‘मधुरा भक्ती’ : सद्यकालीन परिस्थितीच्या दृष्टीकोनातून…

मधु, मधुर, मधुरा, या सर्व शब्दांचा अर्थ 'गोड'. एखादा खाद्यपदार्थ, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, बोलण्याची पद्धती या सर्वांना आपण हे विशेषण लावतो. मधुर शब्दाच्या उच्चारणातच त्याची चव, विरघळून जाण्याची क्षमता, तृप्तीची भावना या सर्वांचा अनुभव आपण गृहीत धरलेला असतो.

याच गुणधर्माचे मानवी नाते संबधातील आस्वादन म्हणजे 'मधुरा भक्ती'. याचे स्पष्टीकरण इतके सहज जरी केले असले तरी वास्तविक हा एक सूक्ष्म व विशिष्ट विचारसरणीतून पुढे आलेला एक वैचारिक संप्रदाय आहे. मानवी जीवन अनेक नातेसंबंधांनी परिपूर्ण असतं. मनुष्य ईश्वराशी सुद्धा एक नातं निर्माण करतो, त्याला मूर्ती रुपात पाहतो, त्यावर श्रद्धा ठेवतो, त्या मूर्त रूपातून अमूर्त असणाऱ्या ईश्वराशी तादात्म्य पावण्याची इच्छा ठेवतो व हेच परमानंदाचे तत्व आहे हे जाणतो.  भारतीय तत्वज्ञानातील 'मोक्ष' ही संकल्पना भारतीय कलांमध्ये सुद्धा प्रतिबिंबित होते. हाच मूर्त- अमूर्ताचा खेळ शास्त्रीय नृत्य शैलींमध्ये प्रकर्षाने दिसून येतो.

ऐतिहासिक संदर्भांचा वरकरणी आढावा घेता, आद्यग्रंथ नाट्यशास्त्रामध्ये, मधुरा भक्तीचा उल्लेख आढळून येत नाही. दाक्षिणात्य नृत्यशैलींचा विचार करता, पांड्य, चोल, विजयनगर व भोसले राजांनी दक्षिण प्रांतावर राज्य केले. चोल काळात भव्य मंदिरे बांधण्यात आली. या काळात देवदासींचा उल्लेख मिळतो. विजयनगर राजवटीमध्ये जेव्हा शैव पंथाकडून वैष्णव पंथाकडे वैचारिक प्रवाह वळला तेव्हा नृत्यातील मधुरा भक्तीपर रचनांच्या सादरीकरणाचे महत्व वृद्धिंगत झाले.

मधुरा भक्तीचे महत्व साधारणतः १२ व्या शतकापासून दिसून येते. मधुरा ही भक्ती नसून तो एक भाव समजावा असे अध्यात्मात सांगितले जाते. या मधुर भावाचे तीन प्रकार आहेत,

अ) कांताभाव ब) गोपिभाव क) सखीभाव 

कांता भावामध्ये भक्त ईश्वराला स्वतःचा पती मानून त्याची भक्ती करतो, परंतु निर्गुण उपासना करणाऱ्या अनुयायींसाठी हा मार्ग उचित नसतो असे अध्यात्म सांगते.

गोपी भावामध्ये भक्त कृष्ण व गोपी यांच्या लीलांचे काव्यातून वर्णन करतो.

सखी भाव हा कृष्ण व राधेच्या परस्पर प्रेमाचे वर्णन करणारी भक्ती आहे, यात भक्त स्वतःला पत्नी किंवा गोपी मानत नाही तर, राधा व कृष्णाच्या प्रेमाचा साक्षी असतो.

या सर्व भावांचे दृश्यात्मक स्वरूप नृत्यात सादर होत असते. कालानुरूप एका विशिष्ट संप्रदायातून पुढे आलेली ही  संकल्पना दृक-श्राव्य कलांमध्ये रुजली.

भरतनाट्यम नृत्यशैलीच्या अनुषंगाने मधुरा भक्तीच विचार करता काही मुद्दे समोर येतात.


सामाजिक परिस्थिती:

मधुरा भक्तीची संकल्पना साधारणतः १२ व्या शतकापासून जन मानसात रुजू लागली. आधी मुघल राज्यकर्ते व नंतर इंग्रजांच्या वर्चस्वामुळे पारतंत्र्यात असलेला भारत आपली सांस्कृतिक मूळे जपण्याचा प्रयत्न करत होता. हिंदू धर्माचे रक्षण व मूर्ती पूजेच्या निमित्ताने होणारी जनमानसातील एकी, या हेतुने मंदिर परंपरेचा उदय होऊ लागला. मंदिरांची उभारणी व जीर्णोद्धार करण्याची सुरवात या काळातील हिंदू राज्यकर्त्यांनी केली. याच परंपरेचा एक भाग म्हणून देवाची सेवा करणारी स्त्री, म्हणजेच देवदासी व तिच्या षोडशोपचारातील एक भाग म्हणून नृत्य सादरीकरण. या काळात विकसित होणारी मधुरा भक्ती साहजिकच नृत्य सादरीकरणाचा एक भाग बनली. भारतीय संस्कृतीला शृंगारिक आशय किंवा शृंगारिक अभिव्यक्तीचा भयगंड कधीच नव्हता, नाहीतर इसवी सनाच्या २ ऱ्या शतकात ‘कामसूत्र’ सारखा ग्रंथ, किंवा १० व्या शतकात ‘खजुराहो’ सारख्या मंदिरांची उभारणीच झाली नसती. परकीय मानसिकतेमुळे अशुचीतेच्या चक्रात अडकलेल्या रती भावनेला ईश्वरी परीसस्पर्श मिळाल्यामुळे, सांसारिक उपभोगाच्या परे जाऊन, मधुरा भक्ती हि ईश्वरी उपासनेचा प्रमुख घटक बनली.

७ व्या ते १० व्या शतकात वैष्णव संप्रदायाच्या वाढत्या प्रभावाचा परिणामही मधुरा भक्तीत दिसून येतो. कृष्ण हा आराध्य दैवत असताना वर उल्लेखलेल्या, मधुरा भक्तीतील विविध भावांचा यात समावेश झाला.

रचनाकार व आशय:

काही महत्वाच्या रचनाकारांच्या रचनांचा येथे आढावा घ्यावासा वाटतो. १२ व्या शतकातील कवी जयदेव, १६ व्या शतकातील वाग्येयकार क्षेत्रय्या, व १८ व्या शतकातील शहाजी राजे भोसले.


कवी 'जयदेव' हे बाराव्या शतकात राजा लक्ष्मणसिंह यांच्या पदरी होते. त्यांनी लिहिलेले 'गीतगोविंद' हे काव्य अजरामर झाले. त्यालील शब्दांची सांगितिकता, संस्कृत भाषेचा अप्रतिम वापर यामुळे ते काव्याचे आदर्श उदाहरण मानले जाते. परंतु, आनंद साधले यांच्या गीतागोविदाच्या भावानुवादामध्ये, “राधा –कृष्णाचे प्रणय मिलन म्हणजे जीवा-शिवाची एकता अशी श्रद्धा असणाऱ्या भक्ती पंथाचे उपासनागीत म्हणून गीतगोविन्दाची रचना मुळात झाली असे म्हटले जाते, पण या पंथीय प्रतिष्ठेच्या कक्षांतून गीतगोविंद सर्वसामान्यांत पोहोचाले ते शृंगार गीत म्हणूनच.” असा स्पष्ट उल्लेख येतो.

आंध्रप्रदेशातील मुव्व प्रांतात जन्मलेले, सोळाव्या शतकातील वरदय्या म्हणजेच 'क्षेत्रय्या'. दक्षिण प्रांतातील हे वाग्येयकार. अतिशय संथ लयीत व विविध रागात बांधलेली पद हे क्षेत्रय्यांचे वैशिष्ट्य. क्षेत्रय्या यांच्या काव्यांवर आधारित, जी. अरुणा यांनी लिहिलेल्या लेखात पुढील संदर्भ सापडतात, "मानवी जीवनात दिसून येणाऱ्या सर्व कामुक क्रियांचा क्षेत्रय्याच्या काव्यात वापर केलेला दिसतो. स्त्री व पुरुष या दोहोंच्या स्वभावाचे आकलन त्यास होते. असे म्हटले जाते कि त्याचे राजदासी सोबत असलेल्या संबंधांचे प्रतिबिंब त्याच्या काव्यात दिसून येते."

तंजावूर प्रांतावर राज्य केलेले 'शहाजी राजे दुसरे' हे त्यांच्या बुद्धिमत्ता, रसिकता व दूरदर्शित्व यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी स्वतः अनेक पदांची रचना केली. त्यांच्या पदांमध्ये वैविध्य आहे. मंगलपदे, भक्तीपदे, नितीपद व शृंगार पदांचे लेखन त्यांनी केले. त्यांचे आराध्य दैवत त्यागेश, यामुळे त्यांच्या मधुरा भक्तीतील नायक हा शिव आहे.

प्रथमतः या तीन रचनाकारांचा विचार करण्याचे कारण- या सर्वांनी नृत्य सादरीकाराणासाठी पद लिहिली. त्यातील आशय हा शृंगार प्रधान असून मधुरा भक्तीवर आधारित आहे. परंतु यात वर्णन केलेली शृंगारिकता बहुतांशी वेळेला कायिक स्वरूपाची वाटते. गाण्यातील आशय हा अमूर्त असतो परंतु, नृत्याला हस्तांची, अभिनयाची ठराविक चौकट असते व प्रतीकांमधून त्याचे सादरीकरण होत असते. एका विशिष्ट साहित्याला न्याय देण्यासाठी नर्तकीला त्यातील आशयाचे शब्दार्थ स्वरूप व व्यंजनात्मक दोनीही स्वरूपाचे सादरीकरण करावे लागते. म्हणूनच बहुतांशी कायिक संदर्भ असणाऱ्या या पदांचे सादरीकरण भक्तीभावापर्यंत न पोहोचता शृंगार गीतापर्यंतच सीमित राहते.

संतकवी व मधुरा भक्ती:

संताचे वाङ्गमय ही भारतीय साहित्यातील सुवर्णाक्षरे आहेत. मीराबाईची काव्ये, ज्ञानेश्वरांच्या विराण्या, अन्नमाचार्यांची कीर्तने, त्यागराजांची पद, या सर्व भक्ती रसाने परिपूर्ण आहेत. मीराबाई ही कृष्णभक्त होती, तिने स्वतःला कृष्णाची पत्नी मानले व त्याच्या विरहात अनेक पदरचना केल्या. तिची भक्ती मधुर भावानेच होती, परंतु या पदांमध्ये कायिक शृंगाराचा उल्लेख अजिबात येत नाही. त्यातील भक्ती भाव आणि समर्पण काव्यातून स्पष्ट दिसते.

संत ज्ञानेश्वरांनी स्वतःला स्त्री समजून ईश्वराची आराधना केली. सांख्य तत्वज्ञानातील पुरुष व प्रकृती यांचे विश्लेषण व मोक्ष प्राप्तीची इच्छा याचे आकलन ज्ञानेश्वरांच्या विराण्यातून होते. या संतकवींनी वेदांचे तत्वज्ञान सरळ व सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांमध्ये पोहोचवले. ही मधुरा भक्ती सादरीकरणाचा भाग असल्यास, नंदिकेश्वराच्या ग्रंथात उल्लेखिल्या प्रमाणे, नृत्यसभा विद्वान रसिकांनी युक्त असेल व नर्तकी वेद वृक्षांच्या सहाय्याने शास्त्र फुलांची उधळण करेल.

एक स्त्रीवादी भूमिका:

स्त्री ही भारतीय समाजात भोग्य मानली जाते. नाट्यशास्त्राच्या एका अनुवादामध्ये नायक - नायिका संबंधांचे विश्लेषण करताना, नायिका परतंत्र मानली जाते व तिचे पुरुषांतर संबध असल्यास शृंगार रसाची हानी होते असा उल्लेख येतो.

देवदासी स्त्रियांचे देवाशी लग्न लावले जात असे, त्यांना 'नित्यसुमंगली' असे संबोधले जात असे. स्त्रीचे सौभाग्य हे नेहमीच तिच्या पतीच्या अस्तित्वावर अवलंबून होते. या सर्व सामाजिक बाबींचा विचार करता, स्त्रीचे वर्णन हे नेहमीच पुरुष प्रधान संस्कृतीचे प्रतिक असल्याचे जाणवते. जयदेव किंवा क्षेत्रय्या यांनी स्त्री शरीराचे विलोभनीय वर्णन त्यांच्या पदामध्ये केले आहे. परंतु, कोणत्याही कवयत्रीला स्त्री देहाचे वर्णन करून भक्ती व्यक्त करण्याची इच्छा झाली नाही?

राज दरबारात नृत्य हे मनोरंजनाचे साधन होते व पुरुषांच्या मानसिकतेला भुरळ पाडणाऱ्या पदांची रचना असे सर्वसाधारण चित्रण यावरून दिसते. विविध भाषांचे सौंदर्य वादातीत आहे परंतु भाषेचे सौंदर्य विषयातील आशय बदलू शकत नाही. जयदेवाच्या काव्याला शब्द-शिल्प संबोधले जाते, पण रंगमचावर त्याचे सादरीकरण करताना त्यातील कायिक शृंगार वगळता येत नाही.

स्त्री मध्ये समर्पणाचा गुणधर्म असतो ही समाजानेच स्त्रीच्या ठिकाणी रुजवलेली भावना आहे. स्त्रियांवर केलेले संस्कार त्यांना मानसिकरित्या दुर्बल बनवतात. 

रंगमंचीय सादरीकरणात आपल्याशी झालेल्या असभ्य वर्तनाची कबुली देणारी नायिका असो, किंवा शृंगार ही पूजा समजून आपले ‘स्तनकलश’ नायकासाठी सज्ज ठेवणारी नायिका असो, कोणती स्त्री या आशयाचे पद संपूर्ण मनोभावाने सादर करू शकेल?

समकालीन स्थिती:

'परंपरा' म्हणजे वर्षानुवर्ष जतन झालेल्या काही रिती किंवा पद्धती. परंतु परंपरा प्रवाही असते. जुन्याचे जतन व नवतेची भर असे तिचे स्वरूप निसर्ग नियामानुरूपच आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. नृत्त हे अमूर्त असत, परंतु नृत्याला आशय असतो व तो कालानुरूप बदलतो.

आजच्या काळातील प्रसारमाध्यमांद्वारे समोर येणाऱ्या अश्लील व्यापाराने आपल्या भावना बोथट झाल्या आहेत, त्यात अजून या शृंगार गीतांचे सादरीकरण कोणत्याही नवीन विचाराची समाजमनात भर टाकत नाही.

कलेमधून समाजाचे प्रतिबिंब दिसते, भारतीय समाज बदलतो आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, इंटरनेटचे मायावी जाल व मनोरंजनाची सहज उपलब्ध साधने, या परिस्थितीत शास्त्रीय नर्तकांनी प्रत्येक सादरीकरणाचा सखोल विचार करावा एवढेच.


संदर्भ सूची :
1. नाट्यशास्त्र, बाबुलाल शुक्ल शास्त्री. चौखंभा पब्लिकेशन्स, नई दिल्ली ११०००२.
2. Tyagesh padas of Shahaji maharaj,T.M.S.S.M liabrary,Tanjavur,1980.
3. Studies in Indian archeology, S.B.Deo and M.K.Dhavlikar, popular prakaashan private limited, Tardeo , Mumbai 400034.
4. Geet govind, Anand Sadhale, Majestic book stall, Mumbai 400004.



- सई शेटये. 





She has several years of training of Bharatanatyam under Sandhya Purecha, Kala Parichay, Mumbai & she completed graduation and post-graduation in dance under the guidance of Dr. Sucheta Chapekar. She started her further education in dance from Shri. Parimal Phadke since 2007. Saee received National scholarship  in Classical Dance granted by the Central Government of India. She won the 'Vedic Heritage' competition & performed in New York 2008 at the prestigious Jasraj Foundation. Saee was conferred upon the tittle 'Singaramani' by 'Sur Singar Sansad', Mumbai 2009. She is working as an impaneled Guru, for graduate students of Bharatanatyam, at the center of Performing arts, Savitribai Phule Pune University. Saee has performed in several dance productions in India and abroad. Recently she went to France for performance in India Armor festival with Shri. Parimal Phadke and his troupe. Her performance "Kavyanjali" was based on anthropology of her own poems. "Arthotpala" was her recent solo dance performance where she attempted to unravel the multiple petals of meaning through the traditional compositions of Bharatanatyam. 








  






Comments

  1. बारकाव्यांसाहित स्पष्टीकरण केलेलं आहे...खूप छान.....

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती आहे आणि मराठी भाषेत फार कमी गोष्टी वाचायला मिळतात इंटरनेट वर मराठीत असल्या मुळे फार छान वाटलं धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts