"पौराणिक धर्म"
- आशय, वैदिक ते पौराणिक धर्म, नवीन देवता आणि संकल्पनांचे झालेले आगमन यांचा संक्षिप्त आढावा.
Article written by: Swarada dhekane.
Article written by: Swarada dhekane.
कालानुरूप निर्माण झालेल्या मानवाच्या धर्माच्या
व देवाच्या कल्पनेचा प्रभाव त्या त्या काळातील समाज जीवनावर, संस्कृतीवर व कलेवरही
पडलेला दिसून येतो. धर्म आणि देवदेवतांच्या निर्माण झालेल्या मूर्त स्वरूपाचा आविष्कार
विशेषतः चित्र, शिल्प, साहित्य आणि नृत्यात पहावयास मिळतो. भारतीय शास्त्रीय
नृत्यशैलींमध्ये आजही पाहायला मिळणारे देवदेवतांचे वर्णन, स्तुती, कथा, सांकेतिक
भाषेतून त्याचे निर्माण होणारे व्यक्तिमत्व, तसेच त्या ईश्वराविषयीची प्रेमाची,
भक्तीची भावना जे आजही तेवढेच प्रभावशाली आणि मनोरंजक ठरते; ह्या सर्वांची
पार्श्वभूमी म्हणजे “पौराणिक धर्म”. नृत्याची देवता मानला जाणारा नटराज शिव,
विष्णू आणि त्याचे लोकप्रिय झालेले अवतार, त्यांच्याशी संबधित येणाऱ्या इतर देवता,
नृत्याच्या साहित्यातदेखील क्वचितच उल्लेख केले गेलेले इंद्र आणि ब्रह्मदेव, ह्या
सर्वांचे मूळ स्रोत व आशय काय आहे? हा पौराणिक धर्म कसा व का निर्माण झाला तसेच
आपापल्या नृत्यशैलीशी त्याचा संबंध काय आहे? म्हणून ‘पौराणिक’ धर्म आणि देवतांचा
संक्षिप्त आढावा घेण्यासाठी हा लेख लिहित आहे.
धर्म ही संकल्पना मनुष्याने व्यक्तिशः अणि
समुदायशः घडविली आहे. धर्माचा भारतातील पहिला अविष्कार म्हणजे ‘वैदिक धर्म’ अथवा ‘ऋग्वेदीय धर्म’ होय. ह्या वैदिक धर्मामध्ये निसर्गात असलेल्या
शक्तींना देवता मानून अग्नी आणि पुरोहिताद्वारे यज्ञ करून त्या त्या देवतेपर्यंत
पोहोचण्याची कल्पना माणूस जोपासत होता. आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याला देवासमान
ठेवून त्याची पूजा करणे तसेच त्याची कृपा आपल्यावर असावी, आपल्याला अपेक्षित
गोष्टींची प्राप्ती व्हावी त्यासाठी त्यांची स्तुती करणे, त्यांना प्रसन्न करणे
अशा आशयावर आधारित हा धर्म होय. कालांतराने, ह्या वैदिक धर्मामध्ये काही नव्या
प्रवाहांचा उदय झालेला दिसतो आणि कालानुक्रमे त्याचे रूपांतरण पौराणिक धर्मात
झालेले दिसते. “वेदानंतर म्हणजेच श्रुतींनंतर स्मृतींना आणि पुराणांनी
ज्याचे स्वरूप घडविले, त्या मूळच्या श्रौत धर्मानंतरचा धर्म म्हणजे ‘स्मार्त’ किंवा
‘पौराणिक’ धर्म होय.१
जीवनाचे
अंतिम ध्येय मानल्या जाणाऱ्या ‘मोक्षा’पर्यंत पोहोचण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग
धर्माने दाखविले. वैदिक परंपरेतील इंद्र, वरुण यांसारख्या देवतांना
आपण आपण बघू शकत नाही, त्यामुळे लोकांना त्यांना दिसतील अशी प्रतीके निर्माण करावी
लागली. उदाहरणार्थ- गौतमबुद्ध, महावीर या ऐतिहासिक माणसांविषयी जसे सांगता येते,
जसे की त्यांचे राहणीमान, जन्म इत्यादी आणि त्यांच्या प्रतीकांमुळे निर्माण झालेले
स्थान माहात्म्य; जसे की स्तूप अथवा चैत्यगृह, त्याप्रमाणे वैदिक परंपरेतील
देवतांची पक्की स्थाने नाहीत. जिथे यज्ञ केला गेला असेल तेच स्थान मानले जाणार
परंतु, उत्खनन केल्यावर यज्ञ मिळणार नाही. अशा पार्श्वभूमीतून वैदिक धर्माच्या
पलीकडे जाऊन अनेक सिद्धांत मांडले गेले. त्यात जैन आणि बौद्ध धर्माचाही समावेश
होतो.
