'नृत्य-पद्म': आंतरराष्ट्रीय भारतीय शास्त्रीय नृत्य महोत्सव, २०१७ पुणे, महाराष्ट्र.
भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींची हजारो वर्षांची परंपरा आजही टिकून असण्याचे श्रेय त्याच्या बीजात जेवढे आहे तेवढेच त्या शैली साकारणाऱ्या नर्तकांनाही आहे. आज नृत्यासारख्या कलेला चांगले दिवस प्राप्त झाले आहेत, असे आपण म्हणतो. कारण, वेळोवेळी त्यात योग्य कार्याची भर घालून तिचे जतन करणे, हे आपल्या पूर्वजांनी श्रमपूर्वक साध्य केलेले आहे. नृत्य ही एक सादरीकरणाची कला असल्यामुळे आज हजारो नर्तक रंगमंचावर आपली कला सादर करण्यासाठी अनेक प्रकारे धडपड करत असतात. त्यामुळे, युवा पिढीतील नर्तकांनी आपल्यासारख्याच युवा नर्तकांना सादरीकरणासाठी रंगमंच आयोजित करून देणे हे एक आदर्श उदाहरणच ठरेल!
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात साजऱ्या होणाऱ्या महोत्सवांमध्ये तरुण नर्तकांनी घातलेली एक मोलाची भर म्हणजे- 'नृत्य-पद्म' हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय शात्रीय नृत्य महोत्सव. अभिज्ञा अत्रे-आपटे आणि तेजदिप्ती पावडे ह्या दोन युवा भरतनाट्यम् नर्तकांनी शास्त्रीय नृत्याच्या प्रचारासाठी तसेच नवीन कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून प्रोत्साहन देण्यासाठी 'नृत्य-पद्म' महोत्सव आयोजित केला आहे.
दि. ४ फेब्रुवारी, २०१७ रोजी सायं. ५ वाजता बालगंधर्व कलामंदिरात हा महोत्सव संपन्न होणार असून त्यामध्ये देश-विदेशातील ११ तरुण नवोदित नृत्य कलाकारांचे कलाविष्कार सादर होणार आहेत. यावेळी पुण्यातील ज्येष्ठ नृत्य-गुरु डॉ. सुचेता भिडे चापेकर, श्रीमती. शमा भाटे श्री. परिमल फडके तसेच अनेक उत्तम कलाकार, ज्येष्ठ मंडळींची उपस्थिती ह्या महोत्सवाला लाभणार आहे. केवळ भरतनाट्यम्, कथ्थकच नव्हे तर मोहिनीअट्टम,कुचिपुडी, सत्रिय, ओडिसी हे नृत्य प्रकारही एकल तसेच सांघिक स्वरुपात सादर होणार आहेत. देश-विदेशातील विविध शहरांतून, राज्यांतून येणाऱ्या नवीन कलाकारांशी ओळख व त्यांच्या सादरीकरणाची प्रचिती ह्या महोत्सवात रसिकांना नक्कीच येईल.
'नृत्य-पद्म' महोत्सवाच्या प्रथम वर्षातील सादरकर्त्यांची थोडक्यात ओळख:
* मिथिला भिडे डान्स स्कूल, पुणे - कथक
* अनन्या महंता, गुवाहाटी-आसाम - सत्रिय
* वैदेही कुलकर्णी, नाशिक - कुचिपुडी
* स्मिता पाणीग्रही, भुवनेश्वर-ओरिसा- ओडिसी
* एम. ए. अश्विका, चेन्नई-तामिळनाडू - भरतनाट्यम्
* नवनिता विनोद, दोह,कतार - मोहिनीअट्टम
* शरण्या भट, मुंबई-महाराष्ट्र - भरतनाट्यम्
* त्रिप्ती गुप्ता, सागर-मध्य प्रदेश - कथक
* किर्ती काडेकर, पुणे-महाराष्ट्र - कथक
* मोनिषा सतीश कुमार, सिंगापूर - कथक
* 'पवि'ज डान्स इंसेम्बल (पविअन्स), मुंबई- महाराष्ट्र - भरतनाट्यम्
'नृत्य-पद्म' च्या आयोजकांविषयी थोडक्यात....
अभिज्ञा अत्रे-आपटे
अभिज्ञा अत्रे-आपटे यांनी ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए भरतनाट्यम् पूर्ण केले असून त्या गुरु सौ. रचना कापसे आणि श्री. परिमल फडके यांच्या शिष्या आहेत.
पुण्यात, भारतात तसेच परदेशात त्यांनी अनेक नृत्याचे कार्यक्रम केलेले असून त्यांना २०१५ मध्ये 'पं. विष्णू दिगंबर पलुस्कर' हा राष्ट्रीय पारितोषिक व 'नृत्य मणी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
तेजदिप्ती पावडे
तेजदिप्ती ह्या गुरु श्री. परिमल फडके यांची शिष्या असून ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी बी. ए आणि एम. ए भरतनाट्यम् पूर्ण केले असून त्या 'डीसीआयडीआर' (डेस्टीनी सेंटर फॉर इन्फोर्मेशन, डॉक्युमेंटेशन एंड रिसर्च) ह्या संस्थेअंतर्गत नृत्यविषयक उपक्रम राबवतात. 'नृत्य सुमनांजली', 'यामिनी कृष्णमूर्ती' असे राष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
|
Thank you so much for this swarada.
ReplyDelete