कलाकारांच्या आरोग्यसमस्या: भाग २ (नृत्य)
लेखक: डॉ. हिमांशू वझे
फोटोग्राफी: मधुवंती सुंदरराजन, edited by: संवाद |
नृत्य कलाकारांच्या समस्या:
व्यावसायिक नृत्यकलाकाराची शारीरिक कसोटीच्या निकषांवर आधारित तुलना व्यावसायिक athlete शीच होऊ शकते. शिवाय कलाकाराला सादरीकरणात हालचालींमधून नजाकत आणि देहबोलीतून भावप्रकटीकरणही करायचं असतं. पाश्चिमात्य नृत्यशैलीमध्ये अनेकदा उंच उडी मारणं, दोन्ही पाय विविध कक्षांमध्ये समांतर व असमांतरपणे ताणणे, चवड्यांवर उभं राहणं, वेगवान कमान टाकणं अथवा चवड्यावर गिरकी घेणं असे प्रकार केले जातात. भारतीय घेणं, मेरूदंडाच्या सर्व कक्षांमधील हालचाल यांचा अंतर्भाव असतो. या सर्व क्रियांमध्ये शरीरातील अस्थिबंधांवर वारंवार ताण पडून 'chronic repetitive injuries' ना सामोरं जावं लागतं.
भारतीय नृत्यशैलीमध्ये पाऊल जमिनीवर सतत आपटलं जाऊन पाय कडक होतो. अनेक वेळा तळपायाच्या अधिभार केंद्रांना (pressure points) कुरूप होतं. तळपाय मऊ राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पावलं चिमूटभर मीठ टाकलेल्या गरम पाण्यात दहा-पंधरा मिनिटं बुडवून ठेवावीत व त्यानंतर टणक झालेला भाग खरखरीत घासणीने घासावा. त्यानंतर पाय पूर्ण कोरडे होईपर्यंत टॉवेलने पुसावे. तळपाय कायम मऊ व भेगारहित राहण्यासाठी कोकमाच्या तेलाने मालिश करावं. नृत्याच्या रियाझामध्ये पावलाच्या धनुष्याकृती बाक (arch) कमी होत जातो आणि पावलं सपाट (flat foot) होण्याची शक्यता असते. त्यामुळे टाचदुखी होऊ शकते. हे टाळण्यासाठी रियाझानंतर पावलांची बोटं जमिनीवर संथपणे पुढे-मागे करावीत. बोटं संपूर्ण मागे खेचल्यावर त्या अवस्थेत पाच-दहा सेकंद थांबावं. अशी १५-२० आवर्तनं दररोज करावीत. वज्रासन, पद्मासनासारख्या आसनांचाही याकरता उपयोत होतो. टाच, तळपाय तसच पायांमधील इतर सांध्यांच्या सुरक्षिततेसाठी नृत्याचा रियाझ लाकडी मंच, टर्फ किंवा मृदू जमिनीवर करावा.
नृत्यामध्ये घोट्याचा व गुडघ्याला दुखापती होऊ शकतात. घोट्याच्या सांध्यांमध्ये कुठलाही स्नायू नसतो. घोट्याच्या सांध्याला बळकटी देण्यासाठी पोटरीच्या स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम करावेत. त्याकरता अधूनमधून टाचा उचलून चवड्यांवर चालावं, खुर्चीवर बसल्यावर पावलं जमिनीवर बाहेरच्या बाजूला वळवून टाचा उचलाव्यात. घोट्याच्या दुखापती टाळण्यासाठी उंच टाचेच्या चपला टाळाव्या. क्वचित प्रसंगी नाइलाज असल्यास platform sandals वापरावे. आपल्या नृत्यशैलीमध्ये मांडीच्या पुढचा स्नायू जास्त वापरला जाऊन, त्या स्नायूच्या टोकाकडचा भागाला सूज येते (quadricep tendinities). ती घालवण्यासाठी त्या स्नायूला विश्रांती मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्धी स्नायूची म्हणजेच मांडीच्या मागच्या बाजूच्या hamstring ची ताकद वाढवणारे व्यायाम करावे लागतात. बसल्याबसल्या टाच खुर्चीवर मागे दाबत राहणे किंवा जिममधल्या leg curls च्या व्यायामाचा उपयोग होतो. 'ताइची चुआन' सारखे पौर्वात्य पारंपरिक व्यायामही quadricep-hamstring मधील ताकदीचं संतुलन राखण्यास उपयुक्त असतात.
काही नृत्यप्रकारांत शरीराची घड्याळकाट्याप्रमाणे आणि त्याविरुद्ध होणाऱ्या गोलाकार हालचालींमध्ये (clockwise & anticlockwise rotation) समतोल नसतो. त्याचा मेरूदंडावर परिणाम होऊन शरीराच्या एका बाजूला जास्त ताण राहतो. तसंच पुढं वाकण्याच्या तुलनेत मागं वाकणं कमी पडलं तरी पाठीचा त्रास सुरू होतो. रियाझामध्ये तत्कार करताना अथवा मुद्रांमध्ये विराम घेताना पायाच्या सांध्याबरोबरीनं पाठीतूनही वेदना सुरू होऊ शकतात. पाठीचा त्रास टाळण्यासाठी भुजंगासन, धनुरासन, शलभासन आदींच्या नियमित अभ्यासाचा फायदा होतो. नृत्यकलाकारांनी वजन आटोक्यात ठेवणं अत्यावश्यक आहे. त्याकरता न्याहरी भरपूर घ्यावी पण दुपारच्या व रात्रीच्या जेवणात फळे, फळभाज्या, पालेभाज्या, salads सारखे जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ घ्यावेत. हृदयाची गती वाढलेली ठेवणारे एरोबिक व्यायाम आपल्या आवडीनुसार तीस मिनिटांहून जास्त काळ आठवड्यातून तीन ते पाच वेळा करावेत. वाढलेल्या वजनानं नृत्याचा रियाझ करणं हे दुखापतींना निमंत्रण पाठवणं आहे.
( to be continued...
Part III Drama will be publish tomorrow)
[ प्रस्तुत लेख लेखकाच्या परवानगीने ललित कला केंद्र, सा. फु. पुणे विद्यापीठ तर्फे प्रकाशित 'प्रयोगकलावैद्यकशास्त्र' या पुस्तकामधून घेण्यात आला आहे. ]
Comments
Post a Comment