वैदिक
धर्मानंतरच्या काळात अनेक नवीन देवता उदयास आल्या. त्यामुळे इंद्र, अग्नी, वरुण,
सोम ह्या देवता मागे पडून कार्त्तिकेय, गणपती, पार्वती ह्या देवतांना स्थान
निर्माण झाले. ह्या देवतांमध्येच आणखी २ महत्त्वाच्या देवतांची भर पडलेली दिसते,
ते म्हणजे ‘विष्णू’ आणि ‘शिव’; ज्यांचे उगमस्थान वैदिक धर्मात सापडते, हे वैशिष्टय!
वैदिक धर्मात दुय्यम स्थान मिळालेल्या ‘सूर्य’ देवतेच्या प्रभावळीतील
देवता विष्णूला पौराणिक धर्मात मात्र स्वतंत्र आणि उच्च स्थान प्राप्त झाले.
महाजनपदांच्या काळापासून (इ.स ५ वे / ६ वे शतक) पशुपालन ते शेती, त्यांवर
आधारित उद्योग आणि त्यांच्यावर कृपा ठेवणारी देवता यातून चार प्रकारची तत्त्वं
निर्माण झाली. सर्वप्रथम, पशुपालकांचा देव- वासुदेव, शेतीचा देव- संकर्षण,
दोन्हीच्या उद्योगांतून निर्माण होणारी आर्थिक उपलब्धता, त्याची देवता- प्रद्युम्न
आणि राजकीय व्यवस्थांची देवता- अनिरुद्ध. यांमध्ये पशुपालन हा व्यवसाय निश्चित
स्वरूपाचा असल्यामुळे त्याची देवता वासुदेव श्रेष्ठ ठरली, हा ‘चतुर्व्यूह
सिद्धांत’ होय.
तसेच,
पंच-इंद्रिये(कर्मेंद्रिये) व त्यांच्याशी निगडीत पाच जशा चांगल्या गोष्टी तशाच
वाईट गोष्टी- वाईट स्पर्श, बोलणे, ऐकणे, बघणे इत्यादी पाप मानली जात आणि पाप=अंधार
ह्या अर्थी पाचही पापे धुवून काढण्याचे विधी, त्यांच्या पाच देवता (संकर्षण,
वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि सांब) असा ‘पांचरात्र सिद्धांत’. या
सर्वांचा संबंध पुढे विष्णूशी जोडला गेला आणि त्यातूनच पुढे वैष्णव धर्माच्या
वाटचालीला सुरुवात झाली.
