अभिनयदर्पण : संक्षिप्त विचार

लेखिका : भाग्यश्री प्रभुदेसाई 


भारत देशाचा इतिहास संक्रमणात्मक म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु या संक्रमणामुळे कलाविश्वात अनेक चांगले बदल झाले. नर्तन या कलेबाबतची भारताची समृद्धी पूर्ण विश्वाला भुरळ पाडावी अशी आहे. अगणित लोकनृत्ये व एक किंवा दोन नाही तर सात प्रमुख प्रगत नर्तनशैली आज भारतात नांदत आहेत. या सर्व शैलींना त्यांच्या व्यापक परंपरा असल्या तरी , सर्वांना पायाभूत असा एक सविस्तर आद्य प्राचीन ग्रंथ आहे तो म्हणजे भरताचे नाट्यशास्त्र! यात भरताने नाट्य, नृत्य, नृत्त, वादन, गायन या सर्व विधींची सविस्तर चर्चा केलेली आहे. भरतमुनींप्रमाणे इतर अनेक ग्रंथकारांनी पुढे या विषयांवर काही प्रमाणात किंवा वेगळे मुद्दे मांडून चर्चा केलेली दिसते. या ग्रंथकारांपैकी ‘नंदिकेश्वर’ या ग्रंथकाराचे योगदान मोलाचे आहे. नंदिकेश्वरांचे ‘भरतार्णव’ व ‘अभिनयदर्पण’ हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अभिनयाचे संकेत, विनियोग व व्याख्या, यांसह अभिनयाशी निगडित सिद्धांत, यांची चर्चा असलेल्या अभिनयदर्पण ग्रंथाचा संक्षेपाने विचार आपण करणार आहोत.

नंदिकेश्वरांच्या नावावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत व त्यांची विविधं नावेही दिसतात. जसे नंदिश, नंदि,नंदिभरत ज्यामुळे नंदिकेश्वर एक होते की अनेक असा अभ्यासकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा. नंदिकेश्वरांच्या काळाबाबतही विद्वानांमध्ये अनेक मतभेद आहेत. परसनाथ द्विवेदि यांनी त्यांच्या आचार्य नंदिकेश्वर और उनका साहित्य या ग्रंथात नंदिकेश्वरांच्या काळाबाबत बरीच चर्चा केलेली दिसते. त्यांनी नंदिकेश्वरांचा काळ इ.स.पूर्व सहावे शतक मानले परंतु अनेक विद्वान त्यांचा काळ इ.स.चे दुसरे शतक मानतात. ग्रंथात भरतमुनींचा उल्लेख पहाता नंदिकेश्वर भरतमुनींनतर असावेत असेच वाटते. नंदिकेश्वर दाक्षिणात्य असावेत या विषयी सर्वच संशोधकांचे एकमत आहे; कारण अभिनयदर्पण या ग्रंथाच्या सर्व हस्तलिखित प्रती मुळात संस्कृत भाषेत व तेलगू लिपीत लिहिलेल्या आहेत. अभिनयदर्पण ह्या मार्मिक नावाची पंडिता रोहिणी भाटे यांनी ‘नटनकलेच्या आविष्कारात जीवनाचे पदोपदी उमटणारे प्रतिबिंब यथार्थ आहे याचा पडताळा देणारा दर्पण (आरसा) होय’. अशी अत्यंत सुरेख व्याख्या केली आहे. या ग्रंथाचा मुख्य विषय केवळ नृत्य व या विधेच्या कक्षेत येणारा अभिनय हा व एवढाच आहे.

या ग्रंथात लक्षण व विनियोग श्लोक धरून साधारण ३२४ श्लोक आहेत. ग्रंथात अध्याय किंवा प्रकरणे असा प्रकार नाही तर ५० मद्द्यांचा विचार नंदिकेश्वरांनी केलेला आहे.

ग्रंथाची सुरुवात शिवाला चार अभिनयांमार्फत (आंगिक,वाचिक,आहार्य,सात्त्विक) वंदन करून केलेली आहे. कोणताही ग्रंथकार आपल्या इष्टदेवतेला नमन करून ग्रंथ पूर्ण व्हावा या उद्देशाने आशीर्वाद घेतो, येथे शिवाला आदिनटाच्या स्वरूपात कल्पून त्याला केलेले वंदन आहे. या नंतर नाट्याची उत्पत्ती कशी झाली ह्याची नाट्यशास्त्राप्रमाणेच कथा सांगितली आहे. यानंतर नाट्यप्रशंसा, नटनभेद ह्यांचा उल्लेख केलेला दिसतो. नृत्य, नाट्य कधी करावे. त्याचा काळ काय असावा ह्याचा विचार नटनप्रयोगकालात केलेला दिसतो. या नंतर नाट्य, नृत्त,नृत्य यांचा लक्षणे सांगितली. ग्रंथात नृत्याची व्याख्या ‘रसभावव्यञ्जनादियुक्तं नृत्यमितीर्यते।‘ अशी केली. ह्यात रस, भाव, व्यंजना इ. नाटकाच्या संदर्भातल्या तत्त्वांचाही उल्लेख केलेला आहे व तो योग्यच वाटतो. यानंतर येणाऱ्या सभापति लक्षण, मंत्रि लक्षण, सभा लक्षण, सभारचना हा भागात आदर्शनृत्य प्रस्तुत करण्यासाठी आदर्श जागा, परिस्थिती कशी असावी ह्याचे विवेचन आहे. पात्र लक्षण शीर्षकाखाली सामान्यतः नर्तकीच्या व्यक्तिमत्वातील गुण सांगितले आहेत. ह्यातील ‘कुशला ग्रहमोक्षयोः’ असे विशेषण नर्तकीच्या आवर्जून केलेल्या अभ्यासाकडे बोट करतो. ग्रह- धरणे व मोक्ष- सोडणे. नर्तकीने किती वेळ भावाभिमुख व्हायचे व कधी त्यातून बाहेर यायचे याचा उत्तम विचार येथे दिसतो, हे अतिशय उत्तम विवेचन पंडिता रोहीणी ताईंनी त्यांच्या ग्रंथात केलेले दिसते. नर्तकीचे गुण सांगितल्यावर येणारे वर्जपात्र लक्षण अनावश्यक वाटते.

यानंतर अतिशय मार्मिक नाव देऊन पात्रप्राण नंदिकेश्वरांनी सांगितले. नर्तकीमध्ये प्राण असावा तितके महत्त्वाचे गुण ह्यात सांगितले. जव- वेग, स्थिरत्व- थांबणे, वेग व स्थिरता यांचे संतुलन साधता येणे, जागृत बुद्धि, वाचाप्रभुत्व व गायन हे जणू नर्तकीचे प्राण आहेत. किंकिणी लक्षणात घुंगरू किती असावेत, ते कोणत्या धातूचे असावे, त्याचा नाद कसा असावा ह्याचा विचार केलेला दिसतो. प्रार्थनादिकम् रंगाधिदेवतास्तुती व पुष्पांजली ह्यामधून इष्टदेवतेला, रंगदेवतेला व प्रेक्षकांना केलेले वंदन होय. नटनक्रमात नृत्यप्रयोगात कोणत्या अंगांच्या, उपांगांच्या व प्रत्यंगांच्या द्वारे कोणते कार्य होते ते सांगितले. नंदिकेश्वराने याचा उत्तम विचार केलेला दिसतो. ते म्हणतात, ‘जेथे हस्त जातो,तेथे दृष्टि जावी, जेथे दृष्टि जाते तिथे मन एकाग्र व्हावे यामुळे भाव निर्माण होतो व भावातून रस निर्माण होतो.’ यानंतर अभिनयाच्या चार प्रकारांच्या व्याख्या, आंगिक अभिनयाच्या अंग,उपांग,प्रत्यंग ह्याची लक्षणे सांगितली. शिर(डोके), दृष्टि (डोळे), ग्रीवा(मान) ह्यांच्या हालचालींचे वर्णन केलेले आहे. भावाभिनयात महत्त्वाचे स्थान असलेल्या दोन प्रकारच्या हस्तमुद्रांची लक्षणे व त्यांचे विनियोग ह्याचा विचार केलेला दिसतो.

दर्पणकारांनी संयुत (दोन्ही हातांनी केल्या जाणाऱ्या) व असंयुत (एका हाताने केल्या जाणाऱ्या) हस्तमुद्रांचा विचार केलेला आहे. असंयुत हस्तमुद्रा अठ्ठावीस व संयुत हस्तमुद्रा तेवीस सांगितल्या आहे. प्रत्येक मुद्रेचे लक्षण म्हणजेच ती मुद्रा कशी करावी व नंतर त्याचा विनियोग म्हणजे त्याचा वापर कुठे करावा ह्याचा विचार करतो. मुद्रा काय निर्देश करताना वापरावी हे सांगताना सप्तमी विभक्तिचा वापर केलेला आहे. उदा. पताके(ध्वज दाखवताना), फलके(फळा दाखवताना) सप्तमी विभक्तिचा वापर निर्देश करण्यासाठीही केला जातो व त्याचा योग्य वापर दिसतो हे भाषावैशिष्टिय. यानंतर पुराणकथा व मूर्तिकलेत प्रतिबिंबित झालेल्या प्रमुख देवता, दशावतार हस्तांचे वर्णन दिसते. राक्षस व चारही वर्णांचे जातिहस्त सांगितले. त्यापाठोपाठ नातलगांसाठीचे म्हणजेच नातं सांगणाऱ्या हस्तमुद्रांचा विचार केला. नृत्तहस्तांमध्ये केवळ तालरूपात सादरीकरण करण्यासाठी ज्या हस्तांचा वापर केला जातो त्याचा विचार केला आहे. नंतर नवग्रह हस्तांचे वर्णन येते. पादभेद या ग्रंथाच्या शेवटच्या भागाला सुरुवात होते. पादभेदात पायांच्या स्थितींचे प्रकार, उत्प्लवनभेदात उड्यांचे प्रकार, भ्रमरीमध्ये चक्रींचे प्रकार व शेवटी चारी व गती भेद सांगितले. चारी म्हणजे चालणे ह्यात निरनिराळ्या चालींचा विचार केला आहे. गतीभेदात मानवी व काही प्राण्यांच्या गतीचा विचार केला आहे. सिंहाची किंवा हरणाची चाल कशी असावी इ. येथे मात्र गतिभेद, चारीभेद, भमरीभेद कसे करायचे ह्याचे वर्णन केलेले आहेत परंतु त्याचे विनियोग सांगितलेले दिसत नाहीत. गतीभेदांबरोबर ग्रंथ येथे समाप्त होतो.

हा ग्रंथ संक्षेपाने नृत्याशी निगडित असलेल्या अभिनयाचा विचार करतो. विवेचन नाही. एखाद्या ग्रंथाचा विस्ताराने खोलवर अभ्यास असावा व नंतर त्यातील तथ्ये बाजूला करावी तसा हा प्रकार आहे. एकूण नाट्यशास्त्राचा अभ्यास असल्यास त्या आधारेच हा ग्रंथ रचला हे लक्षात येईल. अनेक ठिकाणी ‘इत्याहुर्भरतादयः’ किंवा ‘इत्युक्ताः पूर्वगैर्भरतादिभिः’ म्हणजेच असे भरतादि श्रेष्ठ लोकांनी सांगितले असे स्पष्ट म्हणून कर्त्याचे श्रेय नंदिकेश्वरांनी स्वतःकडे घेतले नाही हे एक वैशिष्ट्य. आजच्या काळातील नर्तकींना ग्रंथाचा अभ्यास अभिनय गुण वाढविण्यास पोषक आहे ह्यात शंका नाही.




सौ. भाग्यश्री प्रभुदेसाई 
एम.ए संस्कृत, नृत्य विशारद

Comments

  1. Your blogs and other posts on you tube are very information. One special thing i would like to mention here is that you keep on posting different aspects of the music and dance. I wonder efficiently are managing this with association of these great masters. Very best wishes to your future endeavors...

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts