'पंचकन्या......एक नृत्यकथी'

* PREVIEW:
a small introduction of the new dance production by: Guru Dr. Swati Daithankar.




" बिजली उसपर आज गरजकर टूटी 
   न जाने कितने घरों में अहिल्या पत्त्थर है बन बैठी...."

   अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी ह्या प्रातःस्मरणीय पंचकन्या आणि त्यांच्यावर झालेला अन्याय हे कथाबीज गेली दहा वर्षे माझ्या मनात होते. त्यासाठी पुराण, रामायण, महाभारत आदि ग्रंथ अभ्यासले. इतर विद्वानांनी त्या स्त्रियांविषयी मांडलेले विचार वाचले आणि एक सशक्त संहिता तयार झाली. भरतनाट्यममधील रागमालिका, तालमालिका, जति (बोलांचे तुकडे) ह्यांचा वापर करत संस्कृत, ब्रज, हिंदी भाषेचा वापर करत, कर्नाटक पद्धतीचा वाद्यवृंद (गायन, ताळम, मृदंगम, व्हायोलीन) वापरून त्यातील वाचिकाभिनय घेतला; तरीही देहबोलीचा फक्त वापर करीत त्यांची भूमिका सुस्पष्ट मांडता येईल, असे वाटेना; म्हणून काव्यमय संवाद वाचिकाभिनयात समाविष्ट केला. त्यामुळे 'संवादात्मक नृत्य' असा अभिनव प्रकार समोर आला. भरतनाट्यम शैलीशी कुठेही तडजोड न करता ह्या पंचकन्या बोलत्या झाल्या.
   अभिनय, नाट्यात्मक संवाद, लय-तालाचा आविष्कार, कविता करण्याची प्रतिभा आणि मुळातच असलेली संवेदनशीलता, आत्मविश्वास, रंगमंचीय सहजता हे सर्वच माझ्या व्यक्तिमत्त्वाचा व अभ्यासाचा, परिपाठाचा भाग असल्यामुळे माझ्यातल्या सगळ्या शक्यता आजमावून पाहण्यासाठी आणि कुठेतरी सध्याच्या स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांची नाळ ह्या स्त्रियांशी जुळवून घेण्यासाठी आणि त्याद्वारे सामाजिक भान जपण्यासाठीही मी हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले.त्यासाठी स्वतंत्रता जपण्यासाठीही मी भरतनाट्यम नृत्यशैली 'एकाहार्य' असल्यामुळे एकपात्री अभिनयाचा आधार घेतला. उस्फूर्तता जपण्यासाठी वाद्यवृंदाचा वापर केलं; म्हणजे प्रत्येक प्रयोग ताजातवाना होईल, त्यात भर घालता येईल, असा विचार त्यामागे होता.
"रावण से तो लड़ी मैं माँ 
  पर राम से हारी सीता....."    
   असे म्हणणारी सीता लोकांना भावतेय, अहिल्या भिडतेय, द्रौपदीची कैफियत त्यांना कळतेय आणि मुख्य म्हणजे ह्या स्त्रियांत प्रेक्षक स्वतःचे प्रतिबिंब पाहत आहेत; ही गोष्ट ९ ऑगस्टच्या पहिल्याच कार्यक्रमात माझ्या लक्षात आली. लगेच दुसरा प्रयोग ११ सप्टेंबरला झाला आणि आता १८ सप्टेंबरला तिसरा प्रयोग सायं. ५;३० वाजता बालशिक्षण मंदिर, पुणे येथे होतो आहे. ही रसिकांची दाद निश्चित सुखावणारी आहे. स्वतःच्या कविता स्वतः म्हणणं नृत्य करताना हे एक वेगळेच आत्मिक समाधान लाभते. तिसरा प्रयोग नवीन कवितांसह होतो आहे. मैथिली राघवन-नट्टूवांगम, शिवप्रसाद-गायन, चंद्रन-मृदंगम आणि बालसुब्रमण्यम- व्हायोलीन अशी साथसंगत आहे.
   आदि मायेशी नाळेच नातं असणारी ह्या पंचकन्यांची कैफियत आजच्या आधुनिक स्त्रीपर्यंत आणण्याचा हा नृत्य-संवादमय प्रवास म्हणजेच 'पंचकन्या'.



Comments

Popular Posts