आपल्या
देवतेचे स्वातंत्र्य राखण्यासाठी आणि महत्त्व वाढविण्यासाठी विष्णूच्या अवतारांची
कल्पना अस्तित्वात आली. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण,
बुद्ध आणि कल्की ह्यांचा ‘दशावतार’ संकल्पनेत समावेश झाला. अनुरूप पती-पत्नींना
‘लक्ष्मी-नारायणाचा’ जोडा म्हटलं जातं. संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवता असणारी
‘लक्ष्मी’ विष्णूला प्राप्त झाली, ती त्याच्या कूर्म अवतारातच! समुद्रमंथनातून
प्राप्त झालेल्या अनेक रत्नांसोबतच ‘लक्ष्मी’ ही देवतांनी विष्णूला अर्पण केली.
-त्रिमूर्ती
संकल्पनेचा उदय-
अनेक देवता असल्या तरी सर्व देवतांमागे एकच शक्ती आहे तसेच देवतांचे
बाह्य रूप जरी वेगवेगळे असले तरी मूलतः त्या एकच आहेत, अशी भूमिका ठेवून
धर्मामध्ये निर्माण झालेले ३ मुलभूत प्रश्न असे की-
१.
सृष्टीची उत्पत्ती
कशी झाली? २. ती कशी चालते? ३. तिचा विनाश कसा होतो?
-
तर, सृष्टीची
उत्पत्ती ब्रह्म्यापासून झाली, ती चालविणारा आणि तिचे संरक्षण करणारा विष्णू व
तिचा ऱ्हास/विनाश करणारी देवता म्हणजे शिव. आणि मग शिवाने विनाश केल्यावर पुन्हा
सृष्टीची निर्मिती, अशा ह्या ३ भूमिका साकारणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश
यांच्या संयोगातून ‘त्रिमूर्ती’ देवता उदयास आली. ज्यातील ब्रह्मदेवापेक्षा शिव
आणि विष्णूला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
वेदातील
प्रथमतः अमूर्त स्वरूपातील देवता ‘रुद्रा’ला पुढे मूर्त स्वरूप प्राप्त झाले,
ज्यास आपण ‘शिव’ ह्या नावाने ओळखतो.
-अवतार व परिवार
संकल्पना-
अवतार
म्हणजे खाली येणे, अर्थात स्वर्गातून खाली येणे. ज्या देवाची आपण भक्ती करतो,
उपासना करतो तो देव वेळोवेळी आपल्या बचावासाठी / उद्धारासाठी योग्य ते रूप धारण
करतो अशी श्रद्धा लोकांमध्ये होती. अनेक लहान लहान देवतांची पूजा करणारे लोकही
समाजात होते. जसे की, मत्स्य, कुर्म, वराह इत्यादी. असे हे लहान लहान देव
विष्णूसारख्या मोठया देवतांचे अवतार म्हणून परिणत झाले. विष्णूबरोबरच शिवाचेही
भैरव वगैरे आदी अवतार निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, शिवाचे अवतार
निर्माण करण्यामध्ये विशेष यश प्राप्त झाले नाही.
विष्णूच्या संदर्भात, जे दशावतार मानले जातात किंवा इतर त्याच्या ज्या १०,
२४, ४२, ८२, १०८ अशा संख्येने ज्या यादया आहेत, ह्या अवतारांच्या कथा मूळ वैदिक
वांगमयातील इंद्र, प्रजापतीच्या कथांवरून घेतल्या गेल्या आहेत. मूळ कथांमध्ये
योग्य ते बदल करून त्या विष्णूला जोडल्या गेल्या.
शिव आणि
विष्णूमध्ये अवतार विषयक जसा भेद दिसून येतो तसाच तो आणखी एका संदर्भात दिसू येतो,
तो म्हणजे- ‘परिवार’. ज्याप्रमाणे, शिवाचा परिवार निर्माण होऊ शकला ज्यात पार्वती,
कार्त्तिकेय, गणपती यांचा समावेश होतो तसा, विष्णुबरोबर लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा
म्हणजे सर्वांनाच ज्ञात नसलेला असा ‘मदन’ होय.
