कलाकारांच्या आरोग्यसमस्या: भाग १ (संगीत)

लेखक: डॉ. हिमांशू वझे.

फोटोग्राफी: हर्षद झरे, edited by: संवाद


कुठल्याही कलासाधनेत शरीर हे कलाकाराचं मुख्य भांडवल असतं. व्यावसायिक कलाकार दिवसाचे किमान चार ते सहा तास रियाझ करतात. संगीत आणि नृत्यकलाकारांना शरीराच्या विशिष्ट अस्थिबंध- स्नायूंच्या वारंवार हालचाली कराव्या लागतात. उदाहरणार्थ, तबला, मृदुंग अथवा ढोलकीवादक हाताची बोटं वेगवेगळ्या लयीमध्ये दीर्घकाळ आपटत असतात. व्हायोलीन, सतार अथवा सरोदवादक उजव्या हाताच्या मनगटाची अव्याहत हालचाल करत असतात. मुळात शरीराचे हे भाग अशा हालचालींसाठी बनवलेले नाहीत. त्यांच्या अतिरिक्त वापराने ‘overuse syndrome’ अर्थात अतिवापराने होणाऱ्या इजा संभवतात. अशाच प्रकारच्या इजा नृत्यकलाकारांमध्येही दिसतात. नृत्याच्या रीयाझामध्ये गुडघे, घोटे आणि तळव्यांना या chronic repetitive injuries चं प्रमाण जास्त असतं. याशिवाय सततचा प्रवास, जागरणं, आहाराकडे दुर्लक्ष, संगीतसाधानेतली बैठी जीवनशैली, व्यसनाधीनता, नियमित व्यायामाचा अभाव यामुळे सर्वत्र बोकाळलेले मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपण, गुडघेदुखी, पाठदुखी, हायपोथायरोइडीझम इत्यादी आजार कलाकारांमध्ये मोठया प्रमाणात आढळतात.
कलेच्या रियाझामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा थोड्या तपशिलात विचार करू. अशा इजा संगीत आणि नृत्य कलावंतांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.


   संगीत कलाकारांच्या समस्या: 

   संगीतसाधनेत, विशेषतः वादकांना विशिष्ट हालचालींच्या अतिरेकामुळे आणि त्या हालचालींशी निगडीत अशा चुकीच्या शरीरस्थितीमुळे (posture) शारीरिक वेदना सुरु होतात. तंतूवाद्यवादकांमुळे मनगटाच्या हालचालींमुळे; तर संवादिनी, कसिओ वादकांच्या बोटांच्या हालचालींमुळे finger and wrist extensor or flexor tendinitis चा त्रास उद्भवतो. व्हायोलीन वादकांमध्ये wrist extensor स्नायूंच्या वापरामुळे बो फिरवणाऱ्या हाताच्या कोपरामध्ये बाहेरच्या बाजूला वेदना सुरु होतात. त्याला ‘epicondalgia’ असं म्हणतात. याचं साधर्म्य क्रीडापटूना होणाऱ्या ‘tennis elbow’ नावाच्या प्रसिध्दीझोतात आलेल्या आजाराशी असत. त्याचबरोबर क्रीडासाधनांची लांबी, रुंदी, आकार, वजन इत्यादी गोष्टी जशा प्रमाणित असतात तसच संगीतातील वाद्यांचही आहे. माणसाची उंची कमीजास्त असली तरी वाद्याची लांबी बदलत नाही. भारतीय संगीत परंपरेमध्ये वादन हे बसून केलं जातं. त्यामुळे वाद्य जमिनीवर टेकवून शरीराजवळ धरलं जातं. वाद्याची उंची ठराविक असल्यानं वादकाला स्वतःचं शरीर वाद्याप्रमाणे जुळवावं लागतं. वाड्याच्या आकारमानाप्रमाणे अंतर्गत रचनांमध्येही बदल करणं सर्वसामान्यपणे अशक्य असतं. बासरीच्या भोकांचा आकार व रचना बोटाप्रमाणे वेगवेगळ्या नसतात. तंतूवाद्यामध्ये फिंगरबोर्ड सारख्याच आकाराचे असतात. तबल्यामध्ये चाटी, लव किंवा शाईच्या क्षेत्रफळात बोटांच्या लांबीप्रमाणे बदल होत नाही. त्यामुळे मुळामध्ये एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या लयीत व ताकदीनं प्रदीर्घ काळ करायच्या हालचालींसाठी न बनलेल्या हाताला व तो सहजतेने हलावा यासाठी आवश्यक सर्व स्नायूबंधांना वाद्याबरोबर एकत्र ‘नांदण्यासाठी’ अनेक तडजोडी कराव्या लागतात. याचा शरीररचनेवर व शरीरक्रियेवर होणारा दूरगामी परिणाम प्रत्येक कलावंतासाठी त्याच्या शरीर व वाद्यप्रकारानुसार वेगवेगळा असू शकतो.

   तालवाद्य किंवा फुंकवाद्य वादनात खांदा बाहेरच्या बाजूला उचलून धरावा लागतो. supraspinatus नावाचा स्नायू या अवस्थेत मुख्यतः कार्यरत असतो. खांद्यामध्ये निर्माण झालेल्या ताणामुळे किंवा खांदा चुकीच्या पद्धतीनं वळवल्यामुळे shoulder tendinitis किंवा rotator cuffinjury होण्याचा संभव असतो. वादनाच्या पद्धतीत योग्य ती सुधारणा करून या इजा टाळता येतात. चुकीच्या पोश्चरमुळे मानेवरही प्रचंड ताण येतो. मानेच्या भागातून निघणाऱ्या नसा (spinal neves), मानेच्या व खांद्याच्या मुळाशी असणारा नससमूह (brachial plexus), तसच रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ शकतात. तंतूवाद्य वादकांमध्ये विशिष्ट स्नायूबंध आकाराने वाढून नसा दाबल्या जातात (median/unlar nerve compression) तसेच टेनोसायनोव्हायटीस (tenosynovitis) होण्याची शक्यताही असते.

   तालवादक तसेच स्वरवाद्य (संवादिनी, पिआनो इ.) वादकांना अंगठ्याच्या मुळाशी वेदना सुरु होतात. याचाही संबंध हालचालींमध्ये आलेल्या ताणाशीच असतो. कुठल्याही वादाकासाठी हाताच्या बोटामधील टोकाच्या भागाला असलेल्या नैसर्गिक संवेदना (pulp sensitivity) महत्त्वाच्या असतात. अचूक स्वरनिर्मितीकरता एका मिलीमीटरच्या दहाव्या भागाएवढा फरकही वाद्यवादनामध्ये चालत नाही. त्यामुळे बोटापासून खांद्यापर्यंतच्या भागात येणारी कुठलीही वेदना वादकाने दुर्लक्षित करता कामा नये. वादनपद्धतीतले दोषनिवारण, शरीरस्थितीमध्ये दुरुस्ती आणि विशिष्ट स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम करणं त्यासाठी गरजेचं असतं.

   वादकांच्या मनानं गायकांना शरीररचनेची विशेष तडजोड करावी लागत नाही. सध्याच्या काळात गायन हे सुद्धा संपूर्णपणे दृक्श्राव्य (audiovisual) झालं आहे.  बसून आणि उभ्यानं गाण्याची, साभिनय सादरीकरण करण्याची क्षमता आवश्यक झाली आहे. त्याकरता गुरुत्वाकर्षणाविरुद्ध काम करणाऱ्या सर्व स्नायूंची (antigravity mucules)  स्थिर ताकद वाढवणं महत्वाचं आहे. अयोग्य प्रकारे बसण्याने अथवा उभं राहण्याने पाठ आणि मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे रीयाझाच्या वेळेचं पोश्चर आणि मेरूदंडाची (spine) ताकद व लवचिकता वाढवणारे व्यायाम नियमितपणे करावे. गाण्याच्या रियाझात आवाज बसणं, घसा दुखणं/घोगरा होणं, श्वास कमी पडणं इत्यादी त्रास होऊ शकतात. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं सर्वोत्तम. गायकांची उंच पट्टीमध्ये बोलू/किंचाळू नये. उदा. चिअरिंग, घोषणाबाजीपासून लांब राहावं. सादरीकरणाअगोदर थंड पदार्थ टाळावेत, श्वासाचे व्यायाम वगैरे गोष्टी नियमितपणे कराव्यात.


(to be continued...
Part II Dance will be publish on tomorrow)


[ प्रस्तुत लेख लेखकाच्या परवानगीने ललित कला केंद्र, सा.फु. पुणे विद्यापीठ तर्फे प्रकाशित 'प्रयोगकलावैद्यकशास्त्र' या पुस्तकामधून घेण्यात आला आहे. ]



   
डॉ. हिमांशू वझे
डॉ. हिमांशु वझे  (संपर्क भ्रमणध्वनी : ०९८५०८९९२११)
एम्.बी.बी. एस., एम्.डी.(शरीरक्रियाशास्त्र), (बी.जे. मेडिकल पुणे)
डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडीसीन (जर्मनी)
सांधेदुखी व क्रीडावैद्यक तज्ञ
क्लिनिकचा पत्ता : रोहन चेंबर्स, कर्वे पुतळा चौक,कोथरूड पुणे ३८; दूरध्वनी :०२०-२५४४१५१२
वक्त्याविषयी  थोडक्यात ओळख:
महाराष्ट्रात व बाहेर स्वास्थ्याशी निगडीत विषयावर २०० हून अधिक व्याख्याने
अनेक वैद्यकीय व बिगरवैद्यकीय महाविद्यालयात १२ वर्षे अध्यापन
प्रयोगकलावैद्यकशास्त्र या विषयावरील पाठ्यपुस्तकाचे लेखक
पुणे विद्यापीठ, फिल्म व टेलीविजन इंस्टिट्युट ऑफ इंडिया, फ्लेम इ. संस्थांशी १० वर्षे निगडीत
विविध वृत्तपत्रात अनेक लेखमाला
भारतीय तायची अकादमी या मार्शल आर्ट संस्थेचे गेली ७ वर्षे प्रशिक्षक
गेली १५ वर्षे १० नाट्यसंहितांचे लेखन व अनेक पुरस्कार
अध्यात्मिक ग्रंथांचे २० वर्षे अध्ययन व त्यानुसार नियमित ध्यान व प्रवचनसाधना
व्हायोलीनचे १२ वर्षे प्रशिक्षण
क्रिकेट,जलतरण,बॅटमिंटन,टेबल टेनिस इत्यादी स्पर्धात्मक क्रीडाप्रकारात सहभाग
सिंहगडावर १०० वेळा चढण
हिमालयात अनेक ठिकाणी भ्रमंती
ताकद,लवचिकता व दमछाकेच्या व्यायामाचा गेली १५ वर्षे नियमित सराव
अनाथमाता सिंधुताई सपकाळांच्या संस्थेशी गेली १५ वर्षे निगडीत  

Comments

Popular Posts