'नायिका': सादरीकरणामागील तत्वज्ञानाचा शोध

प्रत्येक कलेवर त्या त्या देशातील धर्म, तत्वज्ञान, संस्कृती आणि सामाजिक स्थिती यांचा प्रभाव नक्कीच पडतो; आपल्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैली ह्यास अपवाद नाहीत. कोणतीही कला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टींचे अथवा घटकांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक स्तरावर शिकण्यापेक्षा हे माहित हवे कि- आपण हे का करतो?

देवदेवतांची स्तुती, वर्णने, कथानके भक्तिभावाने सादर करून ईश्वराची आराधना व मनोरंजन करणारे नृत्य मानवी भावभावना, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि स्त्री-पुरुष नाते विषयक प्रेमभावना नायक-नायिकांच्या स्वरुपात दर्शवणारे आहे. मग हे तत्त्वज्ञान नक्की काय आहे? ज्याचे महत्त्व भरतही सांगतात!

‘धर्मार्थ हि तपश्चर्या सुखार्थ धर्म इष्यते
सुखस्य मूलं प्रमदास्तासू सम्भोग इष्यते’ (नाट्यशास्त्र: २४ वा अध्याय “सामान्याभिनय”)

ह्या नाट्यशास्त्रातील श्लोकाचा येथे सर्वप्रथम उल्लेख करावासा वाटतो.
-या श्लोकातील ‘धर्म’ ही संकल्पना तत्वज्ञानाशी निगडीत आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही पुरुषार्थातील ही धर्म संकल्पना आहे. मग, हा धर्म म्हणजे नक्की काय आहे? तर, समाजाचं धारण हे नीति व तत्वांमुळे होतं, त्या नीति-तत्वांचे पालन आपण सर्वांनी जर केलं तर ज्या समाजाचे आपण सदस्य आहोत तो समाज टिकून राहील; यावरून प्रत्येक भूमिकेशी संबंधित असा धर्म म्हणजेच ठरलेली कर्तव्ये आहेत.
-म्हणूनच, धर्म प्राप्त करण्यासाठी माणूस तपश्चर्या करतो. धर्मप्राप्तीसाठी सुख प्राप्त करणे आवश्यक आहे, ह्या सुखाचं मूळ हे स्त्री आहे. त्यासाठी तिच्याशी मिलन होणे अथवा संभोग साधणे आवश्यक आहे, असे भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सांगितले आहे. ह्या तत्वज्ञानाच्या आधारावरच पुढे नायिकाभेद हे लिहिले गेलेले आढळतात. कारण, त्या सर्व नायिका ह्या पुरुषकेन्द्री आहेत.
-खरंतर, शास्त्रकरांनी हे मान्य केले आहे कि, स्त्रीच्या सुखाचे साधन पुरुष आहे, पुरुषाच्या सुखाचे साधन स्त्री आहे, ते दोघेही एकमेकांच्या सुखाचे साधन आहेत, असे असले तरी हे तत्वज्ञान फक्त पुरुषाच्या अनुषंगाने मांडले गेले आहे. म्हणजेच, हे उभयकेन्द्री लेखन नसून एककेंद्री लेखन आहे.

त्याचप्रमाणे, आणखी एक अत्यंत महत्वाचे विधान जे आपण नृत्याच्या संदर्भात सतत वापरत असतो; ते म्हणजे “नायिका ही आत्मा आणि नायक हा परमात्मा”!  हे पण एक प्रकारचे तत्वज्ञानच आहे.

योगाभ्यासात सांगितले गेले आहे कि, शिव म्हणजे साक्षात मूर्तिमंत रूप, तर नायिका ही शक्ती आहे. येथे नायिका म्हणजे ‘पार्वती’ आणि ह्या शिव-शक्तीचे मिलन ही अंतिम अवस्था आहे. तसेच ही संकल्पना ‘कृष्ण संप्रदायातून’ देखील आली आहे. ज्यामध्ये ‘कृष्ण’ हा परमात्मा आहे आणि ‘गोपी’ ह्या नायिका आहेत, त्यात कृष्ण म्हणजेच नायक हा अकर्ता आहे. पण नायिका म्हणजेच गोपी ह्या त्याला रिझवत आहेत- आपल्या नृत्य, नाटक, संगीताने. त्या का रिझवत आहे? तर, नायकाने त्यांचा स्वीकार करावा. म्हणजेच, त्या गोपिकांचे (नायिकेचा) म्हणजेच त्या आत्म्याचे परमात्म्याशी (नायक-कृष्णाशी) मिलन व्हावे यासाठी!
या संदर्भात रासक्रीडेचे चित्र पाहिल्यास लक्षात येते- रासक्रीडेमध्ये कृष्ण आणि त्याच्या सर्व गोपी नाचत असतात. गोपी ह्या स्वतंत्र असतात, पण त्यांचे जेव्हा परमात्म्याशी म्हणजेच कृष्णाशी मिलन होते तेव्हा तिचे स्वतःचे अस्तित्व न राहता ति कृष्ण होऊन जाते, त्याचे चित्रीकरण अथवा वर्णन म्हणून प्रत्येक गोपीबरोबर एक कृष्ण असे बघावयास मिळते.

 भारतीय तत्वज्ञानामध्ये ‘आत्म्याने परमात्म्यात विलीन होऊन जाणे’ ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अनेक उपमा वापरल्या आहेत. जसे कि, सागरामध्ये पाण्याचा थेंब पडला कि तो विलीन होतो, त्यातून तो वेगळा काढता येत नाही, अशाप्रकारे ते आत्म्याचे परमात्म्याशी होणारे मिलन आहे.

म्हणूनच, आत्म्याची वेगवेगळी रूपे आहेत म्हणून नायिकांचे प्रकार आहेत, स्त्रीची बहुरूपे आहेत. पण पुरुषाचे एकच रूप आहे. म्हणून, नायकांचे फार प्रकार/रूपे नाहीत, कारण तो अकर्ता आहे, तो जर कर्ता असता तर त्याचेही तसे प्रकार पडले असते.

एकूणच ह्या मूळ तत्वाचे प्रत्येक ठिकाणी प्रतिबिंब पडलेले दिसते, सामाजिक व्यवहारातील त्याचे प्रतिबिंब म्हणजे – “देवदासी परंपरा”.

एकूणच आपल्या भरतनाट्यम नृत्यशैलीला अध्यात्मिक पाया, तत्वज्ञान यातून निर्माण झालेली देवदासी परंपरा आणि शास्त्रात वर्णिलेले कामशृंगाराचे महत्त्व अशी भक्कम पार्श्वभूमी लाभल्याने सर्व नायिकाभेद हे त्यातून आले आहेत. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन, समर्पण ही भावना देवदासी परंपरेतही होती. स्त्रीचा ईश्वराशी विवाह लावला जायचा, ती त्याच्यासाठी नृत्य करायची. त्यातूनच पुढे मधुरा भक्ती, शृंगार भक्ती ह्या संकल्पना निर्माण झाल्या. म्हणजेच ती स्त्री नर्तिका ईश्वरालाच आपला पती अथवा प्रियकर मनात असे. त्यामुळे ज्या रचना आपण नृत्याद्वारे सादर करतो त्यात अर्ध्याधिक ठिकाणी नायक हा दिव्य म्हणजेच शिव, विष्णू, कृष्ण, कार्तिकेय असतो तर नायिका ही अदिव्या म्हणजेच सामान्य स्त्री दिसून येते. त्या अदिव्यतेचा तिच्या परमात्म्याविषयीचे प्रेम अथवा विरह दर्शवणाऱ्या अनेक रचना आपण सादर करतो, त्याचे अगदी उत्तम उदाहरण म्हणजे- वर्णम, पदम ह्या नृत्यरचना. म्हणूनच, जर ह्याच नायिकेचा स्त्री म्हणून, एक समाजातील स्त्री म्हणून विचार केला तर तिचे दुय्यमत्व आणि पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्टपणे दिसून येते. परंपरेचा पगडा कितीही खंबीर असला तरी एक समाजातील घटक म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःला स्त्री किंवा पुरुष म्हणवता तेव्हा आपण रंगमंचावर जे सादर करतो तेव्हा समाजाला काय संदेश देतो, समाजाच्या दोन्ही लिंगांना काय संदेश देतो ह्याचा आज विचार होणे अत्यावश्यक आहे. कारण ही काळाची तसेच समाजाची व कलेचीही गरज आहे.

संदर्भ:
नाट्यशास्त्र: बाबूलाल शुक्ल  (हिंदी), चौखंबा संस्कृत संस्थान, चौखंबा पब्लिकेशन्स, पृष्ठ क्र. २१६, श्लोक क्र. १४७.
प्रोफेसर श्री. सु. ए. भेलके यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून.


{नायिका ह्या विषयावर भरतनाट्यम च्या अनुषंगाने विचार करण्यास व काम करण्यास प्रवृत्त केले ते माझे गुरु श्री. परिमल फडके आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे नायिका ह्या विषयाकडे तत्वज्ञानाच्या अनुषंगाने पाहण्यास मदत झाली ते प्रोफेसर श्री. भेलके  ह्या दोघांना श्रेय जाते.}

- Swarada.






( This article has been published in English,in magazine 'LOUD APPLAUSE' which is an initiative by Kathak Pathshala of Neha Muthiyan)





Comments

Popular Posts