वैकुंठनायका- जुन्या व नवीन अभंगांचा स्वराविष्कार


श्री संत सेवा संघ व समर्पित क्रिएशन्स् संतवाङमयाचा प्रसार करण्यासाठी नेहमीच अभिनव कार्यक्रम सादर करीत आले आहेत. रामायण- आदर्श समाज का स्वर्णचित्र, देखिला देवो, तीर्थ शिवराय, कैवल्याचा गाभा असे अनेक कार्यक्रम हरिभक्त व रसिकांसमोर यशस्वीरित्या आले आहेत. याच श्रुंखलेतील एक अभिनव कार्यक्रम- वैकुंठनायका जुन्या व नवीन अभंगांचा स्वराविष्कार... संतपरंपरा व संगीतपरंपरा यांचा पवित्र संगम एका व्यासपीठावर…

आपल्या भारत देशाच्या भूतकाळाकडे वळून पाहिले तर लक्षात येते की जेव्हा जेव्हा स्वार्थ आणि अहंकार या विकृतींनी समाजाला ग्रासले, तेव्हा तेव्हा याच भारतीय संस्कृतीने दिलेल्या त्याग, बंधुता, समता, समर्पण, संवेदनशीलता अशा ‘जीवनमूल्यांनीच’ समाजाला वारंवार तारले आहे आणि याच जीवनमूल्यांनी शिगोशिग भरलेल्या रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, सकल संतवाङमय व शिवचरित्र आदी ग्रंथसंपदेने यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या देशाचा इतिहास भावी पिढ्यांना कायम प्रेरणादायक ठरला आहे. आजही ते संतांचे जीवनदर्शी विचार व छत्रपती श्रीशिवरायांचे तेजस्वी जीवन समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यास नित्य सिद्ध आहेत व पुढेही राहीलच, हेच त्याचे स्वरूप आहे. मायभूमी पारतंत्र्यात असतानादेखिल स्वातंत्र्याची मशाल पेटवून गुलामगिरीतून मुक्त होण्याची प्रेरणा कित्येक अंत:करणात संतांनी केली. "नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" म्हणत भक्तशिरोमणी श्रीनामदेवरायांनी प्रत्येक जीवाला स्वस्वरूपाकडे जाण्याचा मार्ग दाखविला व समाजप्रबोधनही केले. संतांचे हे अभंग परंपरेने आपल्यापर्यंत आले. विविध काळात व विविध समाजात अवतार घेतलेल्या संतांनी एकच उपदेश विविध रसाळ अभंगांमधून आपल्याला दिला. 


त्याचबरोबर मनुष्याच्या भावनांना स्पर्शिण्याचे थोर सामर्थ्य आहे सुरांमध्ये! विविध रागांमधून त्याच्या मनात शांतता, आनंद, आर्तता असे भाव निर्माण करण्याचे अपार सामर्थ्य आहे संगीतात! संगीत ही कला अधिक सूक्ष्मतेकडे जाणारी आहे. त्यामुळेच भगवंताप्रत जाण्यासाठीचे, अंतर्मुख होण्यासाठीचे प्रभावी माध्यमही! या संगीत क्षेत्रातही अनेक श्रेष्ठ परंपरा निर्माण झाल्या. आपल्या अंतःकरणातील सोज्वळ भाव विविध परंपरांनी प्रकट करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले आणि रसिकांना पर्वणी प्राप्त होऊ लागली.
या दोन्ही परंपरांमध्ये महत्त्वाचा दुवा आहे ‘गुरु!' माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचि देव होय गुरु ही तर संतांची अनुभूती आहे. विविध क्षेत्रातील विविध परंपरांनी हेच तत्त्व आपल्या साधनेमध्ये पाळले त्यामुळेच आज यशोशिखरे गाठूनही ही मंडळी अत्यंत सात्विकतेने, पवित्रपणे, साधेपणान व नम्रपणे आपल्यामध्ये वावरताना देखिल दिसतात. आपल्या गुरुंकडून मिळालेल्या वारशाचे जतन करताना देखिल दिसतात. 


 सर्व क्षेत्रातील परंपरेचे व गुरुंचे महत्त्व अधोरेखित व्हावे म्हणून या आषाढी एकादशीला आपण वैकुंठनायका- जुन्या व नवीन अभंगांचा स्वराविष्कार हा कार्यक्रम सादर करीत आहोत. तीर्थांचा संगम हा पवित्रच असतो. या आषाढीसारख्या पावन दिनी संतपरंपरा व संगीतपरंपरा यांचा पवित्र संगम व्यासपीठावर अनुभण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात येतो.


 पं. भीमसेन जोशी, पं. जसराज व गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या गानतपस्वींच्या परंपरेतील आजच्या काळातील अध्वर्यू म्हणजे पं. आनंद भाटे , पं. संजीव अभ्यंकर व पं. रघुनंदन पणशीकर! संतांच्या अनुभवसिद्ध शब्दांचे आपल्या संगीतसाधनेच्या बळावर अप्रतिमरित्या नवीन चालींद्वारे भावपूर्ण पद्धतीने सादरीकरण हे वैकुंठनायका कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. आषाढीनिमित्त याच अभंग महोत्सवात या गानत्रयींच्या परंपरेतील 3 गायकांचीही अभंग मैफल आयोजित करण्यात आली आहे. पं. आनंद भाटे यांच्या परंपरेतील डॉ. आशीष रानडे (नाशिक), पं. संजीव अभ्यंकर यांच्या परंपरेतील धनंजय म्हैसकर (डोंबिवली) व पं. रघुनंदन पणशीकर यांच्या परंपरेतील सौरभ काडगावकर (पुणे) विविध अभंग सादर करणार आहेत.


तीन घराण्यातील डॉ. आशीष रानडे, धनंजय म्हैसकर व सौरभ काडगावकर या 3 गायकांच्या मैफिलीचे पहिले सत्र व त्यानंतर गुरु पं. आनंद भाटे, पं. संजीव अभ्यंकर व पं. रघुनंदन पणशीकर यांचे दुसर्‍या सत्रात अभंगगायन होणार आहे.


भक्ती , ज्ञान, योग, सत्कर्म , पावित्र्य , मांगल्य यांनी परिपूर्ण असलेली संतमंडळी भारतभूमीत आणि बहुसंख्येने महाराष्ट्रभूमीत निर्माण झाली केवढे भाग्य आपले! वेद, उपनिषदे, ब्रम्हसूत्रे , रामायण-महाभारतातील सर्वश्रेष्ठ ज्ञान, साधना, जीवनमूल्ये प्रपंचात राहूनही जीवनाचा अर्थ अद्वैताच्या दृष्टीने हस्तगत करवून देणारी, संतांच्या अनुभवातून प्रकट झालेली , नाथसंप्रदाय व वैष्णव संप्रदाय यांच्या मिलापातून उत्पन्न झालेली आपली दिव्य वारकरी परंपरा म्हणजेच भागवत संप्रदाय. तो निर्माण करणारे संत-महात्मे आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभले हा खरोखर परमेश्वराने दिलेला सन्मान आहे. अशा संतांच्या संवेदनशील अंत:करणातून जीवाच्या कळवळ्यापोटी जे सत्यवचन प्रकट होते त्या कधीही भंग न पावणार्‍या वाणीला, काव्याला,अनुभवाला अभंग म्हणतात. या भूमीत समाजातील सर्व स्तरात, स्त्री-पुरूष देहात संत झाले. या विविध समाजातील संतांनी आपल्या अनुभूतीतून अतिशय सहज सोप्या भाषेत भावमय असे अभंग रचून समाजाला मार्गदर्शन केले. अशा काही संतांच्या विविध अभंगांचे संकलन करून जीवन धर्माधिकारी यांनी संगीतबध्द केले आहेत. हे अभंग पं. रघुनंदन पणशीकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. आनंद भाटे यांच्या आवाजात आपल्यासमोर वैकुंठनायका- महाराष्ट्रीय संतांच्या अ-भंग शब्दांचा नवीन स्वराविष्कार या स्वरूपात आले आहेत.


संत जनाबाई, संत श्रीविठामहाराज, संत श्रीनिळामहाराज, संत श्रीचोखामेळामहाराज, संत श्रीनरहरी सोनार महाराज, संत श्रीसेना न्हावी महाराज, संत श्रीसावतामाळी महाराज, संत श्रीतुकाराम महाराज, संत श्रीज्ञानेश्वर महाराज, संत श्रीएकनाथ महाराज या संतांच्या रचना शुक्रवार, दि. 12 जुलै 2019 रोजी महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल, कर्वेनगर, पुणे येथे दु. 4.00 ते रात्री 9:30 या वेळेत पं. रघुनंदन पणशीकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. आनंद भाटे या दिग्गजांच्या स्वरात रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.

गुरू, गुरूकृपा, नाममाहात्म्य, परमात्मा,जीवदशा, आत्मज्ञान, मन, हरिभक्त अशा विविध विषयांचा अंतर्भाव असणारे हे अतिशय गोड अभंग आहेत.

संत जनाबाई ‘ अगा रूक्मिणीनायका‘ अशी आळवणी करीत भगवंताला साद घालत आहेत. भगवंताचे स्वरूप, कार्य, कार्याचा परिणाम याचे वर्णन करीत शेवटी “आपुली म्हणवुनि , अपंगावी दासी जनी“ असे मागणेही मागत आहेत. परमात्मा समोर आला; त्याच्या दर्शनाचा आनंद प्रकट करताना देहभान जरी हारपले तरी विवेक विचार हारपू न देता योग्य आणि हिताचेच मागणे मागितले आहे. संत श्रीसावतामाळी महाराजांच्या “समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे रहावे“ या अभंगात कोणत्याही योग्य, अनुकूल परिस्थितीत आनंदाने हुरळून न जाता, उन्मत्त न होता किंवा विपरीत परिस्थितीत दु:खाने, चिंतेने खचून न जाता अत्यंत स्थिरतेने,संयमितपणे सामोरे जात भगवंताच्या नामस्मरणात आकंठ बुडावे आणि जन्ममरणाच्या अनिवार चक्रातून अलगद मुक्त व्हावे ही शिकवण मिळते. सुंदर चालीतील आणि आवाजातील हा अभंग ऐकताना आपल्यावरही सद्गुरुकृपा होऊन त्या भगवंताच्या दर्शनाचा लाभ निश्‍चित होईल हा आत्मविश्वास मिळतो. संत श्रीज्ञानेश्वर महाराजांचा गुरुंचे सामर्थ्य, त्यांची कृपा व त्याचा परिणाम याचे वर्णन करणारा “गुरू हा संतकुळीचा राजा“हा अभंग व संत चोखामेळा महाराजांचा अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रम्ह सोज्वळ विटेवरी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या आवाजात हे अभंग असतील.
संत विठामहाराजांचा वैकुंठनायका-आनंदपददायका- यादवकुळटिळका आणि श्रीज्ञानेश्वरमाऊलींचा भगवंताच्या परमपवित्र नामाने भगवन्मय झालेल्या हरिभक्तांचे वर्णन, त्यांच्या रुपाचे, आनंदाचे आणि धर्मरक्षणाकरिता केलेल्या कार्याचे वर्णन करणारा “नरोहरि हरि हरिनारायण“ हा अभंग सर्व फारच सुंदर स्वरबध्द झाले आहेत. हे दोन्ही अभंग पं. रघुनंदन पणशीकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. आनंद भाटे यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहेत. अष्टांगयोग व नवविधाभक्तिचे वर्णन करीत मी पणा हारपण्याचा, व मनाला राममय होण्याचा अनुभव देणारा “मन हे राम झाले“ हा अभंग पं. रघुनंदन पणशीकर व पं. संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात तर संसाराची बाधा तोवरच जोवर त्या परमात्मा विठ्ठालाची कृपा झाली नाही हे आजूबाजूच्या विविध उदाहरणांतून दाखवून देणारा ,“जववरी रे तववरी“ हा अभंग पं. रघुनंदन पणशीकर व पं. आनंद भाटे यांच्या आवाजात आहेत. 


सामर्थ्य, पावित्र्य देणारे, शुध्द, शांत करणारे, ज्ञान व योग प्रदान करणारे,पाप नष्ट करणारे भगवंताचे नाम! नामाचा महिमा गाणारा संत श्रीनरहरि महाराजांचा “ नाम फुकाचे फुकाचे“ अभंग सहज गुणगुणता येणारा आणि मनाला प्रसन्नता देणार्‍या स्वरांमध्ये बांधला गेला आहे. पाण्यातील कमलपत्राप्रमाणे अलीप्त असणारे संत याच संसारात राहून त्यातील भय, चिंता, आसक्ती, अहंकार हे दोष अंत:करणात येऊ न देता अतिशय शुध्द राहतात आणि भगवंताशी एकरूप होतात. व्यसन म्हणजे व्यंग. संसारी होणे हेच व्यंग आहे. संत मात्र म्हणतात की या संसारातून मुक्त होता येते, त्यासाठी साधन म्हणजे कीर्तन! जगद्गुरू श्रीतुकाराम महाराजांच्या “संसाराचे अंगी अवघीच व्यसने“ या अभंगातून प्रपंचाला न घाबरता, कर्तव्यकर्म चोख पार पाडत या जीवनातील सत्य सहज हस्तगत करण्याचे धैर्य मिळते. परमात्मा परब्रह्म श्रीविठ्ठलाचे यथार्थ वर्णन करणारा संत श्रीएकनाथमहाराजांचा “विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा“ हे अतिशय गोड चालीतले अभंग पं. आनंद भाटे यांच्या स्वरात ऐकताना आपण तल्लीन होऊन जातो.
योग्यांची माऊली, ज्ञानियांचा शिरोमणी , साधकांचा मायबाप, विठोबाचा प्राणसखा, योगियांचा राजा , गुरु महाराव, समस्त विश्वाची माऊली श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे भावपूर्ण वर्णन करणारे, संत श्रीनिळामहाराजांचा “नमो ज्ञानेश्वरा“ व संत सेना महाराजांचा “श्रीज्ञानराजे“ हे अभंग पं. संजीव अभ्यंकरांच्या आवाजात ऐकताना सर्व चित्तवृत्ती शांत होऊन श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होतो.


या संगीतिकेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतवर्षातील अत्यंत उत्तुंग अशा गायनपरंपरा व स्वर्गीय आवाज लाभलेल्या गानश्रेष्ठांच्या आवाजात हे अभंग ध्वनिमुद्रित करण्यात आले आहेत. मेवाती घराण्याचे अध्वर्यु पं. जसराजजी यांचे शिष्य पं. संजीव अभ्यंकर यांनी या अभंगांना आपल्या आवाजाचा स्वरसाज चढविला आहे. भारतीय संगीतक्षेत्रातील स्वरभास्कर स्व. पं. भीमसेन जोशी यांचे योगदान विचारात घेतले असता, त्यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांनी गायलेले अभंग ऐकताना रसिकांना विलक्षण आनंदाचा अनुभव सहजच येईल. गानसरस्वती आदरणीय किशोरीताईंकडे स्वरसाधना, तप करून ज्यांनी आपल्या गुरूंच्या गायकीप्रमाणे स्वत:ला घडविले, असे पं. रघुनंदन पणशीकर! त्यांचे अभंग ऐकताना त्यांच्या तपाची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही.


अभंगांच्या अर्थाचे निरूपण लेखन श्री संत सेवा संघाचे संस्थापक पू. श्रीसंजय गुरुजींनी केले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये अभंगांचे निरूपण श्री संत सेवा संघाच्या विश्वस्त - स्वर्णिमाताई करणार आहेत.

थोडक्यात सांगायचे तर श्रेष्ठ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या स्वरसाधनेतून कसलेले आवाज, संतांचे ’शाश्वत’ अभंग आणि सोबत अभंगांचे निरूपण असलेले पुस्तक, असे ’वैकुंठनायका’ संगीतिकेतील अनोखे विचारधन खडके फाऊंडेशनने रसिकांसाठी या सी. डी.च्या रूपाने आणले आहे. अशा प्रकारच्या माध्यमांतून संतविचार समाजात सतत पेरत राहण्यास वचनबद्ध असलेल्या खडके फाऊंडेशनचे हे फार मोठे योगदान आहे.

वैकुंठनायका- जुन्या व नवीन अभंगांचा स्वराविष्कार
संगीत- जीवन धर्माधिकारी
गायक-
डॉ. आशीष रानडे, धनंजय म्हैसकर व सौरभ काडगावकर व पं. आनंद भाट े, पं. संजीव अभ्यंकर व पं. रघुनंदन पणशीकर
साथसंगत-
हार्मोनिअम- सौ. शुभदा आठवले, तबला- पांडुरंग पवार व प्रशांत पांडव , पखवाज- प्रसाद जोशी व मनोज भांडवलकर, तालवाद्य- माऊली टाकळकर व उद्धव कुंभार

शुक्रवार, दि. 12 जुलै 2019 आषाढी एकादशी, स्थळ- महालक्ष्मी लॉन्स्, राजाराम पूल, पुणे. वेळ- सायं. 5 ते रात्री 10


buy your ticket: https://ticketees.com/dramadetails/Vaikunthanayaka

 (श्म्याप्रस ग्रामशिक्षा अभियान या उपक्रमांतर्गत राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या लहान गावांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम गेली दीड वर्ष श्री संत सेवा संघाचे कार्यकर्ते करत आहेत. या ग्रामीण भागातील शिक्षणाला हातभार लागावा म्हणून वैकुंठनायका मधून निर्माण होणारा निधी वापरला जाणार आहे. आपले सर्वांचे यासाठी साहाय्य लाभावे..)


- नेहा भाटे







Comments