'नायिका': भरतनाट्यमच्या अनुषंगाने संक्षिप्त आढावा


नायिका: संकल्पना :-

कलाकाराने घडवलेल्या कलाकृतीतील भाव जेव्हा सामान्य माणसापर्यंत पोहोचतो तेव्हाच ‘रसनिष्पत्ती’ होते. रंगमंचावर कलाकार व्यक्तिरेखेच्या भावनांशी एकरूप होऊन त्या अभिव्यक्त करतो आणि समोरच्या रसिकांना रसानुभूती देतो. शास्त्रांमध्ये ज्या आठ अथवा नऊ रसांची चर्चा केली गेली आहे त्यामध्ये सर्वात मोठे स्थान हे ‘शृंगार’ रसाला दिले गेले आहे. हा शृंगार रस चित्र, शिल्प, साहित्य, नृत्य, नाट्य यांसारख्या कलांमधून साध्य होतो तो- स्त्री आणि पुरुष यांमधील नाते, भावबंध, प्रणयविषयक प्रसंग आणि अवस्थांमधून, म्हणून ह्या शृंगार रसाची अनुभूती देणाऱ्या ह्या स्त्री-पुरुषांना ‘नायिका’ व ‘नायक’ ह्या संज्ञा मिळाल्या व पुढे त्या प्रगतशील झाल्या. ह्या शृंगार रसाचा स्थायी भाव ‘रति’ आपल्या विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाद्वारे शृंगार रसापर्यंत येऊन पोहोचतो, म्हणूनच ‘रति भावना जिच्या मनामध्ये निर्माण होते ती स्त्री’ अशी नायिकेची व्याख्या केली जाते.

नायिकाभेद: ठळक वैशिष्ट्ये (नाट्यशास्त्र आणि रसमंजरी) :-
भरतनाट्यमच्या अभिनय शैलीचा अविभाज्य घटक बनलेल्या नायिकांची सर्वप्रथम चर्चा भरतमुनींनी नाट्यशास्त्रात केली. नायिकांचा सर्वप्रथम उल्लेख ‘लास्यांगांमध्ये’ केलेला आढळतो. पूर्वी नाटकात काही ठिकाणी ‘लास्यांगे’ घातली जात, जेव्हा नाटक उत्कट अशा भावनेला पोहोचायचे. ह्या उत्कट अशा भावनेच्या प्रसंगी स्त्रियांनी हावभावांनी, संगीत आणि वाद्यवृन्दासहित केले जाणारे सादरीकरण म्हणजेच लास्यांग. नाट्यशास्त्राच्या २० व्या ‘दशरूपकनिरुपणाध्याय’ यामध्ये अशी एकुण १२ लास्यांगे नमूद आहेत. नायिकांविषयी सांगताना लास्यांगांचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. अर्थातच, लास्यांग ही नाटकांमध्ये सादर केली जात. आजच्या काळात चित्रपटातील ज्या गाण्यांना, नृत्याला आपण ‘आयटम सोन्ग्स’ म्हणतो, हा प्रकार लास्यांगान्मधून आला आहे असे आपण म्हणू शकतो. देवदासी परंपरा ही लास्यांगान्मधून आली असावी जी आपल्या भरतनाट्यम शैलीचा पाया आहे. याचा एक धागा भरतनाट्यमच्या अभिनय कक्षेत आपण पदम, वर्णम, जावळीद्वारे नायिका सादर करतो, त्यात सापडतो. ही लास्यांग आणि भरतनाट्यममधील नायिका यांमधील साधर्म्य हे त्यांच्या सादरीकरणाच्या आशयात सापडते. ते म्हणजे- नायिकेची भूमिका नायकाच्या प्रणयविषयक अवस्थांमधून जाते.

त्यानंतर २४ वा अध्याय ‘सामान्याभिनय’ मध्ये भरतांनी शृंगार, काम ह्या संकल्पनांचे महत्त्व विषद करून नाट्यातील प्रमुख स्त्री पात्र म्हणजे नायिका आणि प्रमुख पुरुष पात्र म्हणजे नायक असे सांगून आपल्या प्रिय व्यक्तिशी मिलन अथवा वियोग यांमधून निर्माण होणाऱ्या ८ अवस्था- वासकसज्जा, विरहोत्कांठीता, स्वाधीनभर्तुका, कलहान्तरिता, खंडिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तुका, अभिसारिका ह्या अष्टनायिका आणि ‘वैशिकोपचाराध्याय’, ‘प्रकृतीविचाराध्याय’ मध्ये प्रकृतीप्रमाणे ‘उत्तमा, मध्यमा, अधमा’ ह्या ३ प्रकारांत नायिकाभेद मांडले आहेत.

नाट्यशास्त्रानंतरच्या काळात अनेक शृंगारकाव्ये लिहिली गेली. त्यामध्ये शृंगारतिलक, रसार्णवसुधाकर, साहित्यदर्पण, रसिकप्रिय, उज्ज्वल नीलमणी, रसचंद्रिका, अमरुशतक आणि रसमंजरी. ह्या सर्व शृंगारकाव्यांचे मूळ नाट्यशास्त्रातच सापडते. याचा अर्थ संस्कृत साहित्य तसेच ग्रंथांमध्ये मागील साहित्याच्या आधाराने पुढचा नवीन विचार मांडला गेला आहे. त्यातील नायिकाभेदविषयक आचार्य भानुदत्तमिश्र लिखित ‘रसमंजरी’ हा नायक-नायिका भेदांचा सर्वाधिक विस्तृत चर्चा केलं गेलेला असा सर्वसमावेशक, महत्त्वपूर्ण आणि प्रसिध्द ग्रंथ मानला जातो जिचा सर्वसाधारण कालावधी १४६० ते १५५० मानला जातो. काव्य तसेच साहित्याच्या क्षेत्रात मूळ प्रेरणादायी रस ‘शृंगार’ असल्यामुळे त्याच्या निर्मितीस पात्र अशा स्त्री-पुरुषांना भानुदात्तांनी ‘नायिका’ व ‘नायक’ म्हणले आहे. त्याव्यतिरिक्त सर्वसामान्य स्त्री-पुरुषाला ते ह्या संज्ञा पर्यायवाची शब्द म्हणून देत नाही.

सामाजिक स्थिती/धर्मानुसार: स्वीया, परकीया, सामान्या
वयानुसार: मुग्धा, मध्या प्रौढा आणि त्यांचे उपप्रकार
मान अवस्थानुसार: धीरा, अधिरा, धीराधीरा
स्वीया: ज्येष्ठा, कनिष्ठा
परकीया: परोढा, कन्या व उपप्रकार
अवान्तर भेद: अन्यसम्भोगदुःखिता, वक्रोक्तीगर्विता, मानवती
अवस्थाभेद
गुणांनुसार: उत्तमा,मध्यमा, अधमा
नायिकेच्या सहायिका: सखी, दुती.
अशाप्रकारे ह्या सर्व नायिकाभेदांचा अभ्यास अभिनयाच्या सादरीकरणासाठी मदत करतात.

तत्त्वज्ञान आणि काल्पनिकता-वास्तविकतेचे समीकरण:
एकूणच आपल्या भरतनाट्यम नृत्यशैलीला अध्यात्मिक पाया, तत्वज्ञान यातून निर्माण झालेली देवदासी परंपरा आणि शास्त्रात वर्णिलेले कामशृंगाराचे महत्त्व अशी भक्कम पार्श्वभूमी लाभल्याने सर्व नायिकाभेद हे त्यातून आले आहेत. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन, समर्पण ही भावना देवदासी परंपरेतही होती. स्त्रीचा ईश्वराशी विवाह लावला जायचा, ती त्याच्यासाठी नृत्य करायची. त्यातूनच पुढे मधुरा भक्ती, शृंगार भक्ती ह्या संकल्पना निर्माण झाल्या. म्हणजेच ती स्त्री नर्तिका ईश्वरालाच आपला पती अथवा प्रियकर मनात असे. त्यामुळे ज्या रचना आपण नृत्याद्वारे सादर करतो त्यात अर्ध्याधिक ठिकाणी नायक हा दिव्य म्हणजेच शिव, विष्णू, कृष्ण, कार्तिकेय असतो तर नायिका ही अदिव्या म्हणजेच सामान्य स्त्री दिसून येते. त्या अदिव्यतेचा तिच्या परमात्म्याविषयीचे प्रेम अथवा विरह दर्शवणाऱ्या अनेक रचना आपण सादर करतो, त्याचे अगदी उत्तम उदाहरण म्हणजे- वर्णम, पदम जावळी ह्या नृत्यरचना. म्हणूनच, जर ह्याच नायिकेचा स्त्री म्हणून, एक समाजातील स्त्री म्हणून विचार केला तर तिचे दुय्यमत्व आणि पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्टपणे दिसून येते. परंपरेचा पगडा कितीही खंबीर असला तरी एक समाजातील घटक म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःला स्त्री किंवा पुरुष म्हणवता तेव्हा आपण रंगमंचावर जे सादर करतो तेव्हा समाजाला काय संदेश देतो, समाजाच्या दोन्ही लिंगांना काय संदेश देतो ह्याचा आज विचार होणे अत्यावश्यक आहे.

भरतमुनिंपासून अगदी मध्ययुगीन काळापर्यंतच्या शास्त्रकरांनी मांडलेल्या नायिकांचे वर्गीकरण बघताना असे आढळून येते कि त्यांनी काळानुरूप स्त्रीचा अतिशय बारकाईने अभ्यास करून नायिका अनुक्रमे सामाजिक स्थिती/धर्म, जन्म, वय, वृत्ती, स्वभाव व अवस्था या भागांत मांडली आहे. कालानुरूप समाजात स्त्री-पुरुषाचे जे स्थान होते त्याचेच प्रतिबिंब साहित्यात व कलेत पडलेले दिसून येते. मुळात, समाज आणि कला ह्या गोष्टी भिन्न नाहीत. आपण जे काही शिकतो त्यामागील आशय, त्याच्या कारणमीमांसा समजून घेऊन करणे गरजेचे असल्याने आत्तापर्यंतच्या अभ्यासातून, निरीक्षणांतून लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे- आपण सादर करत असलेली नायिका ही प्राचीन भारतीय समाजातल्या स्त्रीचीच एक छटा आहे. ह्या अनुषंगाने विचार केल्यास, एक भारतीय समाजातील स्त्रीचे स्थान, पुरुषासंबंधी तिची असलेली कर्तव्ये, परिस्थितीनुसार तिला करावी लागणारी तडजोड आणि संघर्ष याचेच जणू प्रतिबिंब पडले आहे असे वाटते आणि नृत्यासाठी साहित्य,ग्रंथ हे मूलभूत आधार असल्याने नृत्यातही ते प्रतिबिंबित झालेले दिसते.


परंपरा व पुनर्विचार :-
वर्षानुवर्षे एखादया रीतीचे अथवा पद्धतीचे करत असलेलं जतन म्हणजे परंपरा. गुरूंकडे शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना रचना शिकवत असताना, त्यांचे वय, क्षमता  आणि परिपक्वता लक्षात घेऊन त्यांना त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत, नायिकांवर आधारित रचना शिकवताना हा विचार नृत्य-शिक्षकांनी केलं पाहिजे. अलारीपूसारख्या नृत्त रचना शिकवण्याआधी ज्याप्रमाणे गुरु नृतायचा पाया आणि ताल यांची आवश्यक तयारी गुरु शिष्याकडून करून घेतो तशीच अभिनयासंबंधी, त्यानिगडीत विषयांसंबंधी पोषक माहिती जर दिली गेली तर तो शिष्य त्या समजूतदारीने ती रचना साकारू शकतो तसेच अभ्यासक्रम आखताना ह्या विचाराने आखला गेला पाहिजे.
आपल्या भरतनाट्यम नृत्यशैलीचा पाया देवदासी परंपरा असल्यामुळे ती नायिका सादरीकरणामागचा मूळ आशय आहे. स्त्री-पुरुष संबंधांविषयक आपले जे भारतीय तत्वज्ञान आणि सामाजिक स्थिती आहे त्याचे प्रतिबिंब हे नायिकांमध्ये दिसून येते. त्या काळातील आशय व्यक्त करणारे पदम, जावळी, वर्णम आपण आजही सादर करत आहोत. खरं तर, आपली परंपरा राखून भरतनाट्यम नृत्यशैलीत संगीत, आहार्य  तसेच साहित्याचा वापर आणि एकुण सादरीकरणात बरेच बदल घडून आलेले दिसतात. परंतु, नायिका हा विषय मात्र आपण अजूनही आहे तसाच सादर करतो. कालानुरूप त्यात बदल झालेला अथवा भर पडलेली दिसून येत नाही. जसा कलेवर समाजाचा प्रभाव पडतो तसाच कलेचा प्रभावही समाजावर पडायला हवा, ही काळाची गरज आहे. येथे एक उदाहरण द्यावेसे वाटते- रसमंजरीमध्ये वर्णिलेली ‘नवोढा’ नायिका म्हणजे मुग्धेचेच एक रूप जी नवविवाहित मुलगी आहे. तिच्यावर आधारित रचना लिहिल्या गेल्या व सादरही आपण करतो. आजच्या काळात जिथे समाजाला बालविवाह प्रथा बंद करण्याचे उपदेश दिले जातात, तिथे रंगमंचावर नवोढा नायिकेचे पद सादर करणे योग्य आहे का? तसेच, आजची स्त्री ही पूर्वीपेक्षा नक्कीच खूप स्वतंत्र आहे, स्त्री-पुरुष समान आहेत असे आपण म्हणतो देखील. मग आजच्या स्त्रीचा विचार करून, काळाचा विचार करून, बदललेल्या प्रेम, शृंगाराची परिभाषा लक्षात घेता नवीन नायिकाभेद आखून त्यांवर काव्य रचून त्या सादर करणे आवश्यक आहे.
-स्वरदा.










I express my gratitude towards my Guru Shri. Parimal Phadke and Dr.Shreenand Bapat, to motivate me to conduct research over this topic through the viewpoint of Bharatanatyam and Indology. Prof. Shri. Bhelkey, who helped me to think and view 'Nayikas' through a philosophical viewpoint and Tejdipty Pawade for giving me a great stage to present my research paper. 

('नायिका': भरतनाट्यमच्या अनुषंगाने संक्षिप्त आढावा हा शोध निबंध DCIDR- Destiny center for information documentaion and reasearch ह्या संस्थेद्वारे ३० जानेवारी,२०१६ रोजी डॉ.श्री.सुभाषचंद्र भेलके आणि तेजदिप्ती पावडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली सादर केला गेला.) 

some photographs of event :
फोटो क्रेडीट: तेजदिप्ती पावडे आणि DCIDR 




Comments

  1. अप्रतिम लेख ... ''नायिका ' या विषयाचा सखोल अभ्यास 🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts