श्री रंग : द रिक्लायनिंग लॉर्ड


संकल्पना, निर्मिती आणि नृत्यसंरचना : श्री. पवित्र भट 
Preview by : Swarada Dhekane


भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये परंपरेने पाहायला मिळणाऱ्या देवदेवतांवर आधारित कथानके, त्यांची रूपे आणि त्यातून अभिव्यक्त होणारा भक्तीभाव कलाकाराला आणि रसिक प्रेक्षकांना आजही एक रसानुभूती देणारा आहे. कथक, भरतनाट्यम्  मध्ये नृत्यदेवता नटराजाबरोबरच विष्णू देवतेच्याही विविध रचना आणि भक्तीभाव अखंड स्वरुपात सादर होतो. अशाच ह्या विष्णूचे एक रूप म्हणजे – जो अखंड सागरात शेषनागावर पहुडलेला आहे असा आणि तिथूनच सबंध पृथ्वीचे रक्षण करणारा विष्णू. अशा ह्या दक्षिणेतील श्रीरंगम मध्ये  स्थायिक अशा विष्णूवर आधारित “श्री रंग : द रिक्लायनिंग लॉर्ड” हे भरतनाट्यम्  नृत्य सादरीकरण सुप्रसिद्ध् भरतनाट्यम् नर्तक श्री. पवित्र भट १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात सादर करणार आहेत.

एका भक्ताचा भगवान श्रीरंगापर्यंत पोहोचण्याचा एक सुंदर प्रवास ह्या नृत्याद्वारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. श्रीरंगापर्यंत पोहोचण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा भक्ताचा हा प्रवास कावेरी नदीच्या तीरावरून गरुडापर्यंत आणि ध्वजस्तम्भापासून ते श्रीरंगाची पत्नी – रंगनायकीकडे घेऊन जातो. प्राचीन अशा ४००० दिव्य प्रबंधान्मधून काही निवडक अशा पद्यांद्वारे श्रीरंगाची आराधना करत, त्याची कथा सांगत त्या पहुडलेल्या अशा विष्णूच्या – श्रीरंगाच्या मंदिरापर्यंत भक्त येऊन पोहोचतो.

अशा ह्या भक्ताचा त्याच्या  प्रिय देवतेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास- “श्री रंग : द रिक्लायनिंग लॉर्ड” श्री. पवित्र भट पुण्यात सादर करत आहेत. श्री. पवित्र भट हे प्रख्यात  भरतनाट्यम् नर्तक असून ते गुरु श्री. दीपक मुजुमदार आणि कुमारी वसंता यांचे शिष्य आहेत. त्यांनी भारतात सर्वत्र ठिकाणी आणि परदेशात अनेक नुत्य सादरीकरण केले असून अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. त्यांना ‘सिंगार मणी’, ‘नालंदा नृत्य निपुण’, ‘युवा कलाभारती’ आणि ‘पंडित भीमसेन जोशी’ यांसारखे मानाचे अनेक पुरस्कार लाभले आहेत. ‘पवित्र आर्ट विज्युअल’ ही त्यांची मुंबईतील नृत्यसंस्था असून तिथे ते साधारण ५०० विद्यार्थ्यांना भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण देतात.

‘श्री रंग : द रिक्लायनिंग लॉर्ड’ हे त्यांचे एकल नृत्य सादरीकरण आणि त्यासंबंधी एक विशेष मुलाखत  पुण्यात शनिवार १७ नोव्हेंबर,२०१८ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात सादर होणार आहे.

Comments

Popular Posts