"नृत्यात परंपरेबरोबरच समकालीन विचार व सृजन महत्त्वाचे"



“कोणतीही कला ही साधना म्हणून जोपासणाऱ्या कलाकाराचे व्यक्तिमत्व व विचार हे एक प्रेरणेचे स्थान होऊ शकते याची प्रचिती येते ती त्या कलाकाराच्या कलेतील सर्जनशीलता बघून आणि त्याच्याशी साधलेल्या संवादातून!”, असा अनुभव देणारा कलाकार जर आपलेच गुरु असतील, तर त्याचा आनंदही वेगळाच असतो! अशीच एक प्रसन्न व्यक्ति आणि प्रेरणादायी कलाकार म्हणजे माझे गुरु श्री. परिमल फडके! परिमल फडके हे पुण्यातील सुप्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार असून; गुरु रमा श्रीकांत, गुरु वासंती सुब्रमण्यम गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर आणि डॉ. जयश्री राजगोपालन यांचे ते शिष्य. अशा उत्तम गुरूंकडून मार्गदर्शन मिळवून स्वतःची एक उत्तम नर्तक म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली आहे. भारतात अनेक ठिकाणी तसेच अमेरिका, फ्रान्स, रशिया, चायना आणि स्वित्झर्लंड येथे त्यांनी आपल्या नृत्याचे सादरीकरण केले आहे. ‘सिंगारमणी’, ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ आणि ‘कलातीर्थ’ यांसारखे मान्यवर पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
ह्या मुलाखतीच्या निमित्ताने नृत्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन, गुरूंकडून मिळालेले मार्गदर्शन, त्यातून निर्माण केलेली स्वतःची स्वतंत्र शैली, नृत्य क्षेत्रातील त्यांचे प्रयत्न प्रयोग, एक नर्तक आणि गुरु म्हणून त्यांनी दिलेले विचार, तसेच सूचना यांमुळे हि मुलाखत एकप्रकारचे मार्गदर्शन ठरते. म्हणूनच मुलाखतीचा हेतू हा औपचारिक नसून नृत्याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद आहे हे नक्कीच


   सर्वप्रथम तुमच्याविषयी हे जाणून घ्यायला आवडेल कि, ज्या मान्यवर गुरूंकडून तुम्हाला भरतनाट्यम नृत्याचे मार्गदर्शन लाभले, त्या सर्व गुरूंकडून मिळालेली अशी कोणती मूल्य आहेत जी तुम्ही आजही अनुसरता?
माझी नृत्याची सुरुवात मी साडेचार वर्षांचा असताना बडोदा येथे गुरु रमा श्रीकांत यांच्याकडे झाली. सहा वर्षे रमाजींकडे शिकल्यानंतर लखनौमध्ये स्थायिक झाल्यामुळे तिथेच भातखंडे संगीत विद्यालयात मी नृत्याचं पुढील प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली, गुरु वासंती सुब्रमण्यम यांच्याकडे. लखनौमध्ये ८ वर्षे शिकल्यानंतर पुन्हा अरंगेत्रमसाठी मी बडोद्याला आलो. मग पुण्यात आल्यानंतर सुचेता ताईकडे एम.ए केलं. त्यावेळी शोधनिबंधाच्या वेळी मला जाणीव झाली कि आपल्याला नाट्यशास्त्रात आंगिक अभिनय काय आहे हे जाणून घ्यायचंय, म्हणून मी पद्माजींच्या ज्येष्ठ शिष्या डॉ. जयश्री राजगोपालन यांच्याकडे शिक्षण २००० सालापासून सुरु केलं. ह्या सर्व गुरूंकडून मला जी मूल्य मिळाली ती म्हणजे, रमाजींकडून शिस्त आणि प्रस्तुतीकरणासाठी शारीरिक स्तरावर आंगिक हे किती प्रबळ असू शकत ह्याची जाणीव झाली. सुचेता ताईकडे ‘विचार’ – आपण प्रत्येक गोष्ट ही समजून घेऊन करतोय का? तसेच साहित्य किती समजून घेऊन करतोय ह्याकडे सतत लक्ष देण्याचा कल मिळाला आणि सखोल अभ्यास करण्याची दृष्टी मिळाली. जयश्रीजींकडून मला ‘वैश्विक-दृष्टीकोन’ मिळाला. म्हणजे, कोणीतीही नृत्यशैली असो, ती आपोआप भरताच्या नाट्यशास्त्राच्या संज्ञात बसणारी दिसते म्हणून, कुठल्याही नृत्यशैलीकडे बघण्याचा कल पूर्णपणे बदलला. त्यामुळे संरचनांच्या चौकटी रुंदावल्या आणि सांगीतिक प्रगल्भता मिळाली. अशाप्रकारे सगळ्याच दृष्टिकोनांतून ह्या सर्व गुरूंकडून हातभार लाभला.

 तुमच्यावेळी असलेलं गुरु-शिष्याचं नातं आणि आत्ताच्या काळातील हे नातं यात काही फरक तुम्हाला जाणवतो का?
हो! फरक असणारच आहे. मला असं वाटत कि, आपण ज्या परिस्थितीत राहतोय आणि १५-२० वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीत राहत होतो त्याबाबतीत मानवी संबंधांच्या व्याख्या बदलल्यात. जसे कि, मैत्रीचे नाते असो वा आई-मुलाचे. मानवी-संबंधांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय. त्यातलंच एक गुरु-शिष्याचं नातं! ज्यालाही आजुबाजुच्या परिस्थितीने बदलून टाकलय. नृत्यकलेच्या संदर्भात किंवा भारतीय पारंपारिक प्रयोगजीवी कलांच्या संदर्भात गुरु हा ज्ञान देण्यासाठी आहे आणि शिष्य हा ज्ञान घेण्यासाठी आहे. ह्या दोघांच्या भूमिका आणि ध्येय बरोबर असतील तर नात्यामध्ये काहीच अडचणी येऊ शकत नाहीत आणि प्रत्येक कार्यक्षेत्राची एक कार्यपद्धती असते, नियम आहेत, तेही काळाच्या अनुषंगाने बदलले आहेत. आपल्याला त्या कार्यपद्धतीनेच वागावे लागते. हा बदलता काळ ह्यावर अवलंबून आहे, ज्याला आपल्याला सामोर जावं लागतं.

एक नर्तक-गुरु (पर्फोर्मर-गुरु) असणे, जे की तुम्ही आहात तर, काही पर्फोर्मर नसून फक्त नृत्य शिकवतात ह्या दोन्ही भूमिकांमध्ये काही फरक तुम्हाला वाटतो का?
एक नर्तक आणि गुरु असे दोन्ही असण्याचा फायदा म्हणजे- गुरु हा शिकवत असतो आणि नृत्यही करत असतो म्हणून विशेषतः विदयार्थ्यांना होतो. कारण, सादरीकरणाच्याही पद्धती(ट्रेंड्स) असतात. भरतनाट्यमची २० वर्षे आधीची पद्धती कशी होती आणि आत्ता कशी आहे, पुढे काय असणारे; हे माहित असणे महत्वपूर्ण ठरते. तुम्ही नृत्य-सादरीकरण करत असाल तर तुम्हाला ह्या प्रथा फार बारकाव्याने अभ्यासायला मिळतात आणि त्याची कारणमीमांसा तुम्हाला कळते. तुम्ही जर नर्तक-गुरु नसाल तर मग कलेचं विश्व हे कुठून कुठे वळतंय हे समजलं नसल्याने अडचणी येतात. कारण नर्तक हा प्रेक्षकांचाही विचार करत असतो, म्हणून हा विचार फक्त शिकवण्यापुरताच राहत नाही. आणखी एक नर्तक-गुरु असण्याचा फायदा म्हणेज- तुम्ही समजून घेऊ शकता कि नर्तकाला किंवा विद्यार्थ्याला काय साजेसं दिसेल? हे एक शिकवण्याच कौशल्यही असू शकत, जेणेकरून तुम्ही तुमच्या शिष्याची कौशल्ये आणि कमतरता ओळखू शकाल. त्यामुळे एक नर्तक आणि गुरु असे दोन्ही असण्याचा फायदा हा होतोच.

विद्यार्थ्यांसाठी नृत्तासाठीच्या प्रशिक्षणाबरोबरच अभिनयाचे प्रशिक्षण गुरूंनी देणे आवश्यक आहे का?
नक्कीच दिले गेले पाहिजे आणि त्यास परिपोषक अशी गोष्ट म्हणजे- ‘इंटरएक्शन’. अभिनयासाठी हे महत्वपूर्ण आहे. आपल्या परंपरेत ही पद्धत नव्हती पण गेल्या ३०-४० वर्षांमध्ये हे कळून आलय कि अभिनयासाठी गुरूंनी विशद करणे फार गरजेच आहे, परस्पर क्रिया होणं गरजेचं आहे. नृत्तच्या संदर्भात अनुकरण आहे पण अभिनयाच्याबाबतीत मात्र ही परस्पर क्रिया होणं, ह्या स्तरावर लक्ष द्यायला हवे.

भरतनाट्यम नृत्यशैलीशी निगडीत घराणी अथवा ‘बाणी’ हे आत्ता कितपत लागू ठरतं?
मला असं वाटतं कि इतिहास बघितला तर, भरतनाट्यम हे तंजावरचे असल्यामुळे तेथील नटूवनारांनी स्वतःच्या कौशल्याप्रमाणे भरतनाट्यम नृत्यशैलीला स्वतःच्या आंगिकानुसार काही संरचनात्मक निवडी अथवा प्राधान्य दिलीत.. ह्या सांगीतिक किंवा आंगिक स्तरावरच्या असू शकतात. मग प्रामुख्याने पुढे जाऊन ‘बाणी’ म्हणजे आंगिकतेशी निगडीत दिले गेलेले महत्व. काहींनी ते शिस्तबद्धपणे अनुसरलं. २००० च्या आसपास मग हे अचानक मोडलं, त्यांमध्ये समाविष्ट अशी नर्तिका म्हणजे- प्रियदर्शनी गोविंद. त्यामुळे हा मुद्दा महत्वपूर्ण ठरतो कि एक नर्तक म्हणून तुम्हाला काय करायचं? कारण शेवटी सौदर्यशास्त्र देखील महत्वाचेच! माझ्यासाठी तरी तुम्ही कसे नृत्य करता हे महत्वाचे आहे, नर्तकाला जे मांडायचे आहे ते महत्वाचे, तुम्ही कशाप्रकारे प्रकट होता, संवाद साधता हे बघणे आवश्यक आहे मग तो नर्तक कोणतीही बाणी अनुसरत असो. तंत्र हे महत्वाचे असले तरी शेवटी ते त्या नर्तकाचे काम व प्रतिभा यांवर अवलंबून आहे.

परंपरेनुसार आपण जे नायिकांचे सादरीकरण करत आलो आहोत, ते तुम्हाला कितपत पटते का आणि काळानुसार त्यात बदल व्हावा असे तुम्हाला वाटते का?
मला वाटतं, एकल नृत्यशैली म्हणून बघितलं आणि देवदासी परंपरेतून आलेलं बघितलं तर मग आशयाच्या संदर्भात बऱ्यापैकी विस्तारित काम झालेलं आहे. फक्त, मार्गममध्ये शब्दम, पदम् वर्णम, जावळीमध्ये नायिका आहे तर ती त्या परिस्थितीला अनुसरून म्हणजे जेव्हा राजदासी होत्या, त्या परिस्थितीला अनुसरून बघितल्यास मला ते बरोबर वाटतं. पण आजच्या समकालीन परिस्थितीत आणि जर आपण इतके विविध प्रकारचे काव्य घेऊ शकतो, तर मग नायिकांच्या पलीकडे अनेक असे विषय आहेत, जे आपण मार्गममध्ये घेऊ शकतो आणि त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. त्यासाठी आशयामध्ये बदल व्हायला हवा. कारण, भरतनाट्यम अशा तत्त्वज्ञानातून आलय जिथे पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रीचे दुय्यम स्थान आहे. मग हे विशिष्ट तत्त्वज्ञान आपण जर न करण्याच्या स्थानी आहोत, असे जर आहे तर मग आशय काय पाहिजे? हा प्रश्न आहे. त्यासाठी काय साहित्य पाहिजे? त्यामुळेच, इथे ‘सृजन’ ही महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते; साहित्यांच्याबाबतीत. त्यामुळे नृत्यासाठी लिहिले गेले पाहिजे.


  -गुरु श्री. परिमल फडके.
[मुलाखतकार: स्वरदा.]  



Comments

Post a Comment

Popular Posts