नवनायिका: परंपरेकडून नवतेकडे जाताना....(भाग:१)

पार्श्वभूमी:

भारतीय शात्रीय नृत्याची आजही असलेली लोकप्रियता आणि त्याचे होणारे सादरीकरण हे तिची वर्षानुवर्षे जोपासली गेलेली परंपरा, प्राचीनता आणि शास्त्रशुद्धता यांचे महत्त्व विशद करणारे आहेत. तरीही इतिहास बघता, नृत्याच्या परंपरांमध्ये अनेक नवीन प्रवाह आलेले दिसतात. कोणत्याही कलेसाठी ‘सृजनता’ ही महत्त्वाची ठरते. कारण, परंपरा महत्त्वाची असली तरी कालानुरूप बदल आवश्यकच असतो. प्रत्येक शैलीचे उगमस्थान आणि त्याच्या सादरीकरणामागचा आशय यांमध्ये विविधता आहे. परंतु, बदलत्या परिस्थितीप्रमाणे सादरीकरणामागचे उद्देश हे बदललेले दिसतात. याचे एक उदाहरण म्हणजे- भरतनाट्यम् नृत्यशैलीचे उगमस्थान हे तमिळनाडू, तेथील मंदिरांमध्ये देवदासी हे नृत्य ईश्वराची आराधना म्हणून करत. पुढे, राजाश्रयामुळे ते राजासाठीही केले जायचे आणि ब्रिटीश काळानंतर ते रंगमंचावर आले. म्हणजेच, बदलत्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीप्रमाणे नृत्याच्या सादरीकरणामागचा आशय बदललेला दिसतो. 

आता, आजच्या शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण पाहता विषय मात्र पारंपारिकच बघायला मिळतात. देवदेवतांच्या कथा, वर्णने, स्तुती हे पौराणिक धर्माची प्रचिती देणारे आहेत तसेच नायक-नायिकांचे सादरीकरण जे स्त्री-पुरुषातील प्रेम-प्रसंग दर्शविणारे असले तरी आशय मात्र आजच्या काळाशी अनुरूप न वाटणारे आणि परंपरेला प्रश्न निर्माण करणारे वाटतात. त्यांचे अभिव्यक्तीकरण त्याची प्राचीनता दर्शवते. यासाठीच आजच्या तरुण पिढीतील अनेक नर्तक आपल्या नृत्यातून नवीन, समकालीन आशय व्यक्त करणारे विषय स्वतंत्रपणे रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या विषयांमध्ये विशेष समावेश ‘नायिकांचाही’ आहे असे म्हणायला हरकत नाही. एकूणच नायिकेची केली गेलेली व्याख्या, तिचे विविध भेद आणि तिचे फक्त नायकाच्या अनुषंगाने होणारे अभिव्यक्तीकरण अशी परंपरेने चालत आलेल्या तिच्या ओळखीशी परस्परसंबंध साधायला आजच्या पिढीला अनेक अडचणी आणि अगदी स्त्रीवादी प्रश्न निर्माण करणारे असल्यामुळे समकालीन आशयावर आधारित असे काम करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात होत आहे, हे भविष्यातील नृत्यासाठी आणि नर्तकांसाठीही नक्कीच उपयोगी ठरणारे आहे. असे असले तरी, ती केवळ व्यक्तिनिष्ठच भर हवी का यावर पुढे नक्कीच चर्चा करू! 

या पार्श्वभूमीवर, परंपरेने चालत आलेल्या ‘नायिका’ सारख्या विषयात नवतेची भर घालण्यासाठी किंवा ती घालत  असताना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या काही मूलभूत तत्त्वांची जाण ठेवणे व त्या तत्त्वांचा सखोल अभ्यास करून आपले नवीन काम केले पाहिजे, त्यामुळेच भविष्यात त्या विषयाची आस्था कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत होऊ शकेल. या सगळ्याचा आढावा घेऊन ‘नायिका’ विषयासंदर्भात वर्तमान आणि भविष्यात आवश्यक असलेल्या योगदानाला अनुसरून  महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करण्याचा प्रयत्न या लेखमालिकेद्वारे करत आहे.


- स्वरदा ढेकणे.
एम. ए. भरतनाट्यम् 

Comments

Popular Posts