" जगाबरोबर रहा, पण आपल्या परंपरेला बरोबर घेऊन!"



नृत्याविषयी आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली ? नृत्य हे करिअर म्हणून निवडताना तुम्हाला घरच्यांकडून कसा आधार मिळाला ?
लहानपणी मी डान्स टी. व्हीमध्ये बघून करायचो. इतक्या लहान वयात आपण आपल्या आई- बाबांना सांगू शकत नाही कि मला डान्स क्लासला जायचय. पण कदाचित माझ्याकडे बघून माझ्या आई- बाबांना वाटलं कि बहुतेक ह्याला डान्स आवडतो. शास्त्रीय काय असतं आणि पाश्चिमात्य काय असतं हे त्यावेळी मला माहित नव्हतं. डोंबिवलीला मला एका भरतनाट्यमच्या क्लासला घातलं. मग हळूहळू नृत्याविषयी मला आवड निर्माण झाली आणि बाकी नृत्यशैलींपेक्षा मला भरतनाट्यम जास्त आवडतं हे लक्षात आलं. माझ्या पहिल्या गुरु कुमारी वसंता, त्यांची ज्येष्ठ शिष्या श्रीमती कला यांच्याकडे मी शिकायला सुरुवात केली आणि जेव्हा वसंताजींनी माझा डान्स पाहिला तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडे घेतलं, त्यांच्याकडे शिकायला लागल्यापासून मला नृत्य आवडायला लागले. आपण नेहमी स्टेजवर असावे असे नेहमी वाटायचे. आईची साडी धोतीसारखी गुंडाळून मी डान्स करायचो. माझे वडील नेहमी कुठेही सार्वजनिक असोत, तिथे मला संधी मिळवून दयायचे. मी तिसरीत असताना पहिल्यांदा रंगमंचावर नृत्याचे सादरीकरण केले.

 तुम्ही तीन मान्यवर गुरूंकडे नृत्याचे शिक्षण घेतल्यानंतर आत्ता एक स्वतंत्र नर्तक म्हणून तुम्ही तुमची शैली कशी निर्माण केली?
माझे तीन गुरु- 'कुमारी वसंता' ज्यांच्याकडे मी १२ वर्षे भरतनाट्यम शिकलो आणि अरंगेत्रम केले. त्यानंतर मी गुरु 'श्री. दिपक मजुमदार' सरांकडे १० वर्षे शिकलो. त्याच काळात माझा संपर्क गुरु 'श्रीमती. अनिता गुहा'  यांच्याशी आला. मी त्यांच्याकडे रचना नाही शिकलो पण नृत्य चांगले होण्यासाठी लागणारे 'पेर्फेक्शन' मला त्यांच्याकडून लाभलं. म्हणजेच- स्थानक, अभिनयातील स्पष्टता तसेच पूर्णता हे सगळं प्रशिक्षण त्यांनी दिले. माझ्या क्लासमध्ये मुलींना शिकवत असताना प्रत्येक वेळी माझं 'पेर्फेक्शन' प्रगत होत गेलं, त्यामुळे अपोआप माझी शैली निर्माण होत गेली आणि आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या आलेल्या प्रतिसादावरून असं जाणवतंय कि- एक चांगला नर्तक म्हणून मी एका स्तरावर पोहोचलोय. माझी शैली मी निर्माण केलीये असं मी म्हणणार नाही पण, आज माझे तीनही गुरु म्हणतात- " आमची शैली तू करत नाहीस. पण तीनही शैलींमधून चांगलं घेऊन तू स्वतःचं जे करत आहेस, ते तुझ्यावरती चांगलं दिसतंय.मला असं म्हणायचं कि- " स्वतःला बंधनात घालू नका, कि मला हीच शैली करायचीये. शेवटी प्रेक्षकांना काय आवडतं, ते तुम्हाला कशा पद्धतीने स्वीकारातायेत हे महत्वाचे आहे. फक्त भरतनाट्यमची परंपरा, आंगिक आणि अभिनय यांचे पालन करा, तुम्हाला अपोआप तुमची शैली लाभेल." 

कलाकारासाठी रियाज आणि आहार ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. तुम्ही ह्या दोन्हींचे महत्व कसे सांगाल? 
रियाज खुप महत्वाचा आहे. मुख्य म्हणजे तो योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. सामान्यतः नर्तकांच काय होता की- रियाज करतात पण रीयाजामुळे तुमचं वजन कमी होणार नाही. तुमचं शरीर तंदुरुस्त राहणार नाही. त्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. ते आपल्या इंडिअन डान्समध्ये शिकवलं जात नाही. म्हणून वजन कमी होण्यासाठी व्यायाम करावा, रियाज नाही. तसे रियाज करण्याआधी व्यायाम करणे आवश्यक आहे. आहाराविषयी सांगायचं तर- काही ठराविक काळापर्यंत सर्व काही खा. पण काही काळानंतर जास्त सात्विक आहार खा आणि 'जंक फूड' शक्यतो टाळावे.

"पवित्र आर्ट-विझुअल इंस्टीटयूट" मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना नृत्याच्या शिक्षणाबरोबरच आणखी कोणत्या सुविधा पुरवता ज्याचा त्यांना उपयोग होतो?
नृत्यात पर्फेक्शन यावं यासाठी आम्ही त्यांना त्यांचे आणि त्याचबरोबर आमच्याच क्लासमधल्या चांगल्या नर्तकांचे व्हिडीओझ दाखवतो. काही क्लासमध्ये मी त्यांना गणित शिकवतो. प्रत्येक सुट्टीत 'डान्स प्रोजेक्ट्स' देतो, जसे की- एखाद्या मंदिराचा अभ्यास करून त्यातील शिल्पे बघून जशी जमतील तशी करून दाखवा. तसेच 'हस्तांचे प्रोजेक्ट्स' देतो-की ह्या हस्तात तुम्हाला काय दिसतं? इत्यादी. क्लासमध्ये आम्ही ५० भरतनाट्यमचे ड्रेस बनवून ठेवले आहेत, त्यात मी स्वतः माझे पैसे गुंतवतो. गरजू मुलींसाठी ते मोफत असतात. आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या मुलींना मी माझ्या क्लासमध्ये शिकवण्याची संधी देतो आणि त्यांना त्याचा मोबदलाही देतो. तसेच विद्यार्थी आपल्या क्लासव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्लासमध्ये सरावासाठी येऊ शकतात. माझ्या तीनही गुरूंमध्ये अशीच देण्याची वृत्ती आहे, हे मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं.

नृत्याच्या क्षेत्रात कुठे काम व्हायला हवे, असे तुम्हाला वाटते?
देशभरात जे नृत्याचे प्रकल्प होतात त्याचं समप्रमाणात वितरण व्हायला हवे. उदाहरणार्थ- चेन्नई. चेन्नईमध्ये दिवसाला असंख्य कार्यक्रम होतात त्यामुळे तिथे आता प्रेक्षक कमी पडलेत. तर हे विभागलं गेलं पाहिजे. तसेच युवा पिढीचा प्रेक्षकवर्ग तयार व्हायला हवा. त्यासाठी मी स्वतः काम सुरु केलय. मी स्वतः शाळांमध्ये जातो आणि त्यांच्यामध्ये नृत्याविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यात १०० मुलांपैकी २ मुलांना जरी हे आवडलं तरी फायदाच आहे. आणि "माउथ पब्लिसिटी" पण होतेच ना! तसेच आपल्या सरकारनेही मदत केली पाहिजे, शाळा- कॉलेजेसमध्ये युवा पिढीतील नर्तकांना बोलावले पाहिजे आणि एक विषय म्हणून जर त्यांना दिला तर आपण नृत्यासाठी एक युवकवर्ग तयार करू शकू. माझ्या मते, ह्यावर काम होणे, मेहनत घेणे आवश्यक आहे.

 माझ्यासारख्या युवा पिढीतील नर्तकांना तुम्ही काय संदेश दयाल?
"नेहमी स्वतः सतत सुधारण्याचा प्रयत्न करत रहा. जगाबरोबर रहा, पण आपल्या परंपरेला बरोबर घेऊन! आपण स्वतःला किती चांगल्या प्रकारे सादर करू शकतो याचा विचार करा. कोणाचेही अनुकरण करू नका. नाहीतर असं होईल की- मी प्रियदर्शनी गोविंदचा डान्स बघत राहतोय आणि त्या छान आहेत, छान आहेत ह्यातून मग मी म्हणजे २री प्रियदर्शनी गोविंद तयार होईन. इथे १०० चांगले नर्तक आहेत, पण त्यांच्यासारख एक होऊ नका. त्यांच्याकडून चांगलं घेतलं पाहिजे पण त्यांची 'झेरॉक्स कॉपी' नाही व्हायच. . माझ्यावर काय छान दिसतं हे महत्वचं! नवीन विषयांवर काम करा. जर तुम्हाला यशस्वी कलाकार व्हायचं असेल- अभ्यास आणि रियाज करत रहा, कार्यक्रम बघा आणि शिकत रहा. हे खूप चांगलं क्षेत्र आहे. फक्त तुम्ही वेळ दयायला हवा, सहनशीलता बाळगायला हवी, तुम्ही कुठेतरी नक्की पोहोचाल!"

- श्री. पवित्र भट 
(मुलाखतकार: स्वरदा)

--{पवित्र सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप शुभेच्छा}--
( This interview has been published in magazine 'LOUD APPLAUSE- Nov.Dec 2014' which is an initiative by Kathak Pathshala of Neha Muthiyan)




Comments

Popular Posts