अमरावतीचा स्तूप : इतिहास आणि भविष्याचा सेतू

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आंध्रप्रदेशाच्या नव्या राजधानीचा शोध घेताना मा. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर जिल्ह्यातील  अमरावती नावाच्या गावाला पसंती दिल्याचे वाचनात आले होते. त्यानंतर मा.पंतप्रधानांच्या हस्ते अमरावतीचे राजधानी म्हणून झालेल्या भूमीपूजनाची बातमीहि वाचली आणि डोळ्या समोर आली ती गतकाळातील प्राचीन अमरावती. आंध्रप्रदेशातील अमरावती तशी प्राचीन आणि इतिहासप्रसिद्ध. आजचे अमरावती नावाचे गाव एकेकाळच्या गजबजलेल्या नगराचे, राजधानीचे आणि महत्वाचे म्हणजे तिथे उभारलेल्या बौद्ध महास्तुपामुळे सुप्रसिद्ध होते. आज तो महास्तुप प्रत्यक्ष त्या जागेवर दिसत नसाला तरी त्याचेते भव्यअस्तित्व आजही जाणवते, ते अवषेशातून; उत्खननातून मिळालेल्या शिल्पं, शिलालेखातून,इतिहास कथा आणि दंतकथातून.

 अमरावतीच्या अनुषंगाने या प्रदेशातील गुंटापल्ली, घंटाशाला, भट्टीप्रोलू, जगय्यापेटा, नागार्जुनकोंडा, चंदावरम्, आणि गोली या सारखी काही प्रसिद्ध बौद्धस्थळे आजही आपले एकेकाळचे अस्तित्व आपल्या उरल्यासुरल्या परंतु देखण्या शिल्पंअवषेशातून प्रगट करतांना इथे दिसतात. या यादीत गुडीवाडा, श्रीकाकुलम सारखी आणखी काही नावे देखील दाखल करता येतील, परंतु यात अमरावतीचे स्थान मात्र सर्व प्रथम आणि प्रमुख म्हणता येईल असेच आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांवर असलेल्या अपार श्रद्धेतून, धम्माच्या माध्यमातून हि पवित्रस्थळे निर्माण झाली असली, तरी तिथल्या वास्तू आणि शिल्पं म्हणजे अचंभित करणाऱ्या वास्तू-शिल्प कलेची आविष्कार ठरली आहेत.

आजचा अमरावतीचा परिसर प्राचीन काळी धनकाकट, धरणीकोटाया नावांनी ओळखला जात असे, तर तिथल्या प्राचीन महास्तुपाची जागा स्थानिक लोकांना दिपल्दिन्ने म्हणजे दिव्यांची टेकडी या नावानी परिचितहोती. इथे एकेकाळी प्रतिष्ठित महास्तुपाचा आणि त्यावरील शिल्पकामाचा उल्लेख इथेच असलेल्या अमरेश्वराच्या सुप्रसिद्ध प्राचीन मंदिरातील शिलालेखात आजही दिसतो. हा लेख आहे बाराव्या शतकातील. हा लेख अमरावतीच्या महास्तुपाच्या निर्मितीच्या खूप नंतरच्या काळात कोरला असला तरी खूप महत्वाचा आहे; का ? तर त्यात बुद्धो देवस्य सानिध्यौ यत्र धात्रा प्रपुजितः I चैत्यमत्युन्नतं यत्र नाना चित्रसुचित्रितं I’ या ओळींमुळे. अर्थात, या लेखातून सिद्ध होणारि महास्तूपाची आणि त्यावरील नानाविध शिल्पंचित्र कामाची असलेली ही लिखित नोंद, शिवाय अकराव्या शतकापर्यंत या महास्तुपाचे असलेले प्रत्यक्ष अस्तित्व, याचा एक पुरावा म्हणून. अमरावतीच्या महाचेतीयाचीस्थापना साधारणतः इ. सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली होती. नंतरच्या काळात साधारणतः इ. सन पूर्व दुसऱ्या ते पहिल्या शतका पासून, ते इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत; चार टप्प्यात हा स्तूप शिल्पांनी, वेदिका, स्तम्भांनी, आजूबाजूच्या इमारतींनी परिपूर्ण होत गेला.. सनाच्या बाराव्या शतकापर्यंत या महाचेतीयाचीकीर्ती तर सर्वदूर पसरली होती. या नंतरच्या काळात मात्र या महास्तुपाची खूपच थोडीशी माहिती मिळते.

अठराव्या शतकाच्या शेवटी म्हणजे १७९७ च्या दरम्यान अमरावतीच्या त्या प्राचीन महास्तुपाचा शोध आजच्या आपल्या जगाला लागला.पूर्वीचा महाचेतीय कालौघात नष्ट झाला होता. पडझड झालेल्या अवस्थेत एखाद्या टेकडी प्रमाणे त्याचे अस्तित्व शिल्लक राहिले होते. या स्तूपाच्या वर्तुळाकृती टेकडीत दडलेल्या प्राचीन अवशेषांकडे प्रथम लक्ष गेले ते एका इंग्रज लष्करी अधिकाऱ्याचे;त्याचे नाव होते ‘कर्नल कोलीन मॅकँन्झी’. अमरावतीच्या प्राचीन जागेची, इथल्या परिसराची प्राथमिक माहिती मॅकँन्झीने जमवली आणि अमरावती स्तूपाच्या शोधाचा पहिला वृत्तांत १८०९ मध्ये ‘Asiatic Researches’ Vol.IX मध्ये प्रकाशित केला. मॅकँन्झींचा हा लेख,अमरावतीच्या महास्तुपाच्या शोधातील पहिला सचित्र लेख होता.या दरम्यान स्थानिक राजांनी आपल्या नवीन नगरच्या इमारतींच्या बांधकामासाठी इथली काही शिल्पं-शिळा वापरल्या. त्यांची भुकटी झाली; घाण्यात मळून त्यांचा चुना झाला. हातभरदेखणी शिल्पं चिमुटभर पांढरा चुनाहोऊन, घरांच्या भिंतीत दोन दगडांना सांधत, कायमची विरून गेली.दिपल्दिन्नेचे ऐतिहासिक महत्व ओळखत,१८१६ मध्ये मॅकँन्झीने तिथले सर्वेक्षण करून उत्खनन  सुरु केले. त्याने अनेक निरीक्षणे नोंदवली. इथल्या शिल्पांची, उत्खनीत स्तूपाच्या जमिनीवर दिसणाऱ्या पदविन्यासाची कागदावर सप्रमाण आरेखनेही करून घेतली.अशी रेखांकने, आरेखने करण्याची पद्धत अमरावतीस प्रथमच घडत होती.अमरावतीच्या स्तुपाची हि रेखांकने म्हणजे भारतातील अन देश-विदेशातील प्राचीन वास्तू, शिल्पांच्या अभ्यासाचा एक आद्य नमुना होता; हे एक प्रकारचे शास्त्रीय डॉक्युमेंटेशन होते. अमरावतीची ही आरेखने नंतरच्या आधुनिक पुरातत्वशास्त्रातील म्हणजे अर्कीयोलॅाजीया विषयातील  प्रथम अर्कीयोलॅाजीकल डॉक्युमेंटेशन ठरली.

 कालांतराने अमरावतीसपुरातत्वीय उत्खनने झाली.त्यातून समोर आली ती त्या महास्तुपावरील अनेकशिल्पं वा मूर्ती; काही अवशेष मंजुषाआणि शिलालेख या सर्वांच्या एकत्रित अभ्यासातून या अद्वितीय महास्तुपाची खूपशी माहिती जगासमोर आली. मौर्यांच्या काळातील या स्तुपाची झालेली सुरुवात, आणि त्यानंतरसातवाहनांच्या राजवटी पासून हा महास्तूप पूर्णत्वास आला होता. भिख्खूंनी, श्रीमंतानी, व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी श्रीधान्यकटकं अर्थात अमरावतीस तथागत भगवान गौतमबुद्धांच्या चरणी आपला श्रद्धाभाव अर्पण केला होता. त्यातल्या काहींनी इथल्या महास्तूपाच्या वेगवेगळया उपक्रमास दानेही दिली होती. हा महाचेतीय आपल्याभोवती इतर चैत्य,विहारासारख्या वास्तूंनी परिपूर्ण होत गेला. तत्कालीन संघ, स्थविर-थेर, भिख्खूगणांच्या धम्मघोषाने, ज्ञान, आचरणाने पवित्र आणि समृद्ध होता. कलाकारांच्या, वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून एका अप्रतिम, अद्वितीय कलाकृतीसम शोभायमान दिसत होता. यासर्वातून तिथे साकारला होता तो एक अद्वितीय महाचेतीय. वेदिका, प्रदक्षिणापथ,आयकस्तंभ, दिपस्तंभ, हर्मिका, छत्र-छत्रावली, पुष्पमालांनीदीप-दिपावलीनीं सुशोभित झालेला.

या महास्तुपाची वेदिका; स्तंभ, सूची आणि उष्णीशानी गुंफलेली. त्यावर पद्मक, अर्धपद्मक आणि शिल्पांनी सालंकृत झालेली. चार दिशांच्या प्रवेशमार्गी आणि मुख्य महास्तुपावर होती अप्रतिम शिल्पं; शुभ्र हस्तिदंती चुनखडी दगडात घडवलेली आणि बहुदा रंगवलेली सुद्धा. त्यातून सजीव होत होत्या त्या तथागताच्या कथा. शिवाय त्यावर होत्या पूर्णघटांच्या ओळीं, स्वस्तिकं, बुद्धपद, चैत्य-स्तुपपट्टांचे, परीचक्रांचे, दंपती, पद्मक, अर्धपद्मक, चन्द्रशीलांचे, अब्जमालांचे उठावदार अलंकरण. या शिल्पांत दिसत होती ती नगर-गावांची प्रवेशद्वारे, नगरं, राजवाडे, घरं, गावं, नदी, वनं. त्यात होते ते राजांचे, राण्यांचे, जनसामान्यांचे, आकाशीच्या मालाधारी देवतांचे, नागराज,गज, सिहांचे, अश्व, बोधीवृक्षांचे, अशोकाचे, उत्फुल्ल सनाल कमलांचे, हंसांचे, स्तूप, चैत्यगृहांचे आणि चतुष्पाद पंक्तींचे, पक्ष्यांचे रेखीवमनोहारी शिल्पांकन आणि या सर्व शिल्पांतून दर्शन होते ते त्या सुगताचे, तथागत भगवान बुध्दांचे.

