नायिका- नृत्यातील व लघुचित्रातील (भाग:१)

लेखिका: श्रीमती. नीलिमा कढे

प्राचीन भारतीय कलाचिंतनात चौसष्ट कलांमधून ललित कलांचे स्थान वेगळे मानले आहे. वस्त्रकला, पाककला, लाकूड कोरणे इ. हस्तकला दैनंदिन जीवन अधिक सुंदर, रुचीपूर्ण बनवतात. मात्र ललित कलांचा उद्देश एवढाच सीमित नाही. जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या केवळ सौंदर्य निर्मितीचा हेतू असणाऱ्या, आशयधन अशा ललित कलांना प्रमुख कला असे म्हटले गेले आहे. प्राचीन ललित कलांच्या आविष्कारात भारतीय तत्त्वचिंतनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. भौतिक जीवनापेक्षा वेगळ्या अलौकिक आनंदाच्या पातळीवर रसिकांना नेणे, सत्य-शिव-सुंदराच्या आविष्कारातून रसिकांना आत्मिक आनंदाकडे अभिमुख करणे, हे या कलांचे उद्दिष्ट होते.

चित्र आणि नृत्य या दोन ललित कलांपैकी चित्र हे दृक स्वरूपाचे तर नृत्य हे दृक-श्राव्य-काव्य अशा 'तौर्येत्रिक' स्वरूपाचे. चित्र लांबी-रुंदी युक्त द्विमित अवकाशात तर नृत्य लांबी-रुंदी आणि खोली युक्त त्रिमित अवकाशात साकारते. नृत्याला अवकाशाची चौकट आणि कालमर्यादाही असते. चित्रात रंग-रेषांच्या सहाय्याने उमटणारे आकृतिबंध तर नृत्यात नर्तकीच्या अंगोपांगांच्या चलनातून उमटणारे हलते आकृतिबंध. चित्रात जसे रंग तसा नृत्यात भावाभिनय. चित्रातील रंग उत्कट भाव व्यक्त करण्याचे काम करतात. तर नृत्यात नर्तकी स्वतःच्या देहबोलीतून भावप्रकटन करते.

भारतात आज अस्तित्वात असलेल्या विविध शास्त्रीय नृत्यशैली आपले नाते थेट भरताच्या नाट्यशास्त्राशी सांगतात. भरतनाट्यम् ही त्यापैकी एक प्रमुख दक्षिणी शैली. शुद्ध नृत्त आणि भावदर्शन यांचा समतोल असणारी. परंपरेनुसार दक्षिणी मंदिरांमध्ये ईश्वराला अर्पण करायच्या षोडोपचार पूजेचा भाग म्हणून हे नृत्य सादर केलं जात असे. त्यावेळचे 'दासीअट्टम' स्वातंत्र्योत्तर काळात 'भरतनाट्यम्' रुपात रंगमंचावर आले ते त्यातील ईश्वरभक्तीचा आत्मा तसाच ठेवून.

शास्त्रीय नृत्याप्रमाणेच भारताला लघुचित्रांची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. भूर्जपत्रांवरील पोथ्यांमध्ये मजकुराशेजारी ही छोटी चित्रे सुरुवातीस रेखाटली गेली. कालांतराने कागद, कापड यावरही चितारली गेली. साहित्यातील आशयाला अनुसरून असली तरी ती नुसतीच कथाचित्रे नाहीत. रचनेतील व्यामिश्रता, तपशीलातील बारकावे, तंत्रावरील प्रभुत्व आणि उत्कट असे भावदर्शन या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होते. त्यांना अभिजात चित्रांचा दर्जा मिळतो. मात्र दीर्घकाळ ही चित्रे साहित्याशी निगडीत राहिल्याने साहित्यात जनमानसाच्या ज्या लोकप्रिय कल्पना प्रतिबिंबित झाल्या, त्याच लघुचित्रांमध्येही अवतरलेल्या दिसतात. ऋतूंच्या मालिका दर्शविणारे बारामास, राजघराण्यातील व्यक्तिंची चित्रे, शास्त्रीय संगीतातील रागरागिण्या, नायक-नायिका, रामायण-महाभारत असे विषय बहुधा लघुचित्रांसाठी निवडलेले दिसतात.

त्यातही मध्ययुगात 'नायिका' हा चित्रमालिकांसाठी अत्यंत लोकप्रिय विषय होता, असे लक्षात येते. आता चित्रे भिंतीवर लावून आस्वादली जातात, तशा रीतीने लघुचित्रे पाहिली जात नसत. जेमतेम हाताच्या तळव्याएवढ्या आकाराची ही चित्रे बैठकीत बसून एक-एक चित्र पाहून आस्वादली जात असत. अगदी छोट्या अवकाशामध्ये असंख्य तपशिलांचे रेखाटन व सौंदर्यपूर्ण अवकाश विभाजन हे ह्या चित्रांचे वैशिष्टय. मध्ययुगात भारतभर खूप मोठया प्रमाणावर लघुचित्रांची निर्मिती झाली. या चित्रांमध्ये त्या त्या प्रांताची वैशिष्ट्येही दिसतात. त्यामुळे शास्त्रीय संगीताप्रमाणेच लघुचित्रांचीही राजस्थानी, पहाडी, कांग्रा, बशौली, किशनगड, बुंदी अशी अनेक घराणी आहेत. या सर्व घराण्यांमध्ये 'नायिकांचे' चित्रण करण्याची परंपरा दिसते.

'नायिका' ही शृंगार संप्रदाय आणि भक्ति संप्रदाय यातून अभिजात साहित्यात अवतरलेली एक संकल्पना. शृंगारकाव्याची परंपरा कालिदासाच्याही पूर्वीपासून भारतात रुजली होती असे दिसते. भरतनाट्यम् सारख्या शास्त्रीय नृत्यशैलीत आणि लघुचित्रात नायिकेचे विपुल आविष्कार पाहायला मिळतात. प्राचीन भारतीय अध्यात्मचिंतनाशी नाते सांगणाऱ्या 'नायिकेतून' स्त्रीचे भावोत्कट मनोविश्व रंगविले गेले ते विशेषतः मध्ययुगीन साहित्यात. याच साहित्याने नृत्याला आणि लघुचित्रांना समांतर पार्श्वभूमी पुरवली आहे. उदाहरणार्थ- संतकवी जयदेव यांच्या 'गीतगोविंद' या काव्यावर नृत्य सादर केले जाते. तसेच या अष्टपदींवर आधारित लघुचित्र मालिकाही पाहायला मिळतात.

चैतन्य महाप्रभूंनी ईश्वरभक्तिच्या पाच पायऱ्या सांगितल्या. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. यातली पाचवी पायरी म्हणजेच मधुराभक्ती. भक्ताने स्वतःला ईश्वररुपी प्रियकराची प्रेयसी समजून केलेली उत्कट भक्ती. या मधुरा भक्तीची छटा 'नायिका' संकल्पनेत मिसळलेली दिसते. उत्तरेत वैष्णव संप्रदाय प्रधान असल्याने कृष्ण व राधा यांना नायक-नायिका रुपात पहिले गेले, तर दक्षिणेत शैव संप्रदाय असल्याने शिव-शक्ती यांना नायक-नायिकेचे स्थान साहित्यात मिळाले. कृष्ण किंवा शिव म्हणजे कोणी एक पुरुष नसून त्यांना मूळ अव्यक्त चैतन्याचे प्रतिक मानले तर राधा किंवा शक्ती ही एक स्त्री नसून, मूळ अव्यक्त चैतन्याचे 'व्यक्त रूप' म्हणजेच संपूर्ण सृष्टीचे प्रतिक म्हणून पाहिले गेले. या गोचर सृष्टीचे मूळ अव्यक्त चैतन्याशी असलेले प्रेमपूर्ण नाते रंगविणे हे संतकाव्याने साध्य केले. एकाच्या अस्तिवाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व सिद्ध होत नाही, असे पुरुष-प्रकृतीचे ऐक्य रंगविणारे संतकाव्य. त्यावर आधारित चित्राविष्कार. हाच ऐक्यभाव रंगविणारे नृत्य. 



Neelima Kadhe





Comments

Popular Posts