नृत्य परीक्षा पद्धती गरजेची आहे की नाही?

Writer: Sheetal Kapole

परवा एका घरगुती समारंभाच्या निमित्ताने आम्ही सर्व नातेवाईक जमलो होतो. अशावेळी खूप दिवसांनी भेटल्यामुळे खूप गप्पा रंगतात. लहान मुलांचे गाण्याचे, नृत्याचे, वादनाचे ‘परफॉरमन्स’ पाहायला मिळतात. माझ्या एका भाचीनेही असंच एका गाण्यावर उत्तम नृत्य करून दाखवले. सगळ्यांची वाहवा मिळवली. तिला विचारल्यानंतर तिने सांगितले की शाळेत ‘नृत्य’ हा विषय बंधनकारक आहे. आठवड्यातून दोन दिवस नृत्यवर्ग असतो. त्या दिवशी मी अजिबात शाळा चुकवत नाही. मला नृत्य करायला फार आवडते. शिवाय मी शास्त्रीय नृत्य वर्गातही जाते. तिकडे मी नृत्याची एक परीक्षाही दिली आहे.” ही सगळी तिची वाक्य ऐकून मला अतिशय आनंद झाला. म्हणूनच हा लेख लिहिताना त्या प्रसंगाची आठवण झाली.

हल्ली आपण सर्व इंटरनॅशनल स्कूल, सरकारी शाळा आणि इतरही अनेक शाळांमध्ये नृत्य, गायन, वादन ह्या कलांना विशेष महत्व दिल्याचे बघतो. अनेक शाळांमध्ये तर नृत्य हा बंधनकारक विषय असतो. ही खूपच चांगली गोष्ट आहे कारण ‘नृत्य’ ह्या विषयामध्ये प्रचंड ताकद आहे. नृत्यामुळे बुध्दी ही सर्वार्थाने विकसित होते.

खरंतर अनेक शाळांमधून केवळ नृत्य हा विषय नावापुरताच शिकवला जातो. शालेय शिक्षणाव्यतिरिक्त अजून एका कलेची ओळख एवढयाच तोकड्या विचारांतून त्या विषयाची निवड केलेली दिसून येते. नृत्य शिकवणारी व्यक्ती ‘डान्स टीचर’ त्या ताकदीची आहे कि नाही, जो नृत्य प्रकार मुलांना शिकवण्यात येणार आहे त्याचे महत्व काय आहे? ती नृत्यशैली मुलांना का शिकवावी? याचे भान दुर्दैवाने काही शाळांच्या मुख्याध्यापकांना नसते. केवळ एक ‘Activity’ म्हणून नृत्याकडे पाहू नये. कारण नृत्य हा शारीरिक व्यायाम आहे, मानसिक शांतता, आनंद आहे, तर वैचारिक भावना आहे.

हुशारीचे जे नऊ प्रकार मानसशास्त्रात सांगितले आहेत ते सर्व नऊ प्रकार नृत्य ह्या एका प्रकारात समाविष्ट होतात. हे अभिमानाने सांगता येईल. करण नृत्य म्हटलं की गणित येतं, शब्द येतात, भाषा येते, अवकाश, रंग, रेषा म्हणजेच चित्रकला येते, स्वतःविषयी जागरूकता येते, इतरांशी संवाद साधण्याची कला आपोआपच अवगत होते. अशा अनेक गोष्टी ‘नृत्य’ प्रकारात समाविष्ट होत असतील तर नृत्य ही केवढी मोठी कला आहे याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. आपण जेव्हा नृत्य शिकतो किंवा शिकवतो तेव्हा केवळ हस्तक शिकत नाही किंवा हावभाव शिकवत नाही. तर ते का करायचे? कसे करायचे? त्याचा अर्थ काय आहे? ह्या सर्व बाजूंचा विचार ह्यामध्ये केला जातो. म्हणूनच लहान वयातच जर मुलांना नृत्य ह्या विषयाची ओळख करून दिली तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होण्यास मदत होऊ शकते. अर्थात लहान मुलांना तांत्रिक बाजू समजवायला लागल्यास ते नक्कीच कंटाळवाणे होऊ शकते. म्हणूनच मुलांच्या वयानुसार, समजुतीनुसार अभ्यासक्रमाची आखणी करायला हवी. मनोरंजन होईल अशा पद्धतीने शिकवल्यास शालेय वयापासून मुलांमध्ये नृत्याविषयी रुची निर्माण होण्यास निश्चित मदत होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने चित्र, क्रीडा, संगीत, नृत्य अशा प्रयोगशील कलांच्या ठराविक परीक्षा झाल्या असतील तर दहावीच्या परीक्षेत ५% अधिक गुण मिळतील असे जाहीर केले. तेव्हापासून कलेच्या वर्गातील मुलांची संख्या वाढलेली दिसून आली.. हल्ली प्रत्येक शहरात गल्ली बोळात एक तरी नृत्य वर्ग असल्याचे दिसून येते. विशारद झाले की स्वतःचे ‘क्लास’ काढतात आणि मुलींना परीक्षेला बसवतात. निकाल काय लागेल याच्याशी त्यांना काहीही घेणेदेणे नसते. यामध्ये मुलांचे फार नुकसान होते. अशावेळी वाटतं की सदर व्यक्ती नृत्य शिकवण्यास पात्र आहे की नाही यासाठी त्या व्यक्तीची आधी परीक्षा घ्यावी.

