायास वेदान्त म्हटले गेले. या "प्रस्थानत्रयी" वर आद्य शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य इत्यादींनी आपले सिद्धांत उभारले. यातील वैशिष्टय म्हणजे दोन परस्पर विरुद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी शंकराचार्य व मध्वाचार्य यांनी केली मात्र याचा आधार ही प्रस्थानत्रयीच होती.

मध्वाचार्यांनी शुद्ध द्वैत तत्त्वज्ञान मानले. आपण परमेश्वराचे भक्त आहोत आणि ईश्वर व माणूस हे दोन वेगळे आहेत असे ते म्हणतात. आपण भगवंतात एकरूप होऊच शकत नाही. परंतु, शंकराचार्य परस्परविरुद्ध मत मांडून म्हणतात की, माणूस व ईश्वर हे एकच आहेत. ते जीवाशिवाचे एकरूपत्व दर्शवितात.

वरील दोन्ही मतांचा नृत्याशी संबंध लावायचा झाला तर द्वैत तत्वज्ञानानुसार कलाकार व त्याची भूमिका किंवा रसिक व रंगमंचावरील सादरीकरण हे संबंधरहित घटक व्हायला हवेत. परंतु असे झाले आणि कलाकार आपल्या भूमिकेपासून अलिप्त राहिला तर तो अभिनय होणार नाही आणि शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे नर्तिका तिच्या भूमिकेत पूर्णतः एकरूप झाली. तरीही तिच्या अभिनयाला अभिनय म्हणता येणार नाही. याचा अर्थ असा की भूमिकेशी समरस होऊनदेखील तिच्यापासून वेगळे राहणे हा अभिनय असतो. हेच 'अद्वय' तत्त्वज्ञान.

"अमृतानुभव" या ग्रंथात ज्ञानेश्वर माउलींनी अद्वय तत्त्वज्ञान शिव-शक्ती यांच्यातील प्रगाढ नाते दर्शवून सविस्तर सांगितले आहे. शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे प्रकृती. शिव-शक्ती जगताचे आदि-द्वंद्व आहेत. त्यांचे रूप हे अर्धनारीनटेश्वराचे आहे. त्यामुळे त्यांच्यात द्वैतही कल्पिता येत नाही न पूर्ण अद्वैतही नाही. ज्ञानेश्वर माऊली अतिशय चपखल दृष्टांत देतात. ते म्हणतात, टिपऱ्यांच्या दांड्या दोन पण आवाज एकाच येतो, फुले दोन पण सुगंध एकाच येतो, दिवे दोन पण प्रकाश एकच होऊन जातो, डोळे दोन पण दृष्टी मात्र एकच असते. शक्तीचे साकल्याने ग्रहण केले तर शिवच प्राप्त होतो.

माऊली सांगतात, "जैसा सूर्य मिरवे प्रभा ! प्रभे सूर्यत्वाचाचि गाभा!" म्हणजे- ज्याप्रमाणे सूर्य प्रभा मिरवितो आणि प्रभेला सुर्याचाच गाभा असतो त्याप्रमाणे शिव-शक्तीचे दोन्ही मिळून तेज एकच आहे. म्हणजे त्या तेजाचे हे अद्वय आहे.

नृत्य-कलावंताची कला आणि कलामाध्यम एकच असते. ते म्हणजे शरीर. हेच शरीर अंतरीचा भाव आणि आनंद प्रकट करण्याचे साधन बनते. त्याच्या प्रकृतीतून आत्माच प्रकट होत असतो. ज्याप्रमाणे शक्ती अष्टधा प्रकृतीतून शिवतत्व अभिव्यक्त करीत असते, तद्वतच कलावंतही आपल्या हृदयस्थ आत्मतत्वाला नृत्यातून अभिव्यक्त करीन असतो.

रंगभूमी ही नवे विश्व निर्माण करते. लेखकाच्या ज्ञान आणि इच्छेला आलेले ते क्रियारूप असते. अभिनेताही निरंग ( अहंशुन्य ) झालेला असतो. त्याच्या 'मी' ने भूमिका ग्रहण केलेली असते. तो स्वतः आकाशवत निर्लेप असतो. लेखकाचे मनोगत अभिव्यक्त करण्यासाठी त्याच्या 'मी' ने आकार घेतलेला असतो. अभिनेत्याचा आपल्या इंद्रियांवर पूर्ण ताबा असावा लागतो. पाहिजे तो विकार, हवा असेल तितकाच त्याला व्यक्त करता यायला हवा. अभिनय हा अभिनयच असावा लागतो, तो अनुभव होऊन चालत नाही. समरसता नि अलिप्तता ही योगभूमिका असावी लागते.

वरील अभिनय हा अभिनयच असावा लागतो, तो अनुभव होऊन चालत नाही! हे विधान म्हणजेच कलेचे अद्वय तत्त्वज्ञान. नाट्य व नृत्य या दोन कला याच तत्वज्ञानावर उभ्या आहेत. नाटकातील नट असो वा नृत्याविष्कार करणारी नर्तिका असो, रंगमंचावर दोघेही अभिनायाचाच अविष्कार घडवितात. एखादी भूमिका सादर करताना त्या भूमिकेत घुसणे म्हणजे अभिनय करणे असे म्हणतात, पण ती भूमिका किंवा त्या भूमिकेतील पात्र म्हणजे मीच आहे असे समजून रंगमंचावर वावरणे हा अभिनय नव्हे. नृत्याविष्कारातून हास्यरस दाखवताना मोठमोठ्यांदा आवाज करून हसणे किंवा करूणरसात खरोखरच अश्रू ढाळणे हा अभिनय नाही. दिलेल्या अथवा साकार करायच्या भूमिकेनुसार, त्या भूमिकेच्या गरजांनुसार हालचाली, हावभाव करणे हा अभिनय.

डॉ. वि. य . कुलकर्णी अद्वय तत्वज्ञानासंबंधी फार छान उदाहरण देतात. ते म्हणतात, ताटातला घास पुष्टी देत नाही ( द्वैत तत्त्वज्ञान ) व पोटातला घास आस्वाद देत नाही  ( अद्वैत तत्त्वज्ञान ) पण तोंडातला घास हा मात्र आस्वाद देतो. मुखामध्ये रसनिर्मिती होते व ति पुष्टी देते. नाट्य व नृत्य कलाकारांचे व रसिकांचेही हे असेच असते. भूमिकेशी पूर्णतः एकरूप न होता तादात्म्य व अलिप्तता यांचा समन्वय साधून अभिनय करणे हे कलाकाराचे उद्दिष्ट. कलाकाराने अद्वय तत्वज्ञानानुसार जर भावनिर्मिती घडवून आणली तरच रसिकाच्या मनात रस उत्पन्न होतील.

कलांच्या जन्मदात्या शिव-शक्तीपासूनच उत्पन्न झालेले हे अद्वय तत्त्वज्ञान कलाकारांना व रसिकांना उत्तम दर्जा गाठण्यासाठी प्रेरणा देणारे आहे.




Swarada's career in Bharatanatyam Dance is flourished and consolidated by her mother, Guru Smt. Swati Datar and Guru Smt. Mythili Raghavan strengthened it further more.

She grabbed a rare, golden opportunity to become a disciple of Guru Shri. Vaibhav Aarekar, multifaceted international artiste. Under his tutelage she has been learning nuances in Abhinaya and advanced technique of performance.

She has received Bacholer’s degree in German language from University of Pune. Also she received Master’s Degree in Bharatanatyam from Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune. She received Diploma in Sanskrit language from Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune. Further She completed Visharad Purna from Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalaya, Miraj.


She has performed in “Navajyoti Sahyadrichya” of Door Darshan, “Ruturas”, “Srujan Samhar” and “Akhilam” choreographed by Smt. Swati Datar.
She has performed in major productions choreographed by Shri Vaibhav Aarekar viz. Paanyavarchya Paaklya, Shiva, Fragrances, Trayyanta & Abhangaranga.


She has recipient of Sawai Gandharva Scholarship and recipient of the National Scholarship from Dept. of Culture and Centre for Cultural Resources and training, Govt. of India. 
She has played a lead role in the dance-drama “Usha Aniruddha” of Sankhya Dance Creations.

Email ID: d_swarada@yahoo.in

Comments

Popular Posts