-मूर्तिपूजा व
मंदिरे-
वैदिक
धर्मातील अमूर्त स्वरूपातील देवांपर्यंत अग्नी खरोखरंच आपली प्रार्थना, इच्छा
पोहोचवतो आहे का याविषयी शंका अथवा अनिश्चितता निर्माण होऊन तो मागे पडून पौराणिक
धर्मात आपल्या उपास्य देवतेचे असे स्वरूप ज्याला आपण पाहू शकतो असे सगुण साकार रूप
पुढे आले. म्हणजेच, आपल्या देवतेचे रूप, वर्णन दगडात मांडून त्याच्या मूर्तिची
पूजा करणे त्याची सेवा करणे, त्याच्यासाठी गायन करणे, नृत्य करणे यातून मूर्तिपुजेची
लोकप्रियता वाढली आणि त्याचे भव्य रूप म्हणजेच मंदिरांची स्थापना. ही मूर्ती आणि
मंदिरे म्हणजे भारतीय ‘प्रतीके’ आणि ‘स्थान माहात्म्य’ दर्शविणारे आहेत व अशा
प्रकारची पूजा ही बौद्ध, जैन धर्मातही होऊ लागली.
हीच पद्धत अवलंबविण्यासाठी आणखी ३ कल्पना उदयास
आल्या-
१.
तीर्थ: तीर्थ म्हणजे
नदी तरणे अथवा पार करून जाण्यासाठीचे ठिकाण. नैसर्गिक आश्चर्य म्हणून मानल्या
जाणाऱ्या काही ठिकाणांना देखील तीर्थ मानले जाऊ लागले कारण अशा ठिकाणी देवतांचा
निवास असतो असे मानतात. मग, अशा तीर्थांना भेटी देणे, तेथे येऊन पूजा करणे,
दानधर्म करणे हाही धर्माचाच भाग बनला.
२.
व्रत: प्रत्येकालाच
यज्ञ करणे शक्य नसल्याने मग त्याऐवजी धर्मासाठी संकल्पपूर्व आणि आणि शपथपूर्वक
काही गोष्टी करणे ज्या अगदी घरच्या घरी माणूस करू शकतो ते म्हणजे व्रत.
३.
भक्ती: भक्ती हा ‘भज’ शब्दापासून तयार
झालेला शब्द ज्याचा अर्थ विभागणे असा होतो. केवळ इच्छाप्राप्ती, समृद्धी हा
ह्यामागचा उद्देश नसून देवत्वाचा भाग बनून राहणे, त्याच्या गुणांचं गायन, प्रवचन,
किर्तनातून व्यक्त करणे, आपली वेदना त्याला सांगणे, त्याच्याशी मैत्री करणे
त्याच्यापाशी स्वतःला समर्पित करणे अशी ‘भक्ती’ नावाची संकल्पना अस्तित्वात आली.
धर्माच्या ह्या नव्या स्वरूपाबरोबरच नवनवीन तत्त्वज्ञान निर्माण होऊ लागले. वेदांना
मानणाऱ्या आणि त्यात परस्परविरोधी समन्वय साधू इच्छीणारी अशी सहा अस्तिक आणि
वेदांना न मानणारी अशी चार्वाक, जैन आणि बौद्ध अशी नास्तिक दर्शनेही उत्पन्न झाली.
वेदांवर आधारित वांगमयांवर पौराणिक धर्माचे वांगमय निर्माण केले गेले. त्यात
मुख्यत्वे रामायण, महाभारत, पुराणे यांचा समावेश होतो. असा वैदिक ते पौराणिक
धर्मापर्यंतचा प्रवास सर्वांगांनी साधला गेला.
संदर्भसूची:
१. ‘संस्कृती परिचय': प्राचीन भारतीय संस्कृतिविषयक लेख संग्रह, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, पौराणिक धर्म- श्रीनंद बापट, पृष्ठ क्र. ६९
Swarada dhekane (M.A Bharatanatyam & pursuing degree in M.A Indology) |
Comments
Post a Comment