'सोहळा शरीरांचा'
जून 2009 : पोलंडचे विख्यात
नाट्य-दिग्दर्शक येर्झी
ग्रोटोव्स्की यांना जाऊन दहा वर्ष झालीत. म्हणून तिथल्या ग्रोटोव्स्की संस्थेनं 2009 हे ग्रोटोव्स्की वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं, ह्या वर्षात एक मोठा नाट्यमहोत्सवही भरवायचं ठरवलं. ग्रोटोव्स्कीसोबत काम केलेल्या, त्यांना मानणाऱ्या सर्व दिग्दर्शकांना आपापल्या एका नाटकासह
व्रत्स्वा ह्या शहरी येण्याचं आमंत्रण होतं. त्यात युजेनिओ बार्बा होते, पीटर ब्रूक होते, तादाशी सुझुकी
होते, इतरही अनेक होते. त्यात आणखीही एक नाव होतं, ते वाचून अनेकांच्या भुवया विस्फारल्या गेल्या. ‘हा ग्रोटोव्स्की
महोत्सव आहे ना ? मग हे नाव कसं ?’ असं त्यांचं म्हणणं होतं. ते नाव होतं – पिना बाऊश, जर्मनीतील एक
नृत्य-दिग्दर्शक.
14 जून ते 30 जून, व्रत्स्वा शहरात जगभरातून आलेल्या नाटकवाल्यांची लगबग सुरू होती. नाट्यप्रयोग, तालमी, कार्यशाळा, व्याख्यानं, जाहीर मुलाखती, प्रदर्शनं, औपचारिक-अनौपचारिक चर्चा असा भरगच्च कार्यक्रम होता. रस्त्यांवरच्या उपहारगृहांमध्ये नाट्यप्रयोगांविषयीच्या
चर्चा झडू लागल्या होत्या, वादविवाद होऊ लागले होते.
26 जून : ग्रोटोव्स्की
संस्थेचा एक कार्यकर्ता भेटला, तो म्हणाला, ‘28, 29 आणि 30 जून, तिन्ही दिवसांचे पिना बाऊशचे शो हाऊसफूल आहेत, म्हणून आम्ही तालमीच फक्त पाहू शकणार आहोत.’
27 जून : रात्री तो कार्यकर्ता रस्त्यात भेटला. त्याला विचारलं, ‘काय, कशी वाटली तालीम ?’ तो स्वतः
रंगभूमीचा अभ्यासक आणि नट होता. तो म्हणाला, ‘हे काहीतरी जगावेगळंच आहे. पण त्याला नृत्य का म्हणतात ? ते तर नाटकच आहे.’
28 जून : मी आज रिचर्ड
शेखनर ह्यांनी दिग्दर्शित केलेलं चिनी हॅम्लेट पाहणार होतो. परंतु बरेचसे परिचित मात्र पिना बाऊशला जाणार होते. प्रयोगानंतर विशिष्ट ठिकाणा भेटायचं ठरलंच होतं. मी हॅम्लेट पाहून आलो. ह्या महोत्सवातलं हे चौथं हॅम्लेट होतं. त्यामुळे कितीही टाळायचं म्हटलं, तरी मनातल्या मनात तुलना होतच होती. आणि पिना बाऊश बघायला गेलेले धिंगाणा घालत आले. हो, ते धिंगाणाच घालत होते. ते बेफाम झाले होते. त्यांच्यात दोन
गट पडले होते. एका गटाला हा
कार्यक्रम खूपच आवडला होता, तर अर्थातच दुसरा गट त्याच्या विरुद्ध होता. पहिला गट, सुपरलेटिव्हमधल्या विशेशणांची उधळण करत होता, तर दुसऱ्या गटाचे प्रश्न असे होते – ‘ह्याला नृत्य का
म्हणावं ? छान छान हालचालींमधून ते क्रौर्य कसे दाखवू शकतात? एका प्रसंगाचा दुसऱ्या प्रसंगाशी संबंध काय ? एकेका प्रसंगाचा प्रेक्षकांनी काय अर्थ घ्यावा ? दिग्दर्शिकेला नेमकं काय म्हणायचं आहे ? हे पॉलिटिकली
करेक्ट आहे काय ? स्त्री-दिग्दर्शक असून हे स्त्रीविरोधी नाही का ? आणि अनेक. मी जास्त रस घेतला नाही. मला कुठलाही पूर्वग्रह करून घ्यायचा नव्हता.
29 जून : संध्याकाळी ऑपेरात पोचलो. साधारण दिडशे वर्षांपूर्वीची इमारत, नुकतेच नूतनीकरण केलेली. माणसांनी तुडुंब भरलेली होती.
तिसरी घंटा झाली. कार्यक्रम सुरु झाला. त्याचं नाव होतं – नेफेस. हा तुर्की भाषेतला शब्द, त्याचा अर्थ श्वास असा होतो. वीस नर्तक – त्यातले दहा पुरुष, दहा स्त्रिया. एकेक करुन मंचावर येत होते. कुठली तरी क्रिया करत, कधी मंचवस्तूंसह तर कधी नुसतीच. क्रिया म्हटलं तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या होत्या, पण त्या ज्या नेमकेपणानं सादर होत होत्या – त्यांना तोड नव्हती. पुन्हा एक क्रिया आणि दुसरी क्रिया यांचा वरवर कुठलाही संबंध दिसून येत नाही. एका क्रियेतून दुसरी क्रिया आपोआप उमलत जाते. दुसरीतून तिसरी आणि तिसरीतून पुन्हा पहिली. अशी एखादी वेलबुट्टीची नक्षीच.
नर्तकांच्या हालचाली अतिशय संयत. एखादी हालचाल करायला जेवढ्या स्नायूंची आवश्यकता
तेवढ्यांचाच वापर. त्यात अतिरेक
नाही. महत्त्वाचं
म्हणजे प्रत्येक हालचाल देखणी, सौष्ठवपूर्ण असली तरी ती केवळ असंकरणाकरता, देखणेपणाकरता नाही. कुठल्याही चिन्हभाषेचा, मुद्रांचा उपयोग नाही. काही सांगण्यासाठी, पोचवण्यासाठी
शरीरभाषेचा उपयोग नाही, तर शरीराच्या
हालचाली म्हणजे त्रिमित अशा मोकळ्या अवकाशातील मुक्त हालचाली. त्यात अनेक विरोधाभास भरलेले. कधी सशक्त तर कधी नाजूक, कधी क्रूर, पाशवी वाटतील अशा हालचाली; तर कधी अलगद, सहज हालचाली. काही मोठ्ठ्या हालचाली – मोठ्या आवाक्याच्या, अवकाश
व्यापणाऱ्या, तर लगेचच पुढच्या
काही सुक्ष्म – छोट्या
आवाक्याच्या, एकाच जागेवरच्या. काही हालचाली अतिशय संवेदनशील, विविध भावनांनी ओतप्रोत भरलेल्या, तर काही केवळ हालचाली. तर धीरगंभीर, तर काही मजेशीर. शरीराच्या तोलाशी
विविध प्रकारे खेळत, शरीरातील उर्जेचे
संधारण आणि संवर्धन करत केलेल्या या हालचाली म्हणजे शरीरांचा सोहळाच.
नेफेसच्या तालमी झाल्या त्या
तुर्कस्तानातील इस्तंबूल शहरी. त्यामुळे इस्तंबूल शहर आडवाटेनं नाही, तर थेटच ह्या कार्यक्रमात शिरलंय. तिथले हमाम (सार्वजनिक
न्हाणीघरं), सौक (बाजार), बेसिलिका सिस्टर्न (जमिनीखालचा राजवाडा), हरितपट्टे, ट्रॅफिकने भरलेले रस्ते – सगळेच इथे हजेरी लावतात. त्यांचे छोटे-छोटे तपशील येतात, त्यानुसार
मंचवस्तू येतात. त्यानुसार
माणसांचा वर्तन-व्यवहार येतो. हळूहळू हे बाह्य तपशील पुसट होत जातात आणि मनुष्य स्वभाव
ठळक होत जातो. आदीम-प्रेरणांचा व्यापार सुरु होतो. मर्जान देदे या तुर्की संगीतकाराच्या रचना ह्या रोजच्या
हालचालींमधून साकारलेल्या नृत्यसाखळीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
कार्यक्रमानंतर नर्तकांशी संवाद साधला. त्यातून पिना बाऊशचा जीवनपट उलगडला. 1940 मध्ये जर्मनीत त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी नृत्य शिकायला सुरुवात
केली. कर्ट जॉस या
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाकडे नृत्याचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर त्याअमेरिकेत
ऍन्थनी ट्युडोर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास गेल्या. तीन वर्ष अमेरिकेत शिकून देखील त्यांच्या नृत्यरचनांवर
प्रभाव होता तो युरोपिअन संवेदनांचाच. व्हूपेरतल या उद्योगनगरीत टांझथिएटर नावाची संस्था स्थापन करून त्यांनी
नॉत्याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली.
आजकालच्या युगात, दैनंदिन जीवन जगताना आपल्याला कोणत्या समस्या येतात; माणसाचा एकटेपणा, नातेसंबंध, प्रेम, आपलेपणा, हेवेदावे, मत्सर, क्रोर्य आणि मुख्य म्हणजे समाजातील स्त्रीचे स्थान अशा
आशयसुत्रांवर त्यांनी मुख्यत्वेकरुन काम केलंय. त्यांच्या सर्व नृत्यरचनांमधील निवेदनांचा मुख्य धागा
शरीराची हालचाल हाच असतो. विविध नाट्यमय
प्रसंगांच्या साखळीमधून त्यांचे नृत्यप्रयोग साकारत जातात. बऱ्याचदा शब्दांशिवाय, पण शब्दांशी वैर नाही. त्यांच्या नृत्यात विविध नृत्यपरंपरांचा संगम दिसतो. त्यांच्या प्रत्येक नृत्यरचनेच्या केंद्रस्थानी
मनुष्यस्वभाव असतो, स्त्री-पुरुष संबंध असतात. कधी अभिव्यक्ततावादी(expressionist) तर कधी अतीवास्तववादी (surrealist) पद्धतीने हे
प्रसंग साकारले जातात. त्या म्हणतात, ‘मनुष्याची हालचाल
कशी होते यात मला रस नाही, तर ती हालचाल कशामुळे होते हा माझा नृत्याचा विषय आहे.’
त्यांच्या कोणत्याही नव्या
नृत्यरचनांच्या तालमींची सुरुवात नर्तकांना प्रश्न विचारत होते. त्यांच्या जीवनाबद्दल, आठवणींबद्दल. त्यातून ते छोटे-छोटे नाट्यप्रसंग
सादर करतात. त्याला संगीताची
जोड देतात, प्रसंगांची
मांडणी करतात आणि त्यातून मग नृत्याचा कार्यक्रम साकारत जातो.
चर्चेदरम्यान वीस जणांच्या त्या
वृंदातील एक नर्तक म्हणाला, ‘आमच्या नृत्याचं आणि पाण्याचं गहिरं नातं आहे. आमच्या नृत्यरचनांमध्ये पाणी असतंच. आमच्यासाठी ती कोणती संकल्पना नाही, आमचा घटक आहे. पाणी म्हणजे आमचा एकविसावा नर्तक आहे.’
30 जून : सकाळ झाली, तरी रात्रीच्या कार्यक्रमाची धुंदी कमी झालेली नव्हती. आज महोत्सवाचा शेवटचा दिवस. सकाळी रिचर्ड शेखनर यांचे व्याख्यान आणि दुपारी त्यांची
जाहीर मुलाखत होती. व्याख्यानानंतर
त्यांना भेटलो. ते भारताविषयी, नाट्यशास्त्राविषयी, पुण्याविषयी भरभरुन बोलले. त्यांच्यासोबत जेवायला गेलो. पिना बाऊशचा विषय निघाला. ते म्हणाले, ‘प्रयोगकला म्हणजे जणू मोठी इमारत असते. नाटक म्हणजे त्यातली एक खोली, नृत्य म्हणजे दुसरी खोली. पिना बाऊशच्या कार्यक्रमाला काय म्हणाल, नाटक की नृत्य ? तिचे कार्यक्रम कुठल्याही एका खोलीपुरते मर्यादित नाहीत. ते इमारतीतले आहेत. व्याख्येत कशाला अडकायचं ? पण जे काही ती
रंगमंचावरुन करते, ते थक्क करणारं
असतं.’
जेवणानंतर मुलाखतीसाठी नाटकघराकडे गेलो. तिथे नेहमीचीच गडबड. एक जण आमच्या जवळ आला नी म्हणाला, ‘आज सकाळी पिना बाऊश गेल्या. त्यांना कॅन्सर होता.’
संध्याकाळ: नेफेसचा प्रयोग रोजच्याच जोशात पार पडला. नर्तक रोजच्याप्रमाणेच धुंद-फुंद होऊन नाचले. त्यांच्या शरीर-हालचालींच्या
सोहळ्याने प्रेक्षक बेभान झाले. प्रयोगानंतर जवळजवळ वीस मिनिट टाळ्या पडच होत्या आणि प्रेक्षकांना अभिवादन करत
करत नर्तकांच्या डोळ्यांमधून पाण्याच्या धारा वाहत होत्या. वीस नर्तकांचे नृत्य संपल्यानंतर त्या दिवशी मंचावर
त्यांच्या पाणी नावाच्या एकविसाव्या नर्तकाचे आगळे नृत्य सुरु झाले होते.
- Dr. Praveen Bhole
Praveen Bhole is theatre-director and actor trainer and assistant professor at Lalit Kala Kendra, Savitribai Phule, Pune University. He has directed more than 50 plays in various styles and genres. He has authored a book on theatre history and has presented his papers in various national and international conferences.
Email ID: pradabho@gmail.com
फारच सुंदर अनुभव....कायम लक्षात राहील असा...शेअर केल्याबद्दल धन्यवाद सर...
ReplyDeletethanks Gauri..thats true....
ReplyDelete