'Vyaktitva': Expressing The Personality {2} Dr. Swati Daithankar



Written by: Nupur Daithankar-Bag
लेखिका : नुपूर दैठणकर - बाग


ज्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे ती म्हणजेझी आई. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते, कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरु मिळाला. अगदी जन्मल्यापासूनच आयुष्याच्या प्रत्येक
टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचं ठरलं, ती माझी आई डॉ. स्वाती दैठणकर.

मी लहानाची मोठी तिचा रियाझ बघत झाले आणि अगदी नकळत गोष्टी आत्मसात होत गेल्या. नृत्याची गोडी कधी आणि कशी निर्माण झाली, हे कळलेच नाही. पण तेव्हाच कुठेतरी आईला आदर्श बनवून टाकलं व तिच्यासारखं   बनायचं असं मनाशी ठरवून टाकलं. स्कॉलरशिपच्या सादरीकरणाच्या वेळी न शिकलेली वर्णमची 'अरुधी' परीक्षकांपुढे करून दाखवली त्यावेळी मलाही माहित नव्हते की आईचा रियाझ सतत बघून व शोल्लू कानावर पडून मी ते आत्मसात केलेत. शालेय जीवनामध्ये  कायम स्पर्धा आणि स्नेहसंमेलनामध्ये आईच्या प्रोत्साहनामुळे भाग घेतला, स्वतःला  वेगवेगळ्या क्षेत्रात आजमावून पाहण्याची ही सुरुवात होती व स्वतःमधील गुप्त गुण जाणून घेण्याची संधीसुद्धा. आईच्या ह्याच प्रोत्साहनामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढण्यास सुरुवात झाली.

आई मुळात मुंबईची, नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची गोल्ड मेडलिस्ट, तर इंग्रजी साहित्यातसुद्धा पदवी  धारण केलेली. विविध भाषांवरील तिचे प्रभुत्व सिद्ध होतेच जेव्हा ती तिच्या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः करते तसेच तिच्या कविता, एखाद्या प्रसंगाला धरून लिहीलेला लेख,  हे सर्व तिचं व्यक्त  होण्याचं माध्यम आहे असं मी म्हणेन. शालेय व कॉलेज जीवनामध्ये रेडीओ आणि टीव्हीवर असंख्य कार्यक्रम सादर केले, तर नाटकाचे प्रयोगसुद्धा केले. परंतु, लग्न झाल्यावर पुण्यात येऊन आपल्या गुणांना नृत्यामध्ये समाविष्ट करून घेऊन नृत्यावर आपले लक्ष केंद्रित करायचे ठरवले. 'पंचकन्या' हा त्यावर आधारलेलाच एक प्रयोग, ज्यामध्ये ती स्वतःच्या कविता, सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्न व नृत्य एकत्र गुंफून रंगमंचावर एकल सादरीकरण करते. नृत्याविषयी असलेलं तिचं प्रेम, तळमळ व समर्पण भाव पाहून थक्क व्हायला होतं.

आईने कधीच आमच्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत, विचारस्वातंत्र्य - निर्णयस्वातंत्र्य दिलं. कधी कोणता उपदेश न करता स्वतःच्या वागणुकीतूनच आमच्यासमोर आदर्श घालून दिला. घर, करिअर आणि मुलांचा संगोपन हे उत्तमरीत्या सांभाळून आमच्यासमोर स्वतःचं उदाहरण ठेवलं. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण आईचं गुरु असल्याने तिचा २४ तास सहवास लाभला, फक्त नृत्य शिक्षणापुरता सहवास न राहता, तिची दिनचर्या, विविध देशा-परदेशातील कार्यक्रम-प्रवास ह्याची जवळून ओळख झाली. एक माणूस, एक नृत्यकलाकार कसा असावा ह्याची ओळख झाली.

आई आमच्याविषयी कायमच थोडी हळवी आहे. घरात सगळेच कलाकार पण जेव्हा दुसऱ्याच्या कार्यक्रमाला साथ द्यायची वेळ येते , तेव्हा ती नेहमीच त्याक्षणी फक्त आई बनून आम्हाला प्रोत्साहन द्यायला आमच्याबरोबर असते. पण हीच आई खंबीर जाणवली जेव्हा तिने मला मुंबईला तिच्या गुरुंकडे शिकायला पाठवायचा निर्णय घेतला, आपल्या मुलीला बाहेच्या जगाची माहिती व्हावी व खूप सहज आणि सोप्प्या पद्धतीने काही गोष्टी मिळाल्या तर किंमत राहत नाही असा विचार करून मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला.तेव्हा तिच्यातील गुरूची तळमळ मला प्रकर्षाने जाणवली.

तिचा माझ्यावर असलेला प्रचंड विश्वास कधीकधी जबाबदारीची जाणीव करून देतो व नवनवीन गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. आपण सगळ्यात जास्त गृहीत धरतो ते आपल्या आईला. जी व्यक्ती आपली सगळ्यात हक्काची असते. कधी कधी काही न बोलतासुद्धा तिला माझ्या मनातील गोष्टी कळतात. छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा तिला होणारा आनंद - मग कधी रंगमंचावर आम्ही एकत्र सादर केलेलं नृत्य असो वा देशप्रेम तिने तिच्या कविता अथवा नृत्यातून व्यक्त केलं असेल. ह्यामधून तिला मिळणारा आनंद व समाधान हे अवर्णनीयच!

माझ्याबाबतीत आईचं पारडं कायमच जड राहिलं. मी आज जे काही आहे ते केवळ आईच्या आजवरच्या   शिकवणुकीमुळे. असं कधी विचार करून तिच्याविषयीच्या भावना व्यक्त नाही केल्या किंवा बोलूनही काही दाखवलं जात, पण आज मी तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी ही संधी घेतेय की तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आई कायम तिच्या आई-वडिलांना गुरुचं स्थान देते. तिच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, असं कायम सांगते. आता हीच संधी मला आहे, मला माझ्या आई-वडिलांनी दिलेली शिकवण आत्मसात करून पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची.....


Edited by: Swarada Dhekane.

Comments

  1. My God..The Best ever surprise gift from dear Swarada and Nupur..For the first time am short of words..I think it's a double responsibility when your daughter is your student too n observes you for all 24 hours..Then at this stage her every word becomes an award for you..what to ask more?God bless you both..

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts