'तीर्थ शिवराय':तेजस्वी युगपुरुषाचा संगीतमय चरित्रपट


शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप ।शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ॥


समर्थ रामदासांनी लिहिलेल्या या ओळी नि:संशय सर्व समाजासाठी मार्गदर्शक आहेत तसेच कुठल्याही क्षेत्रात काम करताना कितीही अवघड समस्या समोर उभी ठाकली तरी या स्थितीतून मार्ग कसा काढायचा याचे उत्तर सांगणाऱ्या आहेत. शिवरायांची नुसती आठवण केली तरी संकटे आसपासही फ़िरकणार नाहीत इतकी प्रचंड शक्ती आणि ऊर्जा शिवरायांच्या नावात भरलेली आहे. आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे; 'शिवचरित्राचे पुन्हा पुन्हा वाचन, चिंतन, श्रवण हाच सर्व समस्यांवरचा नामी इलाज होऊ शकतो’ हे अक्षरश: खरे आहे. अर्थात, वाटताना हे सोपे वाटले तरी प्रत्यक्ष आचरणाच्या पातळीवर तितकेच कठीण काम आहे. राजकारणी आणि त्यांच्या प्रभावाखालचे तथाकथित कार्यकर्ते यांच्या दृष्टीने तर ’शिवाजी महाराज’ ही केवळ मिरविण्याची बाब बनली आहे. सर्व प्रकारचे गुन्हे सर्रासपणे करणारे गुंडदेखील ’शिवभक्त’ म्हणून मिरवतात ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट नित्य अनुभवास येते आहे. मग या सर्वावर उपाय काय ? बाबासाहेब म्हणतात तोच उपाय ! ’शिवचरित्राचे पुन्हा पुन्हा वाचन, चिंतन, श्रवण !!

शिवचरित्र प्रसारासाठी साहित्य, नाट्य, चित्रपट, दूरदर्शन-मालिका, संगीत अशा विविध कलांचा आजवर उपयोग होत आलेला आहे. यामध्ये अगदी सहज अनुभवता येईल आणि ज्याचा जनमानसावर चटकन प्रभावही उत्पन्न होऊ शकतो असा कलाप्रकार संगीत हा आहे. पण योगायोगाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा – शिवचरित्रावर मराठी संगीतामध्ये आजवर फ़ारसे काम होऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अर्थात भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांतील काही गीते आणि बाबासाहेब पुरंदरे, पं. हृदयनाथ मंगेशकर व लतादीदी या दिग्गजांचा एकत्रित कलाविष्कार ’शिवकल्याणराजा’ आणि काही निवडक पोवाडे हे यातले सन्माननीय अपवाद. अर्थात तुलनेने कमी काम होऊनही झालेले काम इतके गुणवत्तापूर्ण आहे की, आजही ’मराठी पाऊल पडते पुढे’, ’हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ यांसारखी गीते किंवा पिलाजीराव सरनाईकांनी म्हटलेला शिवाजीराजांचा पोवाडा ऐकला की अंगावर रोमांच उभे राहतात. पण तरीदेखील शिवचरित्रातील सर्व महत्वाच्या प्रसंगांना संगीताचे प्रभावी माध्यम मिळू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनचरित्रातील प्रसंग उत्तम गीत आणि संगीताच्या माध्यमातून लोकांसमोर आले तर ? ही कल्पनाच खूप सुंदर आणि पवित्र आहे.

पण अर्थातच शिवचरित्राचा आवाका लक्षात घेतला तर अशी अजोड कलाकृती निर्माण करणे हे म्हणजे महाप्रचंड शिवधनुष्य पेलण्याइतकेच कठीण काम आहे, हे निश्चित. पण मराठी रसिकांच्या भाग्याने ’या’ शिवधनुष्याला सुप्रसिद्ध संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी नुकताच हात घातला असून तीर्थ शिवराय या नावाने शिवचरित्र मांडणारा हा गीतांचा ठेवा येत्या १५ जानेवारीला सर्वांसमोर येतो आहे. मूळचे खानदेशातील असलेले तरुण कवी डॉ. निखिल पाठक यांनी शिवचरित्रातील प्रसंगांवर लिहिलेली एकूण २० गीते तीर्थ शिवराय ह्या CD मध्ये घेतली आहेत. ही सर्वच गीते अत्यंत प्रासादिक, अर्थपूर्ण आणि प्रवाही बनलेली असून जीवन धर्माधिकारी यांच्या संगीताच्या माध्यमातून ती निश्चितच प्रेरणादायी बनून लोकांपुढे येतील. या ध्वनिफिती मध्ये पं. रघुनंदन पणशीकर, जसराज जोशी, जितेंद्र अभ्यंकर अवधूत गांधी, चैतन्य कुलकर्णी, चंद्रशेखर महामुनी, हरिदास शिंदे, अभिजित पंचभाई यांचा सहभाग आहे.

'तीर्थ शिवराय' या ध्वनिफितीचे प्रकाशन व गीतांचे सादरीकरण १५ जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे सायं. ७ ते ९.३० या वेळेत होणार आहे. यावेळी सौ. नीलिमा हिरवे (कथक नृत्यांगना)
नेहा भाटे (भरतनाट्यम् नृत्यांगना) सहकाऱ्यांसंवेत नृत्य सादर करतील.

तीर्थ शिवराय
तेजस्वी युगपुरुषाचा संगीतमय चरित्रपट

गीतकार- निखिल पाठक
संगीतकार- जीवन धर्माधिकारी

गायक-
जितेंद्र अभ्यंकर
अवधूत गांधी
चैतन्य कुलकर्णी
चंद्रशेखर महामुनी
हरिदास शिंदे
अभिजित पंचभाई

निवेदन-
मंदार परळीकर

नृत्य-
सौ. नीलिमा हिरवे (कथक नृत्यांगना)
नेहा भाटे (भरतनाट्यम् नृत्यांगना)

कार्यक्रमाविषयीच्या अधिक माहिती आणि व्हिडीओ साठी पुढील facebook link वर click करावे

https://www.facebook.com/teerthashivray/?notif_id=1514571954887469&notif_t=page_fan


तिकिटे विक्रीस उपलब्ध झाली आहेत.

तिकिटे उपलब्ध...दर रु. ५००/४००/३००

1. फ्रीडम शॉप, सुजय गार्डन, मुकुंदनगर.

2. युनिकॉर्न शॉप, एस्. पी. कॉलेज समोर, एस्. पी. बिर्याणीज् शेजारी. टिळक रोड

3. गोल्डन पेटल्स, आयुर्वेद रस शाळेसमोर, कर्वे रोड.

4. चितळे बंधू मिठाईवाले, सिंहगड रोड.

संपर्क: 9922915808, 9922915811, 8554985691, 9763568776

- महेंद्र वाघ  







Comments

Post a Comment

Popular Posts