 आज अमरावतीची अनेक शिल्पं, शिलालेख आणि इतर काही पुरावशेष, देशी विदेशी संग्रहालयातून सुरक्षित आहेत. यातील पहिले संग्रहालय आहे ते लंडनचे ब्रिटीश म्युझियम. दुसरे आपल्या देशातील चेन्नईचे; चेन्नई गव्हर्मेंट म्युझियम. अमरावतीचे जतन केलेले सर्व शिल्पावशेष, त्या महाचैत्याच्यानिर्मितीपासूनची कहाणी सांगतात. वेगवेगळ्या काळात या स्तुपावर कशी कशी शिल्पं सजवली गेली, त्यांच्यावर कालानुरूप हळू हळू होणारे बदल, इतर काही कला शैलींचा प्रभाव, इथल्या कलाकार पिढ्यांची शिल्प परंपरा. तसेच हा महास्तूप कसा होता?, त्यावर कोणकोणते भाग शिल्पांनी अलंकृत होते?,त्यांचे विषय काय?, वापरलेली प्रतीके-रुपकं कोणती?. स्त्री, पुरुषांच्या आकृती, त्यांचे अंगविक्षेप, त्यांची वस्त्र-आभूषणे, इमारती, वृक्ष अशा नानाविध घटकांची माहिती मिळते ती या शिल्पांच्या माध्यमातूनच. अमरावतीचे कलाकार अनेक शतकं आपली कला बुद्धचरणी अर्पित करत होते. अर्थात या सर्व शिल्पसंग्रहाचा आज दिसणारा एकत्रित परिणाम पाहणाऱ्याला त्यातील समृध्द शिल्पशैलीची, सौंदर्यसंकल्पनेची जाणीव करून देतो. त्यांच्या या अव्याहत कलासाधनेतूनच एक वेगळा अद्भुत कला अविष्कार घडला होता. त्यांनी साकारलेली कला स्वतंत्र होती; जी आज अमरावतीच्याच नावानेच ओळखली जाते.  
अशा या अमरावतीच्या महास्तूपावर साकारलेल्या शिल्पकलेचा संबंध महाराष्ट्रातील प्राचीन चित्रंशिल्प कलेवरही झाला होता. खरे तर महाराष्ट्रातील जागा प्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीत साकारलेली चित्रे म्हणजे भारतीय चित्रकलेचा मानबिंदू आहेत. वाकाटकांच्या काळात चितारलेली हि चित्रं अचानक प्रगटणार नाहीत, तर त्या चित्रांच्या मागे निश्चितच काही टप्पे असणार. कालपरत्वे ते नष्ट झाल्याने फारसे दिसत नाहीत; परंतु अजिंठालेणीत साकारलेल्या चित्रांमधली अनेक साम्य स्थळं मात्र थोड्या फार फरकाने थेट जुळतात ती अमरावतीच्या शिल्पांशी. आश्चर्य म्हणजे हे सर्व पुरावे एकत्र केले, तर उलगडू लागते ते या चित्रांचे आणि या चित्रशैलीच्या उन्नत आविष्काराचे कलात्मक कोडे आणि त्यातून दृष्टी समोर येतो तो अजिंठ्याच्या कलाकारांच्या गत पिढ्यांच्या अनेक शतकांच्या तपःचर्येचा कलाप्रवास. अमरावतीची शिल्पं आणि अजिंठ्याच्या चित्रांतून साकारलेल्या शिल्परचनांची, त्यातील उठावदार मानवाकृतीचीं,  त्यांच्या लयदार बाह्य रेखांकनाची, कथानकांच्या रचनेची, प्रतीकांची, नक्षींची, प्राणी-पक्ष्यांच्या अंकनाची ओळख करून घेतली कि त्यांचे चकित करणारे एकसारखेपण एकाच कलापरंपरेच्या प्रवाहीपणाची स्वतःच साक्ष देतील. अर्थात हे समजून घ्यायचे असेल तर अमरावतीच्या महास्तुपावर एकेकाळी शोभायमान असलेल्या शिल्पांची आणि अजिंठ्याच्या चित्रांची समोरासमोर भेट करून द्यायची; अन मग या दोन्ही कला पहा कशा एकाच कुळीच्या दिसतात ते. फरक एवढाच दिसेल; तो म्हणजे अमरावतीच्या कलाकारांकडे शुभ्र चुनखडी पाषाणावर शिल्पं साकारणारी धातूची छिन्नी होती; तर अजिंठ्याला या छिन्नीची नाजूक तूलिका झाली आणि शुभ्र चुनेगच्ची मणी भूमीवर रंग, रेषांत रमुन चित्ररूपाने भित्ती, स्तंभ, छतावर स्थानापन्न झाली

भारताच्या धर्म ,कला, तत्वज्ञान आणि इतिहास यांचा एक दुवा आणि प्राचीन वारसा म्हणून, आधुनिक आंध्रप्रदेशातील अमरावती नावाचे हे छोटेसे नगर वा गाव आजही अवशेष रूपाने उभे आहे. भगवान गौतम बुद्धांच्या अत्यंत पवित्र महास्तूपाच्या स्थानाने पुनीत असलेली अमरावतीची भूमी पुन्हा एकविसाव्या शतकात आधुनिक, प्रगतीशील भारताच्या राज्याची राजधानी होत आहे. महन्तेन सिरिसोभाग्गेन.. परम श्री सौभाग्यच...


डॉ. श्रीकांत प्रधान 
















(Published in Ravivar Maharshtra Times, Pune, Marathi News Paper- 27th December 2915) 


Comments

Popular Posts