'नायक': शास्त्रीय नृत्यांचे प्रेरणादायी उस्ताद

      भारतीय शास्त्रीय नृत्यांची परंपरा ही स्त्री नर्तिका आणि पुरुष- नृत्यगुरु, संरचनाकार अशा भिन्न भूमिका बजावताना प्रकर्षाने दिसून येते; पण तरीही ज्यात पुरुष  नर्तकांची परंपराही हळू हळू रुजताना दिसत आली आहे. नृत्य हे केवळ स्त्री सौंदर्याची (शरीर सौंदर्य) अनुभूती देण्यासाठी नसून तसेच ते केवळ स्त्रीसाठी, स्त्री निगडीत नसून पुरुषही तितक्याच ताकदीने, तरबेजतेने ते सादर करून प्रेक्षकांना आकर्षित करू शकतात, आपल्या नृत्यातून प्रेक्षकांना आनंद देऊ शकतात, हे रविवार, १७ जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर येथे  संपन्न झालेल्या "नायक" महोत्सवात भारतातील ३ विभिन्न शास्त्रीय नृत्यांच्या पुरुष-नर्तकांनी साध्य करून दाखविले, ज्याची प्रचिती तेथे उपस्थित सर्व पुणेकरांना आली. 'नृत्यास्मी' डान्स इन्स्टिट्यूट आणि ललित कला केंद्र (गुरुकुल), सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ यांतर्फे आयोजित "नायक" महोत्सवात कथक नर्तक 'अनुज मिश्रा (वाराणसी)', मयूरभंज छाऊ नर्तक 'राकेश साई बाबू (दिल्ली)' आणि भरतनाट्यम नर्तक 'परिमल फडके (पुणे)' ह्या कलाकारांनी आपले विचार आणि नृत्यातून 'नायकाचा' एक विलक्षण आणि अविस्मरणीय ठसा उमटवला, जो नृत्याकडे बघण्याचा, नर्तकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास परिणामकारक ठरला.
नृत्याचे आराध्यदैवत असलेल्या 'नटराज' रुपी भगवान शिवांपासून नृत्यास प्रारंभ झाला. असे भगवान शिव हेच सर्वात पहिले शास्त्रीय नृत्याचे सादरकर्ते आणि नृत्याचे शास्त्र सांगणारे देखील आहेत; हे न विसरता पुरुष नर्तकांविषयीचा आदर असावा, येथे स्त्री-पुरुष लिंगभेद करू नये याची जाण हळूहळू समाजात निर्माण होण्यासाठी असे पुरुष-प्राधान्य नृत्याचे प्रयोग सतत झाले पाहिजेत, विशेषतः महाराष्ट्रात तसेच भारतभर आणि अशा ठिकाणी देखील जिथे शास्त्रीय नृत्याविषयी जागरूकता नाही.
ऋजुता जोग मुलाखत घेताना; - अनुज मिश्रा, राकेश साई बाबू आणि परिमल फडके 
आजपर्यंत जे जे पुरुष नर्तक म्हणून प्रसिध्द आहेत, ते एक तर आपल्या घरात चालत आलेल्या परंपरेमुळे नृत्य करत आले आहेत तसेच आपल्या पालकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे. असे असले तरी अनेक प्रकारची आव्हाने ह्या नर्तकांच्या जडणघडणीत आली आहेत आणि ती येतच राहतात. ह्या संदर्भात, ऋजुता जोग यांनी घेतलेल्या मुलाखतीतून अनेक मुद्दे ह्या नर्तकांनी मांडले.
अनुज मिश्रा 

"पुरुष शास्त्रीय नृत्य शिकतात त्यामुळे ते स्त्रियांसारखे होतात असा सर्वांचा समज झाला आहे पण तसे नसून शंकरापासून आलेले हे नृत्य आहे त्यामुळे ते केवळ स्त्रिया नाहीत तर पुरुषही सादर करू शकतात तसेच आपल्याकडे जितका प्रतिसाद हा बॉलीवूड ला  मिळतो तितका शास्त्रीय नृत्य आणि नर्तकांना मिळत नाही , जो मिळायला हवा!" 
- अनुज मिश्रा .

लखनौ घराण्याचे कथकचे शिक्षण आपले वडील कै. पंडित अर्जुन मिश्रा यांच्याकडून त्यांनी घेतले. शिव तांडव, परमेलू, थाट, आमद, तोडा, परन, चक्कर यांच्या जोडीला भगवद्गीतेतील कृष्णाच्या उपदेशांची अभिनयाद्वारे साकारून आठवण करून दिली. मयूर गती, घोडे कि चाल आणि १०३ चक्कर ह्या संकल्पना आणि त्यांचा अत्यंत उठावदार पदन्यास याची अनुभूती मनोरंजक आणि कठोर साधनेचे महत्त्व सांगून जाणारी होती.
राकेश साई बाबू 

"छाऊ नृत्य हे छाया अथवा छावणी यांवरून तयार झालेला शब्द आहे -छाऊ. राजांच्या काळी युद्धाच्या दिवसांत छावणीतील सैनिकांना युद्धासाठी तयार होण्यास प्रवृत्त करण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हे नृत्य त्यांच्यासमोर सादर केले जाई. ह्या पार्श्वभूमीतून आलेले हे नृत्य मुलींपेक्षा मुलांची संख्या शिकण्यास सर्वाधिक आहे. एकूणच ह्या नृत्यातील हालचाली, शारीरिक हालचाली (आंगिक अभिनय) पुरुषप्रधान जास्त आहे. ह्या नृत्याविषयी  लोक  पूर्णपणे जागृत नाहीत,  छाऊ ह्या नृत्याची ओळख वाढायला हवी, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवे हे महत्वाचे" - राकेश साई बाबू .
वीररसपूर्ण, उत्साहपूर्ण, जोमदार हालचाली, प्रोप्सचा वापर ही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये ह्या नृत्यशैलीची अनुभवायला मिळाली. राकेशजी आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या रचनांमधील काही आणखी ठळक वैशिष्ट्ये म्हणजे- संगीत ! साहित्याचा समावेश नसलेले, केवळ पारंपारिक वाद्ये एका विशिष्ट लयीत वाजत असताना त्यावर नर्तक किती वेगळ्या वेगळ्या हालचाली, पदन्यास करत असताना तालाशी खेळ करू शकतो, अभिनयाद्वारे कृष्ण-अर्जुनाची महाभारताच्या युद्धाची कथा मांडू शकतो अशा मनोरंजक गोष्टी छाऊने दाखवल्या. वीररसप्रधान असल्यामुळे आणि ह्या नृत्य शैलीच्या आंगिक अभिनयाला साजेसे विषय ह्या छाऊ नर्तकांनी मांडून सररास बघायला न मिळणाऱ्या पुणेकरांसाठी मनोरंजनाचा केंद्रबिंदू ठरला.

परिमल फडके 

भरतनाट्यममधील  नृत्त रचना मल्लरि ने आपल्या नृत्यास प्रारंभ करून परिमलजींनी स्वतः रचलेले "भुजंग कौत्वम" आणि त्याचबरोबर भरतनाट्यम नृत्यात स्त्री-प्राधान्य पदम, जावळी ह्या अभिनयाच्या रचना सर्वाधिक असताना त्यांनी रचलेला 'परकीय नायक' पद हा नृत्य विषयक साहित्य क्षेत्रात सृजनतेची जाणीव करून देणारे होते. तिल्लानाने शेवट करून भरतनाट्यमच्या नृत्त आणि अभिनयाला एक उत्साहपूर्ण, सौंदर्ययुक्त आणि न्यायपूर्णतेची अनुभूती ही त्यांच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये. नृत्याकडे  परंपरेबरोबरच नाविन्यपूर्ण विचाराने बघणारे हे कलाकार असून 'नायक' ह्या विषयात ते अनेक वर्षे काम करत आहेत. मुलाखतीत त्यांनी मांडलेला एक मुद्दा म्हणूनच महत्वाचा ठरतो:

“नृत्यासाठी ज्या रचनाकरांनी रचना लिहिल्या त्या ‘आत्मा आणि परमात्मा’ ह्या संकल्पनेवर आधारित लिहिल्या. परमात्मा म्हणजे ‘देव’ (पुरुष) आणि आत्मा म्हणजे मुख्यत्वे ‘स्त्री’ (नायिका) ह्या दृष्टीकोनातून ज्या रचना लिहिल्या गेल्या ज्यातून नायिका अभिव्यक्त होते, जिच्यासाठी हा परमात्मा तिच्या प्रिय व्यक्ती अथवा पतीसामान असतो; अशा रचना ज्या स्त्री नर्तिकाकेन्द्री ठरतात, इथे पुरुष नर्तकांना मोठे आव्हाहन असते ह्या ‘आत्मा-परमात्मा’ संकल्पनेत त्यांनी नृत्य कसे सादर करावे?”
-परिमल फडके.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नृत्यगुरु शमा भाटे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आणि डॉ. शुभांगी बहुलीकर यांची विशेष उपस्थिती आणि आणि विचार व हे तिनही ज्येष्ठ कलाकार, ऋजुता जोग यांची कल्पना यांतून साकार झालेला “नायक” महोत्सव नृत्य क्षेत्रात एका नवीन क्रांतीला सुरुवात करणार हे नक्की!





-written by:  स्वरदा.
-photography: तेजदीप्ती पावडे 







Comments

Popular Posts