परीक्षा पद्धतीमुळे एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता न पाहताच सर्व अभ्यासक्रम शिकवावा लागतो. कारण त्या परीक्षेसाठी तेवढी तयारी करणे आवश्यक असते. यातील वाईट बाजू अशी कि झेपत नसतानाही विद्यार्थ्यांना काही गोष्टी शिकाव्या लागतात. तर त्याची चांगली बाजू अशी कि निदान या निमित्ताने का होईना पण त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

या परीक्षा पद्धतीचा अजून एक फायदा असा आहे कि अनेकजण एकेक पायरी ओलांडत विशारद अथवा अलंकार होतात. नृत्यकलेत पदवी प्राप्त झाल्यावर अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. हल्ली ‘इंटरनॅशनल स्कूल' मध्ये नृत्य अथवा संगीत शिक्षकाला सुद्धा इतर शिक्षकांप्रमाणेच समान दर्जा दिला जातो. या कला शिक्षकांना अर्धवेळ किवा पूर्णवेळ असे दोन्ही पर्याय असतात. अनेक विद्यालयांमध्ये नृत्य आणि संगीत हे अनिवार्य विषय आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही नोकरीची संधी निर्माण होते. आपल्याकडे दुर्दैवाने अजूनतरी कलाक्षेत्रात भक्कम पगाराची नोकरी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मग भाडे तत्वावर जागा घेऊन नृत्य शिकवणीचे वर्ग सुरु करणे हा एक पर्याय समोर असतो. या प्रकारातही पुन्हा दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतील. काही जण कलेचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण द्यायचं याच हेतूने आपले नृत्यवर्ग चालवतात तर काही ठिकाणी २०-५०-१०० मुलीना प्रवेश देऊन नृत्य वर्ग शिकवणीचा पद्धतशीर ‘व्यवसाय’ सुरु होतो. अर्थात दोन्ही व्यक्ती आपापल्या ठिकाणी योग्य असतात त्यावर आपण खरंतर आक्षेप घेऊ शकत नाही पण निदान या दोन्हीचा सुवर्णमध्य साधता आला तर उत्तमच. सदर ‘व्यवसाय’ करणा-या व्यक्तींची सुद्धा एक मुख्य अडचण असते ती अशी कि ती व्यक्ती एखाद्या विषयातील पदवीधर असूनही त्या विषयात पारंगत असेलच असं नाही. त्या व्यक्तीला फक्त पदवी प्राप्त झालेली असते. त्याच न्यायाने फक्त अलंकार पदवी मिळाली म्हणून ती व्यक्ती नृत्यकलेत पारंगत असेलच याची खात्री नाही. तसेच एखादी व्यक्ती अतिशय बुद्धीमान असते, त्याच्या विषयात पांडित्य प्राप्त करते पण म्हणून तो विषय त्या व्यक्तीला इतरांना चांगला शिकवता येईलच याची खात्री नसते. याच आधारे अलंकार पदवी मिळाली, ज्ञानही आहे , विषयाची जाणही चांगली आहे पण शिकवण्याची हातोटी नाही असेही होऊ शकते. कारण अध्यापन ही सुद्धा एक कला आहे. त्यामुळे आजकाल नृत्यवर्गात छंद म्हणून अथवा करियर म्हणून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतु पालकांनी प्रवेश घेताना वर उल्लेख केलेल्या गोष्टींचा थोडा बारकाईने विचार करून , नृत्यशिक्षकाशी बोलून अथवा आधीपासून तेथे जात असलेल्या विद्यार्थ्याशी बोलून मगच योग्य तो निर्णय घ्यावा. फक्त आपल्या घराजवळ क्लास आहे आणि आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचे दोन तास आपला मुलगा किवा मुलगी 'बिझी' राहतेय ना एवढाच विचार करू नये. अशाने तुमचे पैसे आणि तुमच्या पाल्याचा वेळ दोन्ही फुकट जाण्याची हमखास खात्री आहे.

परीक्षा पद्धतीचा सगळ्यात मोठा तोटा असा की साचेबद्ध शिक्षणामुळे त्या विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाव्यतिरिक्त इतर विषयाची ओळखही होत नाही. जेवढा अभ्यासक्रम तेवढेच शिक्षण. कला ही अशी मोजून मापून शिकवली जाते का?. अर्थातच नाही. पण यावरही इलाज आहे. तो असा की शिक्कामोर्तब होण्यासाठी पदवी प्राप्त करणे आवश्यकच आहे. पण तेवढ्यावर न थांबता आपल्या गुरुकडून जितक्या गोष्टी शिकणे शक्य आहे तितक्या शिकून घेतल्या पाहिजेत. नवनवीन कल्पनांचा धांडोळा घ्यायला हवा. म्हणजेच पदवीवर समाधान न मानता अखंड शिकत राहून आपला उत्कर्ष करण्याची तयारी ठेवायला हवी.

थोडक्यात काय तर परीक्षा पद्धती चांगली कि वाईट किंवा हवी कीको या वादात न पडता त्यातील ताज्य भाग वगळून जे चांगलं आहे, जे उपयोगी पडणारे आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणे हेच श्रेयस्कर....

शीतल कपोले ह्या पुण्यातील प्रसिद्ध कथक नृत्यांगना असून त्या ज्येष्ठ गुरु शमा भाटे यांच्या शिष्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामधून त्यांनी कथक नृत्यात पदवी प्राप्त केली असून त्या डोंबिवलीमधील 'लेहजा' आर्ट फौंडेशनच्या संस्थापक आहेत.

Comments

  1. Very nicely written about the current scenario.
    Also, please visit https://bharatnatyamtome.blogspot.com/
    & share your comments. thank you in advance.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts