नृत्य आणि भक्ती

लेखिका: सौ. शिवाली प्रधान - एम. ए. (नृत्य - भरतनाट्यम)


आंगिकं भुवनं  यस्य वाचिकं सर्व वाङ्मयम  l
आहार्यं चंद्रतारादि तं नुम: सात्त्विकं शिवम ।।

ज्याचे सर्वांग म्हणजे हे ब्रह्मांड , ज्याचे बोलणे -भाषा म्हणजे साहित्य आहे , या विश्वातील चंद्र- तारे हेच ज्याचे दागिने आहेत, अशा सात्त्विक शिवाला माझा नमस्कार असो.

आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक हे नृत्य-नाट्याचे, अभिनयाचे चार प्रमुख प्रकार या ठिकाणी दिसून येतात. हे सर्व आपल्याला शिव-शंकराच्या ठिकाणी दिसून येतात. शिव-नटराज,हा अनादी-अनंत काळापासून नृत्याचे आराध्य दैवत मानला गेला आहे. पुराण कल्पनेप्रमाणे शिव हा तमोगुण प्रधान मानला गेला आहे. सत्व म्हणजे सत्ता. तिने निदर्शित होणारा तो सात्त्विक होय. शिव हा जगाचा कर्ता करविता. चराचरात त्याचे स्थान आहे. तो परम ईश आहे आणि परमेश्वर सत-स्वरूप आहे.

अगदी पूर्वीपासूनच मंदिरात देवपूजेचा एक भाग म्हणून नृत्य सादर होई.

भारतातील प्रमुख नृत्यशैली म्हणजे कथक, भरतनाट्यम, कथकली आणि मणिपुरी. मोहीनीआट्टम, ओडिसी आणि कुचिपुडी या भारतनाट्यमच्या शैली-भगिनी आहेत . नुकतंच, सन २००० मध्ये 'संगीत अकादमी'तर्फे आसाम मधील "सत्रिय" या नृत्य शैलीला 'अभिजात शास्त्रीय नृत्य शैली’ चा दर्जा देण्यात आला. अशाप्रकारे, भारतात एकूण आठ शास्त्रीय नृत्य शैली नांदत आहेत.

कथक ही किर्तनकाराची शैली तर मणिपुरी कृष्ण-रासक्रिडेची. ओडिसी, भरतनाट्यम, कुचिपुडी आणि मोहीनीअट्टम या देवदासींचे नृत्य सादर करणाऱ्या म्हणजेच मधुरा-भक्तीने भरलेल्या तर कथकलीतून रामायण,महाभारतातील अद्भुत कथा सादर करण्याची पद्धत आहे. सत्रिय नृत्यशैलीतून कृष्णाच्या कथा सादर करण्याची पद्धत आहे.

या सर्व नृत्यप्रकारातून राधाकृष्ण किंवा नायक -नायिकावर शृंगाररसप्रधान रचना नाचल्या जात असल्या तरी हा शृंगार आसक्तियुक्त किंवा शारीरिक पातळीवरील शृंगार नव्हे. तर देवाविषयी भक्ताला स्त्रीभावाने वाटणारी रती , हा भक्तीचा एक आदर्श , श्रेष्ठ प्रकार, मधुरा भक्ती म्हणून ओळखला जातो.

शृंगार हा रसांचा राजा ! शास्त्रकारांच्या सांगण्याप्रमाणे, हास्य,करुण, अद्भुत इत्यादी रसांचा जन्म हा शृंगारातूनच झाला. शृंगार म्हणजे केवळ नायक -नायिका मधील प्रेम नसून आई -मुलांमधील प्रेम (वात्सल्य ), मित्रांमधील प्रेम (बंधुभाव ) शिष्याला गुरुविषयी वाटणारे प्रेम (आदर) या सर्व शृंगाराच्याच छटा आहेत.

शरीर हे नृत्याचं माध्यम ! नृत्यात नर्तकी गाणं गात नाही किंवा बोलतही नाही.तर आपल्या देहबोलीतून, मुद्राभिनयातून ती गाण्याचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविते तर संगीत ,ताल-लय यांच्या साथीने रंगमंचावर पदन्यासाने आणि हातांच्या मोहक हालचालीतून अवकाशात नक्षी चितारते. नृत्यातील गीतांचा अर्थ सांगताना त्या कथेतील वेगवेगळी पात्रं नर्तकीस प्रभावीपणे साकारावी लागतात. हे करताना तिला स्वतःचे मन एकाग्र करावे लागते. अर्थात, मन एकाग्र होताना साधनेची, श्रद्धेची जोड असावी लागते. अशी कला श्रेष्ठ ठरते आणि अशा कलेतूनच सहज सौंदर्यनिर्मिती होते. सौंदर्य जेवढे बाह्य तितकंच आंतरिक असते. बघण्यास ते सुखावह होते. सौंदर्य म्हणजेच परमेश्वर ! अशा रितीने, नृत्यकलेतून आपण त्या सौंदर्याची,परमेश्वराचीच आराधना करीत असतो.

आपल्या महाकाव्यांना लोकजीवनात पोहोचविण्याचं माध्यम म्हणजे कला. नृत्यकला मंदिरात जन्मांक येण्याचं कारण हेच ! मंदिरं ही धर्मचक्र प्रवर्तनाची केंद्र आहेत.

लयबद्ध गती म्हणजे शक्तीनिर्मिती होय. नृत्याचा पूर्ण भाव हा लयबद्ध असतो. त्यातून शक्तिनिर्मिती म्हणजे अंतिम टप्प्यात चैतन्य निर्मिती असते. शरीराच्या माध्यमातून प्रकृती प्रगटते ती विस्कळीत रूपात. पण तीच प्रकृती नृत्यातून प्रगटते त्यावेळी चैतन्य रूप प्राप्त होते. त्यामुळे संपूर्ण व्यक्तिमत्तवाचे आंतरिक परिवर्तन घडते. लयबद्धतेमुळे विकार रसांत रूपांतर पावतात. साहजिकच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही पातळीत सुसंवाद निर्माण होतो व त्यातून 'एकात्म' व्यक्तिमत्व घडविलं जातं. हे प्रकृती -पुरुष तादात्म्य ! इथे देवत्व आहे. म्हणूनच नृत्य हा योग आहे!

जोराचे वाहणारे वारे,पाऊस, भूकंप हे या शिवाचे उग्र रूप तांडव आहे. बर्फाच्छादित शिखरे, वाहणारे झरे,लता -वेली हे पार्वतीचे लास्य रूप आहे. पार्वती (प्रकृती ) या शिवाला (पुरुष) साकार करते. या प्रकृती -पुरुषांची प्रत्यय व अनुभूती रसिकांना करुन देणे म्हणजेच नृत्य होय.

नृत्याचा अभ्यास जितका कराल तितके आपण आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाशी,चिंन्हांशी,परंपरेशी निगडीत प्रश्नांशी उत्तरे आहेत. ती आपणास ज्ञात नाहीत किंवा आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत.पण नृत्याच्या अभ्यासाने त्यामागचा विचार, संकल्पना सापडण्यास मदत होते.

भरतमुनींच्या सांगण्यानुसार नृत्य-नाट्याचे ध्येय म्हणजे रसनिष्पत्ती! रस हा 'ब्रह्मानंद सहोदर' असतो असे म्हटले आहे. हा भावनेचा परिपोष असतो तर नृत्य हा भावनिक विकास घडविते.

कलातत्व ज्ञानात ईश साक्षात्कार रसात्मक असतो (रुसो वै स:) आणि नृत्यकला ही या साक्षात्काराच्या रसात्मक अनुभूतीसाठी सौंदर्ययोगाची साधना करते.

नृत्य कलेतून इतर कलांचेही रसास्वाद करता येते. संगीत, साहित्य,नाट्य, चित्र, शिल्प या सर्वच कला नृत्यात दिसतात. नृत्य हे दृश्य संगीत आहे. नर्तिका गाण्याचा अर्थ (साहित्य) आपल्या देहबोलीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविते (नाट्य) तर आपले हात व पदन्यासाने अवकाशात आणि रंगमंचावर सुंदर रेष (चित्र) उमटविते. तर गतिमान हालचाली करताना अचानकपणे स्थिरावते (शिल्प).

अशी ही नृत्यकला 'तापकर्तन' आहे . म्हणजे संताप, दुःख नाहीसे करणारी आहे, असे शास्त्रकार सांगतात. नृत्याच्यामागे खूप मोठे अध्यात्मचिन्तन आहे , हे एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल. मग परमेश्वराची भक्ती करण्याचे नृत्यासारखे दुसरे उत्तम साधन ते कोणत ?

_________________________________________________________________________

संदर्भ : -

१) संगीत रत्नाकर - अध्याय ७ वा (नर्तन अध्याय), डॉ. ग. ह. तारळेकर

२) भारतीय कला : उद्गम आणि विकास, डॉ. वि. य. कुलकर्णी


































Comments

Popular Posts