अभंग नृत्य स्पर्धा : महाराष्ट्राच्या संत साहित्याला नृत्यकलेद्वारे पोहोचवणारा एक आवश्यक उपक्रम


श्री संत सेवा संघ प्रणित 'समर्पित क्रिएशन्स' च्या संचालिका आणि भरतनाट्यम् नृत्यांगना नेहा भाटे आणि निलिमा प्रोडक्शनच्या संचालिका व कथक नृत्यांगना सौ. निलिमा हिरवे यांनी पुण्यामध्ये आयोजित केलेली 'अभंग नृत्य स्पर्धा' हा खरोखरंच एक आगळावेगळा उपक्रम आहे.

पुण्यामध्ये शास्त्रीय नृत्य, विशेषतः कथक आणि भरतनाट्यम् या नृत्यशैलींचे शिक्षण आज खूप मोठ्या प्रमाणावर मुले-मुली दोघेही घेत असून या कलांविषयीचा आदर, सन्मान आणि त्याची लोकप्रियता नक्कीच वाढत चालली आहे. उत्तर भारतातील कथक आणि दक्षिण भारतातील भरतनाट्यम् नृत्यशैली, त्या नृत्यशैलींचे सादरीकरण मराठी नर्तक त्याला अपरिचित अशी भाषा समजून घेऊन सादर करतो. त्या नृत्यासाठी लिहिल्या गेलेल्या पारंपरिक रचना आपण बघत आलो आहोत. परंतु, आपल्या महाराष्ट्रातील संतांनी लिहिलेले साहित्य हे आपल्या शास्त्रीय नृत्यातून सादर झालेले क्वचितच पाहायला मिळते. मराठी अभंग हे नृत्याद्वारे सादर होणाऱ्या भक्ती भावनेला पूरकच आहे. त्यामुळे अभंग नृत्य स्पर्धा ही नृत्याच्या माध्यमातून आपले संत साहित्य जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठीचा एक उत्तम आणि आव्हानात्मक उपक्रम आहे.

कोणतीही कला ही परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम असून नृत्य कलेमधून संतांचे शब्द, संतविचार हे समाजातील विविध स्तरांपर्यंत आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.

संगीतकार श्री. जीवन धर्माधिकारी यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगांवर ही स्पर्धा घेतली गेली. हे अभंग पं. रघुनंदन पणशीकर, पं.आनंद भाटे, पं. भुवनेश कोमकली आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात संगीतबद्ध गेले गेले होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई, सासवड, चिपळूण, रत्नागिरी सारख्या विविध ठिकाणाहून एकूण ३६ गट, अर्थात २२५ नृत्यांगनांनी सहभाग घेतला होता.

हे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री संत सेवा संघाचे संस्थापक श्री. संजय गुरुजी, ज्येष्ठ नृत्यांगना गुरु शमा भाटे, गुरु मनीषा साठे, ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना गुरु सुचेता चापेकर, गुरु स्वाती दैठणकर तसेच ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. राजीव जगताप यांच्या शुभहस्ते झाले.



ह्या स्पर्धेला लाभलेल्या मान्यवरांपैकी काहींनी व्यक्त केलेले विचार -

श्री संत सेवा संघाचे संस्थापक श्री. संजय गुरुजी - "उत्तम कलाकार होण्याबरोबरच मनुष्य म्हणून देखील उत्तम होण्यासाठी अध्यात्म विचार, संतविचार नितांत गरजेचे आहेत. माणसाच्या ठिकाणी असलेले भय, काम, क्रोध, द्वेष जाऊन अन्तः करणात पावित्र्य निर्माण करण्याची ताकद केवळ संत विचारात आहे. या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन हा एक गरजेचा आणि अभिनव उपक्रम ठरणार आहे. कलेचे उद्दिष्ट काय आहे हे समजून ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी या कलेची उपासना करावी. या कलेची उपासना करताना माझ्या ठिकाणचे दोष गेले का, माझ्या ठिकाणी शांतता निर्माण झाली का, संयम निर्माण झाला का आणि आपले अंतरंग बदलते आहे का, हे नक्की तपासावे."

ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे "अनेक नृत्य स्पर्धांविषयी ऐकले होते, पण अभंग नृत्य स्पर्धा पहिल्यांदाच पाहते आहे. कोणतीही कला अध्यात्म्याशी जोडलेली असते आणि अभंग हा अध्यात्माचा विषय आहे. महाराष्ट्राला स्वतःची नृत्यशैली नाही पण सगळ्या नृत्यशैली महाराष्ट्रानी आत्मसात केल्या.त्यामुळे येथील अभंग नृत्यात 'का' यावे या स्पर्धेचा उद्देश आहे, या दृष्टीने हा उपक्रम उल्लेखनीय आहे. श्री. जीवन धर्माधिकारी यांनी संगीत दिलेल्या अभंगांना ज्येष्ठ गायकांचे आवाज लाभले आहेत. यावरूनच या रचनांचा आणि स्पर्धेचा उत्तम दर्जा लक्षात येतो. सगळ्या स्पर्धकांना अशा ज्येष्ठ गायकांनी गायलेल्या रचनांवर नृत्य करायला मिळत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे."

ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर - "मला लहानपणापासून संत साहित्याची खूप आवड आहे. दिवसभरातून एक तरी अभंग वाचण्याचा प्रयत्न मी कायम करतो. त्या अभंगाचा मला काही बोध होतो आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न नेहमी करतो. या अभंग नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने संतांचे शब्द पोहोचवण्याची संधी इथे सगळ्या स्पर्धकांना मिळत आहे. त्या शब्दांचा बोध आपल्या सर्वांना होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर - "अभंग नृत्य ही संकल्पना मला मनापासून भावली. भक्ती  रंगमंचावर सादर करणे अतिशय कठीण आहे कारण भक्तीचा अभिनय करता येत नाही. ती मुळातूनच यावी लागते. जिथे संपूर्ण शरणागती असते तिथे ती भक्ती सहज प्रगट होते. संतांचे शब्द भंग पावत नाहीत म्हणूनच त्यांना अभंग म्हणतात आणि या अभंगांचे सादरीकरण होते आहे हे उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत एवढ्या कलाकारांनी भाग घेतला, त्यामुळे ज्ञानदीपच जणू उजळला, असा अनुभव मी घेतला. ही स्पर्धा दरवर्षी घडत राहो आणि ही संकल्पना भारतभर आणि भारताच्या ही सीमा ओलांडून जावो, अशी सदिच्छा व्यक्त करते."


लेखन : नेहा भाटे 
लेखन आणि संकलन : स्वरदा ढेकणे


Comments

Popular Posts